Monday, June 16, 2008

बुड्बुड

अजय
रिसबुड
जाड्या
पोटॅशियम
बुड्बुड
आणि ह्याखाली शिव्या. हे काय असेल सगळ? ही आहे आमच्या कट्ट्यावरच्या , माझा चांगला मित्र अजय रिसबुड ह्याची नामावली. साधारण ५’६” उंची असलेला, विटी दांडू मधल्या विटीच्या आकाराची शरीरयष्टी असलेला अजय, "चंद्र वाढतो कलेकलेने, अजय वाढतो किलोकिलोने" ह्या उक्तीला जागून आहे. कोणी विचारलं ह्या ओळीचा अर्थ काय? तर उत्तर ठोकून द्यायचं अजय रिसबुड!! त्याच्या आकाराच्या तिप्पट % , उत्तर बरोबरच येणार. आणि त्याच्या कष्टाने कमावलेल्या शरीरयष्टीचा त्याला अभिमानही आहे. आणि तो माझा मित्र आहे ह्याचा मलाही अभिमान आहे. एखादा तरी मित्र असा असायलाच हवा.तसा तो माझ्यापेक्षा ५ वर्ष मोठा आहे, आमची मैत्री ३ वर्षांपूर्वी झाली. त्याचं कारण म्हणजे आम्हाला असलेला गाण्याचा छंद. मला गाण्याचा छंद आहे, पण मी गाणं शिकलेलो नाही. पू्र्वपुण्याईच्या जोरावर, मला स्वरञान लाभलं. त्याआधारे मी गातो. मी पेटी शिकलो, त्यामुळे नोकरी लागण्यापूर्वी रोज सकाळी अजयकडे पेटी बडवायला जातसे. तो त्याचा शास्त्रीय संगीताचा रियाज करायचा, नी मी त्याला पेटीवर साथ करायचो. केवळ त्याच्यामुळे मला कित्येक रागांची माहिती मिळाली. कारण मी पेटी शिकलो, माझ्या गुरुंनी मला माझा हात तयार करुन दिला. त्यांनी मला सांगितलं होतं की तुला शास्त्रीय संगीताच ञान साथ केल्यावर जसं मिळेल तसं कधीच मिळणार नाही. आणि त्यांच्या ह्या वाक्याची अनुभूती मला अजयमुळे मिळाली. त्याच्या गाण्याची खासियत म्हणजे त्याच्या आवाजातला जोर, स्थैर्य, सूराचं जबरदस्त ञान ह्या्मुळे त्यातून ठासून भरलेला आत्मविश्वास दिसतो. त्याच्या आवाजाची खासियत, म्हणजे तो पांढरी तीन मध्ये शास्त्रीय गातो, आणि सगळ्या सप्तकांमध्ये तेवढाच जोरकस आवाज त्याच्या नरड्यातून निघतो. आवाज कितीही बसलेला असला, तरीही तो सहज गाऊ शकतो. ह्याला दैवी देणगी म्हणतात.

ह्या रसायनाचा अजुन एक गुणधर्म म्हणजे खवैय्येगिरी! हा माणूस प्रचंड खातो. खायला कधीही लाजत नाही. समोर काहीही आणून ठेवा, हा खातो. मला वांग, कार्ल, कित्येक पालेभाज्या, मटकी , डाळिंब्याची उसळ, अश्या कितीतरी आवडी-निवडी आहेत. पोटॅशियमचं तसलं काही नाही. काही द्या, आम्ही खाणार. माझ्याबरोबर मसाल-पाव खाल्ल्यावर दुसरा मित्र भेटला आणि म्हणला की, ’चल अजय चायनीज खाऊ’ तर शेठ लगेच तयार होतील. आणि त्याला सांगणार नाही कि अरे आत्ताच मी मसाला पाव खाऊन आलोय. त्या मित्राला वाटेल हा रिकाम्या पोटी खातोय सगळं! एकदा ह्याची आजी बाहेर होती २-३ दिवस. तेव्हा तिच्या घरी ह्याने आम्हाला बोलावलं. आम्ही घरी २.५ किलो बटाटा वडे आणले ४ जणांसाठी. रात्री ९.३०-१० च्या सुमारास आम्ही ते आणले, थोडे खाऊन आमचं पोट भरलं. त्यानंतर २-३ तास रात्री गप्पा मारून सांडलो. आणि थोड्यावेळाने निसर्गाच्या हाकेला ओ देण्यासाठी मी उठलो, तर मला गोणीच्या आकाराचं काहीतरी स्वयंपाकघराच्या उंबरठ्यावर दिसलं. आणि मी झोपेत होतो, म्हण्लं गोणी कशी काय हलत्ये? मगाच पासून घरी होतो तेव्हा दिसली नाही,आत्ता कशी काय आली? म्हणून मी मधला दिवा लावला, तर बुड्बुड उरलेले पाच वडे खात होता. मी हरलॊ. पहाटे ३.३० वाजता हा मनुष्य वडे खात होता!! म्हणे,‘अरे फार भूक लागली मला’. म्हणलं साहेब तुम्ही धन्य आहात!!!

ह्याच्यातला अजुन एक गुण मला आवडतो गबाळेपणा. जो गूण माझ्यातही आहे. कोणत्याही पॅंटवर कोणताही सदरा घालणे, जीन्सवर स्लीपर्स घालणे. आम्ही जे कपडे घालू तीच फॅशन आणि बाकीचं सगळं म्हणजे मूर्खपणा, असा आमचा समज आहे. एकदा तर ह्याने वेंधळेपणाची परिसीमा गाठली होती. रात्री जेवल्यावर बाहेर पडलो सगळे. आणि एका नाक्यावर गप्पा छाटत उभे होतो. ह्याला त्याच्या बायकोचा फोन आला. आणि हा तिच्याशी बोलता बोलता, आमच्यापासून वेगळा झाला, आणि येर-झारा घालत बोलण सु्रु होतं. आमचं आधी कोणाचंच लक्ष नव्हतं, कारण आम्ही आमच्या गप्पांमध्ये दंग होतो. थोड्यावेळाने बघतो तर ह्याच्या पाठीमागे काहीतरी लोंबत होतं. नीट बघतो तर साहेबांनी अर्धी-चड्डी उलटी घातली होती. उलटी म्हणजे नाड्या मागे. आणि चड्डीला elastic असल्यामूळे ह्याने वेण्यांसारख्या नाड्या सोडल्या होत्या बाहेर. बेफाम हसलो. हसता हसता पडायचं बाकी राहिलं होतं.

अजून एक फाजिल किस्सा आहे. पण तो ज्या क्रियेबद्दल आहे ती क्रिया पुर्णपणे नैसर्गिक आणि अत्यावश्यक आहे. ती म्हणजे शरीरातून वायु सोडणे!! बुड्बुड आणि अमोद चितळे ह्याबाबतीत आचरटपणाचा कळस गाठतात. दोघांमध्ये पादण्याची स्पर्धा लागते. आणि जो जास्तवेळा वायु सोडेल तो जिंकला. त्याचे गुणही असतात. त्यामुळे अजयने अमोदवर २०/७ ने मात केली वगैरे असा धावता गुण-फलकही असतो. आणि वास आला की बाद.........एवढा आचरटपणा अजुन कुठे चालत असेल असं वाटत नाही.

अजयची चालण्याची पण एक ढब आहे. चालताना त्याचं मांस सगळ्या बाजुंनी पॅंटवर वर्चस्व गाजवत असतं. त्यामुळे मध्येच हा एकाबाजुने पोट आत खोचून पॅंट वर घेतो, मग दुसऱया बाजुने मांस आत खोचून पॅंट वर घेतो. हाताची बोटं सतत जादू करत असल्यासारखी हवेत फिरत असतात. त्याच्याशी बोलणं म्हणजे जरा सगळ्या गोष्टींचं भान ठेवावं लागतं. कारण हा मध्येच विषय बदलतो. म्हणजे एका विषयावर आपण बोलत असतो आणि हा मध्येच असंबद्ध वाक्य टाकतो, वेगळ्याच विषयावर. त्या वाक्याआधीची त्या विषयावरची बरीच वाक्य त्याने मनातल्या मनात बोलून झालेली असतात. पण समोरचा माणूस मनकवडा नाही हे बहुदा तो विसरतो. खुप चंचल आहे ह्याबाबतीत. चिडतो फटकन. शांतही होतो, पण मनावरचा ताबा लवकर सुटतो. गाण्यातले राग लवकर येतात म्हणजे जगात बाकीचे जेवढ्या प्रकारचे राग आहेत तेही लवकर यायला हवेत अशी त्याची फल्तु अपेक्षा असावी.

हे सद्गुण-दुर्गुणभरीत बुड्बुड्चरित्र मी इथे लिहिलंय हे जर त्याला समजलं, तर माझ काही खरं नाही. पण तरीही अजय जसा आहे तसाच त्याने राहावं. उगाच टापटिप अजय, खाताना लाजणारा अजय माझ्या डोळ्यांना बघवणार नाही.

No comments: