Saturday, September 5, 2009

अताशा असले काही होत नाही........

रात्री जेवण झाल्यावर कंप्युटर सुरु केला. gtalk वर login करणार एवढ्यात सोसायटीमधल्या देवळातून जोरजोरात बोलल्याचा आवाज यायला लागला. म्हणलं जरा जाउन बघु लफरा काय आहे ते....पाहिलं तर वडकेकाकू विरुद्ध सगळी तरुण मुलं वादावादी करत होती. तरुण म्हणजे ३५-४० वर्षांची. प्रत्येकाला पोरं-टोरं झाल्यामुळे आणि बायका होत्या त्यापेक्षा दुप्पट(आकाराने) झाल्यामुळे ह्यांचा संसारातला रस जरा कमी झालाय. वादावादी,लवकरंच होऊ घातलेल्या गणेशोत्सवावरून होती.

काकू - तुम्हाला काही समजतंय का तुम्ही काय बोलताय ते? गणपतीच्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये तुम्हाला कव्वाली आणि लावणीचे कार्यक्रम हवेत?

बबन - अहो काकू, मग त्याला काय झालं? आपल्याला कार्यक्रमांना लोकं हवीत कि नाही?

छग्या - नाहीतर काय! च्यायला २-२, ३-३ वर्षांची मुलं रडत रडत स्टेजवर येणार. त्यांचे आई-बाबा त्यांना जबरदस्ती स्टेजच्या मध्यभागी ढकलणार, मग निवेदिका म्हणून काम करत असणारी, सोसायटीतली आगाऊ मुलगी त्या मुलांच्या तोंडासमोर तो माईक नाचवणार आणि एखादी कविता म्हणायला सांगणार. ते कारटं परत स्टेजच्या कडेशी उभ्या असलेल्या पालकांकडे धावत-रडत येणार, आई-बाप परत पोराला स्टेजवर ढकलणार. आणि ह्या सगळ्यासाठी लोकं, त्या लहान लहान मुलांना प्रोत्साहन म्हणून उपकार केल्यासारखे टाळ्या वाजवणार.

काकू - अरे देवा! अरे गणेशोत्सव लहान लहान मुलांना प्रोत्साहन देण्यासाठीच असतो. आम्हीही दिलंय तुम्हाला प्रोत्साहन. तुम्ही काय छान कलाकार नव्हतात. वाट्टेल तसा मेक-अप करून यायचात. वाट्टेल तसे नाचायचात, काय ती नाटकं बसवलेली असायची, कोणताही डायलॉग कुठेही घातलेला असायचा, मध्येच कोणीतरी डायलॉग विसरायचं. हा छग्या तर प्रत्येकवेळी काही ना काही घोळ घालायचा. एकदा तर तो नाचता नाचता, स्टेजच्या कडांना आपण जे कापड बांधुन घेतो त्याला टेकला होता, आणि कापड आणि स्टेजच्या फटीतुन खाली पडला आणि त्याच फटीतुन परत वरती येत नाचायला लागला.(इथे हश्या)........तर असं सगळं असुनही आम्ही तुमचेच कार्यक्रम ठेवले आणि तुम्हालाच प्रोत्साहन दिलं.

छग्या - ते काहीही असो हो, आमच्यामुळे तुम्ही हसलात ना? टाईमपास झाला ना? आम्ही जे करायचो ते जीव तोडून, हल्लीच्या मुलांना ढकलायला लागतं स्टेजवर.

गिऱ्या - मागच्या वर्षी तो काय ऑर्केस्ट्रा आणला होता आपण, काय रेकत होते सगळे. त्यातल्या सगळ्या बायका हावभाव करून बेसुर गात होत्या.

छग्या - आणि त्याही सुंदर होत्या असंही नाही.

बबन - एका काकांना ५ वेळा once more दिला आता तरी बरं म्हणतील ह्या आशेने, तर प्रत्येक अटेम्प्ट घाण म्हणण्यात आधीच्या अटेम्प्टला स्पर्धा करत होता. मी अजुन एक once more देणार होतो. पण त्या आधी ह्यांनी चोप दिला होता मला.

छग्या - बघा काकू! हे असले कार्यक्रम देण्यात काही अर्थ आहे का? एवढे ९७ ब्लॉक्स आहेत आपल्या इथे. त्यात ९० तरी मराठी आहेत. ९० लोक तरी असतात का खाली हजर? मॅक्सिमम लोक दिवे बंद करून खिडकीतुन बघतात कार्यक्रम. मग निवेदिका त्यांना खाली यायला सांगणार. ही अशी वेळ यावी आपल्यावर असं वाटतंय का?

काकू - अरे तुमचे मुद्दे ठिक आहेत, पण म्हणून लावण्या आणि कव्वाल्या?

बबन - अहो काकू तुम्हाला नाही समजत....लोकांचा उत्साह किती कमी झालाय!!! आज आपण ५ जण गणेशोत्सवाच्या मिटींगसाठी जमलोत. फक्त पाच!! पूर्वी कमीत कमी ३० लोकं असायची. तुम्हीच आठवून बघा. का कमी झाली असतील एवढी लोक? का उत्साह नाहीये लोकांना? का एवढा कमी सहभाग आहे उत्सवात? आरतीला जेमतेम २०-२५ लोक असतात. तेही कसेबसे रेटत आरती करतात. थोडं ऐकायला विचित्र वाटेल, पण तरी बोलतो. लोकं विसर्जनाला येतात तीसुद्धा अंत्ययात्रेला आल्यासारखी! ढोल-ताशेवाले त्यांच्या त्यांच्यात बडवत असतात, त्यांच्या आजुबाजुल २-३ लहान मुलं इकडुन तिकडे उड्या मारत असतात.ही अशी विसर्जनाची मिरवणूक? लोकांना आपण सहभागी करून घेतलं पाहिजे. लोकं हवीत हो. त्याशिवाय उत्सवाला मजा नाही. उत्सव काय फ़क्त आपल्या ४-५ जणांचा नाहीये. आपण दारोदारी गेल्यावर खिशातुन वर्गणीचे २५० रुपये काढले म्हणजे लोकांची जबाबदारी संपत नाही.

त्यांची ही बडबड ऐकली आणि मी घरी आलो. थोडं चॅट करून दिवाणावर झोपलो खरा, पण गणेशोत्सवाचा विषय काही डोक्यातुन जाई ना. खरंच पूर्वीसारखा उत्साह बिलकुल जाणवत नाही आता. सोसायटीत तसे लोकही राहिले नाहीत आता. मला लहानपणीचे दिवस आठवू लागले.

सोसायटीचा पाचंच दिवसांचा गणपती असायचा, पण धमाल असायची. महिना महिना आधीपासून सुरु झालेल्या गाण्याच्या, नाचाच्या आणि नाटकांच्या तालमी अजुनही आठवतात,त्यात आपला विषय दुसऱ्यानी चोरु नये म्हणून पाळली गेलेली गुप्तता. सगळ्या आठवणी तरळू लागल्या.

मी रोज संध्याकाळी शाळेतुन आल्यावर दप्तर कुठेतरी भिरकावून द्यायचो, थोडंसं काहीतरी गिळलं कि तालमीला जायला तयार! संध्याकाळचे २-३ तास काही क्षणात गेल्यासारखे वाटायचे. एकाकडे नाचाची प्रॅक्टिस. ती झाली कि तिथुन दुसरीकडे दुसरा ग्रुप डान्स. खरतर नाचाचा आणि माझा दुरान्वयेही काहीही संबंध नाही. पण केवळ संध्याकाळी अभ्यास करायला लागु नये म्हणुन सगळ्या स्पर्धा आणि कार्यक्रमांमध्ये भाग घ्यायचो. ज्यांना नीट नाचता यायचं ते उगाच टिंग्या मारून दाखवायचे, खास करून मुली. मग चिडवाचिडवी, भांडणं, कधी मारामाऱ्या. कधी कधी नाच बसवणारी ताई किंवा काकू काहीतरी खायलाही द्यायच्या. १-२ कचोऱ्या वगैरे.

सगळ्यात मजा यायची ती नाटकाच्या प्रॅक्टिसला! लहानपणापासून पाठांतर आणि आपलं कधीही जमलं नाही. आणि पाठांतराशिवाय नाटक अशक्य. मग रोज सगळी पात्रं; खरोखरीच पात्र होतो आम्ही;एकत्र बसून २ आठवडे फक्त वाचनंच करतोय. एखाद्या इंग्रजी मिडियमच्या पात्राला मराठी वाचणं अवघड जायचं. मग त्याचं अडखळत वाचणं, चुकीचे उच्चार, त्यावरून हशा, चिडवाचिडवी असले प्रकार चालायचे.

या सगळ्या तालमी झाल्या की मग ९-९.३० पर्यंत घरी यायचो. मग जेवण आणि अभ्यास होत नाही म्हणून आई-बाबांचं बोलणं एका कानानी ऐकून दुसऱ्या कानानी सोडत गुपचुप झोपायचो. सकाळी उठुन थोडं काहीतरी अभ्यासाचं वाचल्याचा आभास निर्माण करायचा, बाबांना उगाच एखादं कठीण गणित विचारलं की, ऑफिसच्या घाईत "संध्याकाळी सांगतो उत्तर" असं सांगुन बाबा निघुन जायचे आणि परत "नाटक पाठ करतोय" हे कारण सांगुन अभ्यासाचं पुस्तक इमानदारीत परत दप्तरात जायचं.

हा दिनक्रम १-१.५ महिना चालायचा. गणपतीच्या आठवडाभर आधीपासून सजावटीचं काम सुरु व्हायचं. अर्थात, आम्हा लहान मुलांच त्यात काहीच काम नसायचं. आमच्यापेक्षा मोठी मुलंच ते करायची. त्यांच्यातला एखादा आर्किटेक्ट त्यात सिंहाचा वाटा उचलायचा. आम्ही उगाच फेविकॉल आणुन देणं, पताकांच्या माळा बनवणं असली चिरी-मिरी कामं करायचो. मजा असायची पण त्यात. आणि आपण किती छान पताका लावतोय असं वाटायचं, फार मोठं काम करतोय असं वाटायचं.

गणपतीच्या आदल्या रात्री बॉक्स क्रिकेटच्या मॅचेस असायच्या फ्लड लाईट्समध्ये. सुरुवातीला सगळे एकदम शांतीत खेळायचे. म्हणजे, एरवी खेळताना जो आरडाओरडा असतो,"कॅच इट", "धाव", "फेक", "आवस्दे"(हाउज दॅट) हे शब्द हळु आवाजात बाहेर यायचे. खेळाच्या नादात रात्रीचा शुकशुकाट आम्ही घालवायचो, आणि मग घराघरातुन लोकं आम्हाला उद्देशुन खिडकीतुन शुकशुकाट करायचे. त्यात परत रडारडी, एखादी रन ढापणे, उगाच नो-बॉल देणे असले प्रकार चालत. आणि हे सगळं झालं, की सजावटीवर शेवटचा हात फिरवला जायचा.

तेव्हा आमच्या शाळेला गणपतीची ५ दिवस सुट्टी असायची. या बाबतीत आत्ताची मुलं दुर्दैवी आहेत. आणि ते ५ दिवस म्हणजे ऐश असायची. सगळी मुलं अखंड खाली असायची. लहान-मोठी मुलं-मुली एकत्र खेळायची. लगोरी, लंगडी, ड्बा-ऐसपैस, खो-खो, संगीत-खुर्ची हे ठरलेले खेळ. गणपतीसाठी आणलेला लाऊड-स्पिकर आम्हीच जास्त वापरायचो. संगीत-खुर्ची खास करून याच ५ दिवसात खेळायचो आम्ही. या सगळ्यात एक कॉमन असायचं, ते म्हणजे कोणीतरी रडीचा डाव खेळायचं आणि त्यावरून होणारी भांडणं!

संध्याकाळी कार्यक्रमांचे वेध लागायचे. महिनाभर केलेली प्रॅक्टिस, त्यात केलेल्या चुका, त्या स्टेजवर होऊ नयेत म्हणून मनाशी बांधलेल्या खुणगाठी, टेन्शनमुळे पोटात होत असलेली गुडगुड, भाड्याने आणलेले ऐतिहासिक कपडे, त्या विचित्र मेक-अपमध्ये तासन-तास आपल्या कार्यक्रमाची वाट बघणं,स्टेजवर चुका व्हायच्याच! कोणाच्या न कोणाच्या धोतरांच कासोटं सुटायचं किंवा नाचता नाचता टोपी पडायची, मग ती फटकन उचलण्याचे प्रयत्न व्हायचे,कोणीतरी एखादा वेगळीच स्टेप करायचा, कोणी दुसऱ्याच्या स्टेप्स बघुन नाचायचा, एका नाचानंतर लगेच लागलेला आपला दुसरा नाच किंवा नाटक, त्यात वेगळी वेशभुषा, त्यासाठी धावपळ करणं, आणि दमछाक होणं, आपल्याबरोबर आपल्या आई-बाबांची पळापळ होणं, ह्या सगळया गोष्टी संध्याकाळी व्हायच्याच! त्यातली मजा और!

गणपतीची आरती म्हणजे तर काय हवा असलेला आणि सहन होणारा गोंधळ! ज्ञानेश्वराची आरती, "आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म"मध्ये जास्तीत जास्त श्वास लांबवण्याची चढाओढ, त्यात मॉबचा synchro जायचाच! कडव्यानंतर परत धृपदावर आल्यावर दुप्पट वेगाने टाळ्या आणि झांजा वाजवणं, आपल्यापासून हातभर लांब असलेल्या माईकमध्ये आपला आवाज जाण्यासाठी बेंबीच्या देठापासून ओरडायचो. आरतीला कमीत कमी ६०-७० लोकं तरी असायचेचं. पण त्यातल्या फक्त ३-४ लोकांनाच मन्त्रपुष्पांजली यायची. आणि त्यांच्यात एक माझे बाबा असल्याचा अभिमानही वाटायचा मला!

चवथ्या दिवशी रात्री बक्षिस समारंभ. हा समारंभ नावाला असायचा. कारण सादरीकरण केलेल्या सरसकट प्रत्येकाला कमीत कमी एखादं पेन किंवा स्केचपेनचा सेट मिळायचा. त्यामुळे उदास कोणीच व्हायचं नाही.

गणपतीचा पाचवा दिवस आणि रविवार संध्याकाळ यातलं औदासिन्य सारखंच! "उद्यापासून ही मजा संपणार" ही जाणिव असायची आणि "ठिके आत्ता मजा करून घेउ" असं लगेच मनात यायचं. पाचव्या दिवशीची संध्याकाळची आरती तर फारंच उदास करायची. सगळेजण जोरजोरात म्हणायचे पण त्यात आनंद नसायचा. हे सगळं आता वर्षभरासाठी संपणार. गणपती परत आपल्या गावी जाणार ह्या विचाराने मन उदास होऊन जायचं. "अन्याय माझे कोट्यान कोटी, मोरेश्वरा बा तू घाल पोटी" ही ओळ आली की फार गहिवरून यायचं. किंवा गाऱ्हाणं सुरु झालं की, आणि सर्वात शेवटी नकळत झालेल्या चुकभुलींची माफी मागणारे शब्द आले की डोळ्यात पाणी तरारलं जायचं. कोणी कोणी स्वतःच्या घरचे प्रसाद आणि गणपतीला दाखवायला नैवेद्य घेऊन यायचे. त्यात एखादा उकडीचा, एखादा तळणीचा मोदक मिळायचा. अनेक प्रकारच्या बर्फ्या.

विसर्जनाची मिरवणूक एकदम जोशभरी! मग गोविंदा-स्टाईल नाच व्हायचे. मुली आणि बायका रिंगण करून नाचायच्या, फुगड्या घालायच्या. मग कोणीतरी एखाद्या जरा साठी ओलांडलेल्या आजी-आजोबांना ओढायचे आणि मग ते एखादी अतिशल स्लो फुगडी घालायचे, मग अर्धा रस्त्यावर प्रत्येकी एकेक वडापाव. आम्ही २ तरी खायचोच, गोळ्या मिळायच्या.

विसर्जनाच्या ठिकाणी अनेक घरगुती आणि छोट्या छोट्या सोसायट्यांचे सार्वजनिक गणपती असायचे. त्यांच्या आरत्या, आमच्या आरत्या एकमेकींमध्ये मिसळायच्या. शेवटी गणपतीबाप्पा मोरयाच्या आरोळ्या. मग प्रसाद म्हणून आंबेडाळ मिळायची. गणपतीची मूर्ती २-३ तरूण मुलं उचलुन तळ्यापाशी न्यायची. तिथल्या स्वयंसेवकाच्या स्वाधीन ती मूर्ती केली जायची. गणपतीला घेऊन ते लोकं लांब पाण्यात घेऊन जायचे. अर्धवट बुडालेला गणपती हळूहळू लांब जाताना दिसत राहायचा. दोनदा मूर्ती तळ्यात बुडवून तिसऱ्यांदा गणपतीसोबत ते लोकं खाली पाण्यात जायचे. हा प्रसंग प्रत्यक्षात घडत असताना मन भरून यायचं, कंठ दाटुन यायचां;

गणपतीबाप्पा मोरया,
पुढच्या वर्षी लवकर या, 
गणपती गेले गावाला,
चैन पडेना आम्हाला.......

या फक्त मिरवणूकीत ओरडायच्या ४ ओळी नाहीत. ह्या खरोखर मनींच्या भावना आहेत हे त्या शेवटच्या क्षणी जाणवायचं.