Thursday, June 26, 2008

अध्याय तीन - सांगे कवतिक

तिच्यासाठी माझी । दिनचर्या मी बदलली साची ।
बात आहे प्रेमाची । शिथील मी कसे व्हावे ॥

रोज तो गोड चेहरा । दिसू लागला परत मजला ।
भिडू लागती अमुच्या नजरा । जाता येता एकमेकां ॥

नजर तिची बोलकी । नयन तिचे हरिणीपरी ।
फास टाकिती मजवरी । अडकून जाई मी त्यात ॥

हास्य तियेचे मोहकु । तोच तियेचा कनकु ।
मन माझे लागे बहकु ।तिच्या एका स्मितापायी ॥

ओठ तिचे सुंदर । वाटे जैसा की धनुर ।
हसताच ती, होई वार । अपार मम ह्र्दयी ॥

पाठीवरी रुळे अपार । केशभार कुरळाकार ।
ठाव घेई आरपार । अपुल्या ह्रदयाचा ॥

भाळी रूळे अनवट । एखादीच छान बट ।
झुळुकेवर उडे बेछुट । केशपुंज वलयाकारी ॥

कांती तिची मोहमय । दुधावरली जणू साय ।
बेताल करी ह्रदय । ठेका चुकवी दिलाचा ॥

वर्णन तिचे किती करू । शब्द लागती तोकडे पडू ।
अद्वितीय ऐसे पाखरू । वाहवा खुदाच्या प्रतिभेला ॥

No comments: