Friday, July 15, 2011

लिंगभेद होणे अशक्य

मी ऑफिसमध्ये बसलो होतो fb वर टाईमपास करत. दुसऱ्या डिपार्टमेंटच्या एका मॅडमनी सांगितलं फोनवर बोलता बोलता, "मुंबईत ३ ठिकाणी बॉम्ब्लास्ट झालेत, दादर, झवेरी बाजार, ऑपेरा हाऊस..." मोबाईल कानात(स्वतःच्या)खुपसुन मॅडम निघुन गेल्या. थोड्यावेळानी अजुन एक माणुस आला तोही तेच सांगुन गेला. डोळे वगैरे मोठे करुन, म्हणजे डोळे मोठे वगैरे करुन, "ब्लास्ट झालेत तीन" कलटी...... अजुन दोघेजण माझ्या डेस्कवरुन पास झाले. आपसात बोलत होते, "सालं काय मिळतं या भोxxच्यांना common man ला मारुन समजत नाही. आपलं गव्ह...." असं काहीतरी बोलुन बहुदा पुढे सरकारलाही शिव्या घालुन झाल्या. मी लगेच news सुरु केल्या. कुठे सगळ्यात चांगला, ताजा मसाला मिळतोय याचा शोध सुरु...आम्ही तेच करु शकणार उभ्या आयुष्यात! परत शिफ्टमधल्या दुसऱ्या मुलाला फोन पण केला, "काय रे लवकर सोडायचे काही चांसेस?" माझ्यासारखा अतिसामान्य माणुस तरी अशा वेळेला असाच react होऊ शकतो.

थोड्यावेळाने मित्रांना फोन करायचा प्रयत्न केला, सगळ्या सर्विस प्रोवायडर्सचे सगळे नंबर ‘नोट एवेलेबल’ झाले होते. हरामखोरांनी लॅंडलाईन्स पण बंद केल्या होत्या. हे म्हणजे अतीव बोरिंग होतं. म्हणजे माणुस या असल्या घटनांनतर इतर बडबड फोनवर करुच शकत नाही का? काय वाट्टेल ते समज असतात सरकारचे. बॉम्बस्फोट, ताजसारख्या ठिकाणी दहशतवादी हल्ले, या सगळा घडामोडी अताश्या मुंबईकराच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक होत जाणार आहेत. मुंबईकरांना याची सवय नको का व्हायला? फोन लाईन्स बंद करुन ठेवल्यामुळे काहीतर आभाळ कोसळल्यासारखं वाटलं ना उगाच. Actually, it was just a bomb blast! जपानी, इंडोनेशियन जनतेला भुकंप, त्सुनामी आणि ज्वालामुखींची सवय झाली आहे. हे दहशतवादी लोकं आपल्याला बॉम्बस्फोटांची सवय लावताएत....असो!!!

आपल्या देशातले तरुण तर असल्या घटना घडल्या कि लईच active होतात. सर्वात पहिल्यांदा ते जर काही करत असतील तर सोशल नेटवर्किंग साईट वर लोगिन करतात. स्वतः काहीतरी हास्यास्पद पोस्ट टाकतात, त्याला कोण कोण `Like' करतंय ते बघतात, मग दुसऱ्यांच्या हास्यास्पद पोस्ट्स ना ‘Like’ करतात, मग त्यावर हास्यास्पद `Comment' टाकतात. एवढाच काय तो धंदा त्यांना शिल्लक राहतो. हे सगळं मी स्वानुभवावरुन सांगतोय बरं का!

आज सकाळी उशीरा उठुन सर्वात आधी मी टीव्ही सुरु केला. News Channels फिरवुन रिमोटची बॅटरी थोडी संपवुन झाली. प्रत्येक channel वरचे शब्द वेगवेगळे होते. पण सगळ्यांनी बहुदा एकंच पॅरा रेडी करुन ठेवला होता. त्यामुळे सगळीकडे तासभर एकच पॅराग्राफ परत परत वाचला जात आहे असा भास मला झाला. एकाच channel वर मुसळधार पावसात भिवंडी आणि कल्याणची १०० घरं पाण्याखाली गेल्याची बातमी चालु होती. त्यातही एकच पॅरा परत परत वाचुन दाखवत होते. वैतागुन परत वर्तमानपत्र हातात घेतलं. त्यात काही नवीन, वेगळं दिलंय का ते शोधायचा प्रयत्न केला. त्यात कोण काय म्हणाले? हे जरा वाचनीय वाटलं.

त्या सगळ्यात आपले लाडके, धैर्यशील, कर्तबगार अशा राहुलसाहेब गांधींचे उद्गार समजल्यावर माझ्या अंगात अजुन आग आहे आणि ती तळपायापासून मस्तकापर्यंत वाहते आहे अशी जाणीव मला झाली. तो भडवा म्हणतो,"दहशतवाद आपण रोखुच शकत नाही." या त्याच्या उद्गारावरुन एकुणच राजकारण्यांचा या सगळ्या घडामोडींकडे बघण्याचा काय दृष्टीकोन आहे हे समजलं. त्यांना काय, त्यांच्या बुडाखाली मऊ सीट असलेल्या AC गाड्या असतात. शिवाय सोबत Z किंवा Z+ सुरक्षा. म्हणजे साला जे या पृथ्वीतलावरच काय, अख्या विश्वात एक क्षण पण जगायला लायक नाही, अश्या राजकारण्यांना या स्फोटांमध्ये साधं खरचटत पण नाही शिवाय हे ज्यादा पोलिस दल स्वतःच्या सुरक्षेसाठी वापरुन तोंड वर करुन बोलतात!!! यांना सत्तेच्या खुर्च्या हव्यात, त्यावर बसुन प्रचंड पैसा ओरपायला हवाय, जनता कष्ट करुन पैसा कमवते, त्यावरचा टॅक्स हे लोक बायांवर उडवायला वापरतात. अफजल गुरु आणि कसाब सारखे दोशी चैनीत या टॅक्सवर जगत आहेत. लोकं रिटर्न फाईल करतात पण non-taxable amount जनतेला पैसे चारल्याशिवाय परत मिळत नाही. अमेरिकेवर एकदा हल्ला झाल्यावर १० वर्षात तिथे परत अशी घटना घडली नाही. आणि आपल्या इथे वर्षातुन १० वेळा घडतात. असे हे षंढ आपले राजकारणी. साले वोट-बॅंकसाठी गुन्हेगाराल पोसताएत. गिरगाव चौपाटीवर लोकांनी कसाबला झोडपला आहे, हे सर्वश्रुत आहे. तरी हल्ला करणारा कसाब हाच का? याचे पुरावे गोळा केले जाताएत! कहर आहे.

इथे आम्ही मरमरून कामं करतो, वेळेत कर भरतो आणि त्याचा वापर हे दळभद्री लोक अतिरेक्यांना पोसायला वापरतात, नाहीतर ५ वर्ष खुर्च्या राखुन स्वतःच्या घश्यात घालतात. रस्त्यावरचे खड्डे वर्षानुवर्ष तसेच आहेत. त्यामुळे अनेक अपघात होतात. महागाईनी हद्द पार केली आहे. पेट्रोल, डिझेल आणि एकुण इंधन दरवाढ मोठ्या प्रमाणात झालीये. तरी ठिके पेट्रोल, डिझेल हे आपले चोचले आहेत. पण खाद्यपदार्थांच काय? ते तर अखिल मानवजातीचं इंधन आहे. जीवनावश्यक वस्तू आहे ती. माणसाच्या तीन मुलभुत गरजांपैकी १ नंबर गरज आहे अन्न! महिन्याला ५-६ हजार रुपये कमावणारे काय खात असतील? किती खात असतील? त्यांच्या कुटुंबाला पुरत असेल का ते? हवामान बदल किंवा अन्य काही कारणांमुळे जर शेतीवर किंवा तत्सम उत्पादनाचं नुकसान होत असेल तर स्वस्त दरात ते जनतेला उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी सरकारची नाही का? कोणत्याही उत्पादनावर कर पण भरायचा परत नुकसान भरपाई म्हणून ज्यादा दरातले खाद्यपदार्थही विकत घ्यायचे? मग इतके कोटी रुपये कर भरणाऱ्या लोकांनी कर भरावाच का? त्याचा जनतेसाठी कुठे आणि कधी वापर होणार?

१३ जुलै २०११, मुंबईच्या ३ गजबजलेल्या भागांमध्ये गजबजलेल्या वेळेलाच दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा साखळी बॉंम्बस्फोट घडवून आणले. काही लोक याचे हकनाक बळी गेले तर काही शे लोक हकनाक जखमी झाले. दर १-१.५ वर्षांनी हि घटना आता मुंबईमध्ये घडु लागली आहे. राहुल्याचे उद्गार वर दिलेले आहेतच. दिग्विजय नावाच्या सिंगानी आज विनोद केला. म्हणे आपली परिस्थिती पाकिस्तानपेक्षा बरी आहे. तिथे आठवड्याला होतात स्फोट. पण अरे मूर्खा तू इथे तशी परिस्थिती यायची वाट बघणारेस का? आणि तुलना कोणाबरोबर करायची याची जाणीव नको का? आम्ही तुझ्या सगळया बँक खात्यांवरची रक्कम देशातल्या सगळ्यात गरीब भिकाऱ्यापेक्षा जास्त राहील असं बघतो, बाकीची काढुन घेऊन आपसात वाटतो. वर आम्ही असं म्हणतो, "समाधान मान कि तो भिकारी तुझ्यापेक्षा गरीब आहे" चालेल का हे त्याला? पाकिस्तानशी तुलना करतोय हिंदुस्तानची!!! लोकांच्या हतबलतेचा गैरफायदा घेतला जातोय. मऊ भाग लागतोय तो कोपराने खणला जातोय. कठिण भाग लागतोय त्याला तोडून टाकण्यात येतंय. मानवाधिकार कसाब आणि अतिरेक्यांना लागु होतो, पण त्यांनी मारलेल्या जनतेला लागु होत नाही अजबंच आहे सगळं.

खरं सांगायचं तर आपण आता लोकशाहीत जगायच्या लायकीचे राहिलेलो नाही असंच वाटु लागलंय मला. किंबहुना आपण ज्याला लोकशाही म्हणतोय ते लोकांनी लोकांचे लोकांसाठी केलेले राज्यंच नाहीये. निवडणुका होतात, उमेद्वारांना राजकीय पक्ष तिकिट देतात. त्या उमेद्वाराची काय लायकी असते लोकांच प्रतिनिधित्व करण्याची? कोणत्यातरी झोपडपट्टीत राहणारा, बाजुच्या मैदानात दिवसभर क्रिकेट खेळणारा, ज्याच्या शिक्षणाचा बालवयातंच बोऱ्या वाजलाय, ज्याच्या पालकांचा आपल्या अपत्यावर ताबा नाही त्यामुळे संस्कार वगैरेंपासुन कोसो दूर राहिलेला असा माणूस निवडणूक लढवतो? त्याची काय पात्रता आहे? नगरसेवक या नावात सगळं आलंय, नगराचा सेवक आहे तो मालक नाही,याचं त्याला भान असायला हवं. ना ज्याला समाजशास्त्राच ज्ञान, ना राजकारणाचं ज्ञान, ना त्याला इथल्या संस्कृतीचं ज्ञान, ना त्याला इथल्या जनतेच्या समस्यांची कदर, असा माणूस आमदारकी आणि खासदारकीची निवडणूक लढवतो? तुमच्या आमच्यासारख्या माणसाने अश्या गयागुजऱ्या माणसांमधुन एखादा उमेद्वार निवडावा? हे म्हणजे वासरात लंगडी गाय शोधण्यासारखं आहे? खरतर परिस्थिती उलटी असायला हवी, सर्व उत्तम उमेद्वारांमधुन सर्वोत्तम उमेद्वार निवडायचा निर्णय आपल्याला द्यायला हवा.यातला एकही उमेद्वार आमचं प्रतिनिधित्व करायला लायक नाही असं मत नोंदवायची संधी आपल्याला मिळायला हवी. ते असेलही कदाचित, निवडणूक समिती आणि राजकारण्यांनी संगन्मतानी दडवून ठेवली असेल ही सोय. आपण निवडणूक समितीलाही काही बोलू शकत नाही, अक्षम्य गुन्हा आहे तो. का कबुल करावं आपण कि ही लोकशाही आहे?

नेहरू-गांधी कुटुंबीयांनी देशाची पार धुळधाण उडवुन टाकली आहे. ब्रिटिशांनी लुटलं नाही तेवढं यांनी अवघ्या साठ वर्षात लुटलं आहे. ब्रिटीशांनी फक्त धन-दौलत लुटली. स्वकीयांनी स्वाभिमान, स्वावलंबन, प्रामाणिकपणा, माणुसकी यासारखी कोणत्याही राष्ट्राला कोणत्याही संकटातुन तारुन नेणारी संपत्ती लुटली आहे. अगदी आर्य चाणक्य आणि पृथ्वीराज चौहान, छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, पेशवे, लोकमान्य टिळक, आगरकर, लाला लाजपत राय, बिपिनचंद्र पाल, क्रांतिसिंह नाना पाटील, स्वातंत्रवीर सावरकर, भगतसिंह आणि त्यांचे साथीदार, सुभाषचंद्र बोस आणि त्यांची सेना, स्वामी विवेकानंद आणि इतिहासाला माहिती नसतील अश्या अनेक स्वातंत्रसेनानींकडे ही संपत्ती होती. तेव्हाच्या देशद्रोह्यांनी किंवा शत्रुंनी आर्थिक संपत्ती वारेमाप लुटली असेल कदाचित, पण तेव्हाच्या भारतीय जनतेची स्वाभिमान, स्वावलंबन, प्रामाणिकपणा, माणुसकी, स्वराष्ट्राबद्दलचं प्रेम वगैरे वगैरे सारखी संपत्ती नाही लुटू शकले. म्हणून हिंदुस्थान एवढे वर्ष तग धरून उभा आहे. पण गेल्या साठ वर्षात गांधी-नेहरू कुटुंबाला जे रान मोकळं मिळालंय त्यांनी पार आपला बोऱ्याच वाजवलाय.

आपण जनताही या सगळ्याला मोठ्या प्रमाणात जबाबदार आहोत. आपण कधीच सामुहीक बहिष्कार नाही घातला. उभं बॉलिवुड अंडरवल्डच्या पैश्यावर आपलं मनोरंजन करतंय हे अनेकदा सिद्ध झालंय आणि आपणा सर्वांना ते ठाऊक असूनही आपण सर्व सिनेमे बघतो. ज्या माणसाला या देशाची फिकीर नाही त्या माणसाचे पैसे ज्या सिनेमाला लागले आहेत तो सिनेमा आपण का बघावा? आणि का त्याला दुप्पट पैसा कमवू द्यावा? इथल्या कित्येक कलाकारांवर देशद्रोहाचा आरोप झालाय. आधी देशाचा नागरिक मग कलाकार. आपण अश्या कलाकारांना डोक्यावर घेतो. कोणताही माणूस कितीही मोठा कलाकार, व्यावसायिक किंवा आणि कोणी असेल तो देशापेक्षा मोठा नाही. याची आपल्याला जाणीव असायला हवी. पाकिस्थानी गायक असतील चांगले गात कोण नाकारतंय पण त्यांनी त्यांची कला तिथे सादर करावी आणि नाव कमवावं. इमान पाकिस्तानशी राखायचा आणि पोट भारतात भरायचं, ही कोणती तऱ्हा? आपण या कलाकारांवर बहिष्कार टाकायला हवा. स्वदेशीच्या बाबतीत आपण आग्रही नसतो. स्वदेशी हे ब्रिटिशांविरोधी प्रभावी शस्त्र होतं हा इतिहास आपण विसरतोय. इथली प्रोडक्ट्स निकृष्ट दर्जाची असतात असा आपण ओरड करतो, पण MADE IN CHINA वाली प्रोडक्ट्स तरी अप्रतिम असतात का? पण त्यांनी इथलंच काय जगातला बाजार ताब्यात घेतला आहे.

असो, सगळं सुन्नं करणारं आहे. इथे सुधारण्यासारखं खुप आहे. आपापल्या ऑफिसात Team Lead बनण्यासाठी राजकारण करणारे हुशार लोक चांगल्या गोष्टी घडाव्यात म्हणुन, देशात सुधारणा व्हावी म्हणून समाजाच्या काही भागाचं नेतृत्व मिळवण्यासाठी का नाही असे तडफडंत? सगळा जोशंच गेलाय समाजातला. आता या घडीला मी देशातल्या पुरूष, स्त्रीया आणि तृतीय पंथी यांच्यात भेदच करू शकत नाहीये. मला सगळे हिजडेच दिसताएत. इथे तृतीय पंथीयांच्या नैसर्गिक व्यंगाची खिल्ली उडवण्याचा हेतु नाहीये. पण आपण चीनच्या मागोमाग इतर कोणत्याही बाबती प्रगती करत नसलो तरी लोकसंख्या वाढीच्या बाबतीत मात्र आपण चीनच्या पावलावर पाऊल ठेवतोय. किंबहुना आपलं पाऊल त्यांच्याहुन वेगाने चाललंय. पण बॉस २-४ पोरं काढून बाप झाल्याने कोणाची मर्दान्गी सिद्ध होत नाही ना!!