Friday, June 27, 2008

अध्याय चार - ओळख

नाव तिचे कळले । गावही ते समजले ।
परी मजला न उमगले । ओळख कैसी करावी ॥

कधी वाटॆ जावे समोर । बोलून टाकावे खरोखर ।
की "तुझ्यापायी माझा मनमोर । नाचे ताथै ताथै" ॥

कशास करावी घाई । का पाऊल टाकावे आततायी ।
ससा-कासवाच्या सशापायी । का करावे वर्तन? ॥

ओळख तिच्याशी होताच । छंद तिचा समजताच ।
पोहोचू तिच्यापाशी साच । नि:संशय आपण ॥

पर छंद तिचा कसा कळावा? । हाच प्रश्न का मज छळावा?
खूप ह्यावर विचार केला । बुद्धी काही चालेना ।

सखीस तिच्या गाठावे का ?। खरेखुरे सांगावे का? ।
मदतीसाठी मागावे का? । हात तिचा ऐसे वाटे ।

परी सखी तिची नेमकी । मैत्रिण निघाली खमकी ।
होणार गोची , हे चमकी । लगेच अमुच्या टाळक्यात ।

तोही विचार बारगळला । वाटे उत्साहही गळला ।
परि दुसरा विचार उजळला । अमुच्या सुपिक टाळक्यात ॥

नाव ठाऊक होते मला । गाठण्यास शीघ्र तिला ।
ऑर्कट आले मदतीला । आभार त्याचे मानतो मी ॥

पाठवून १-२ स्क्रॅप । ओळख झाली आपोआप ।
मैत्रीचा केला पुढे हात । पाठवून विनंती मैत्रीची ॥

जाणून घेतले तिचे छंद । मीही बाणवले तिचे छंद ।
अंगी जोपासले तिचे छंद । तिला खुष करण्यास ॥

मग तिला हळूच । सांगितले वेळ बघून ।
आपण एका कॉलेजात । शिकतो हे अभिमानाने ॥

ती फार खूष झाली । भेटण्यास आतुरली ।
म्हणे उद्या सकाळी । भेटू आपण कॉलेजा ॥

देवघेव नंबराची । करूनिया संपर्काची ।
तयारी चढण्या पायरीची । केली पहिल्या प्रेमाच्या ॥

दुस-या दिवशी प्रभाती । उत्साह तो माझ्याप्रती ।
रक्तामधून धावती । आतुरलो तिला भेटाया ॥

इतक्यात माझ्या खिश्यात । मोबाईल भुरभुरला जोरात ।
'कॅटीनमध्ये भेटण्याप्रत । ये ' ऐसा निरोप तियेचा ॥

पहिले लेक्चर बुडवोनी । कॅंटीनमध्ये बैसोनी ।
होती डोळा लावूनी । माझ्या येण्याकडे ॥

तिला मी पाहिले । काहूर मनी उठले ।
तिला पाहून मी केले । स्मितहास्य समाधानी ॥

सकाळच्या वातावरणी । होती ती ताजीतवानी ।
मोहक, सुंदर, सात्त्विक परिणी । ह्रदय माझे धडधडे ॥

करून थोड्या गप्पा-टप्पा । सोबत घेऊन कॉफीच्या कपा ।
उघडू लागलॊ एकेक कप्पा । ती आपल्या मनाचा ॥

पोरगी एकदम बडबडी । मनानी मोकळी ढाकळी ।
जणू कमळाची पाकळी । आहेच की ऐसे वाटे ॥

मैत्री झाली निरंतर । संपुन गेले सगळे अंतर ।
खुष झाली मजवर । नियती ऐसे दिसते ॥

आभार त्या देवाचे । ज्याने जोडले अमुचे ।
नाते घट्ट साचे । कॄतञता दाटली मनी ॥

No comments: