Friday, June 20, 2008

म्यॅंव.....


पु. ल. देशपांड्यांनी, प्राण्यांमध्ये सर्वाधिक उच्छाद जर कोणत्या प्राण्याचा असेल तर तो प्राणी म्हणजे मांजर, ह्या त्यांच्या पाळीव प्राणीमधल्या ह्या मताशी थोड्या प्रमाणात सहमत आहे. कारण १९९८ पासून आज आमच्या घरात मांजरांच्या तीन पिढ्या नांदून गेल्या आहेत. तिसऱ्या पिढीतला शेवटचा पुरावा शेवटची काही वर्षं जगत आहे.

मी शाळेत होतो तेव्हा. उन्हाळ्याची सुट्टी होती. सकाळी ३-४ तास खाली खेळून घरी आलो, तर दारात एका मांजरीने तिची १-२ महिन्यांची पिल्लं आणुन ठेवली होती. आणि मी आलो तेव्हा ती बया स्वतःच अंग चाटण्यात मश्गुल होती , बया म्हणजे मांजर. तिची पिल्लं एकमेकांशी खेळत होती, मस्ती करत होती, एकमेकांना खोटं खोटं चावत होती, त्यातलं एखाद पिल्लू मध्येच काहीतरी पकडल्याचा हावभाव करायचं... अश्या एक आणि अनेक प्रकारे त्यांच्या टिवल्याबावल्या चालल्या होत्या. अर्थातच मला त्या पिल्लांनी आकॄष्ट केलं. तिथेच त्यांच्याशी खेळत बसायलाही मी तयार होतो. पण माझ्या पोटातही भुकेने खेळ मांडलेला होता. म्हणून मी घरात आलो.

जेवतानाही मनाला शांतपणा कुठे? कधी एकदा जेवण संपवून त्यान पिलांशी खेळतोय अस झालं होतं. त्याप्रमाणे जेवून केरसुणीची एक बारीक काडी घेतली आणि सेफ्टी डोअर आणि उंबरठा ह्यांच्यातल्या छोट्याश्या फटीतुन मी ती काडी थोडी बाहेर काढुन हलवायला लागलो. पिल्लं झोपलेली होती. पण जमिनीवर कसलातरी आवाज येतोय हे बघुन त्यांनी कान टवकारले आणि आवाजाच्या दिशेने बघू लागली. जशी काडी हलेल तितक्याच चपळाईने त्यांच्या माना हलत होत्या, हे तेव्हा मला फार मजेशी वाटलं. झोपेमुळे ती जरा आळसावलेली होती. थोड्यावेळाने मीही काडी हलवायची थांबवली. तसं त्यातल एक पिल्लू उठलं. नाक उडवत काठीपासून सावधपणे थोड्या दूर उभं राहिलं आणि हळुच एक डावली मारून पहिली. त्याने जशी डावली मारली तशी मीही नकळत काठी मागे घेतली आणि त्यान उंच आणि 'reverse' उडी मारली. आणि परत ते सावरलं आणि सावध झालं. मग त्याच्याबरोबरची अजून दोन पिल्लंही उठली. आणि मग एकाच काडीच्या मागे तिन्ही पिल्लं पळायला लागली. आळस कुठच्या कुठे पळाला त्यांचा. पिल्लांमधला हा खेळकरपणा आणि चळवळेपणा प्रचंड भावतो.

हळुहळु रोज त्यांच्याशी खेळणं हा एक दिनचर्येतला भागच झाला. मग खेळून खेळून दमली असतील बिचारी दूध देऊ त्यांना. असं म्हणत म्हणत तोही एक दिनचर्येतलाच भाग झाला. आणि अश्याच एके दिवशी त्यांचा गृहप्रवेशही झाला. मग त्यांच ह्याखोलीतुन त्याखोलीत पळणं. एक टि-पॉय बसून आणि दुसरं टि-पॉयच्या खाली बसून एकमेकांना डावल्या मारणं, त्यात लपाछुपी खेळणं, पकडापकडी खेळणं असे अनेकविध खेळ ती पिल्लं खेळत असत. मग जरा मोठी झाल्यावर त्यांच्या आईचं म्हणजे मन्नम्माचं पिल्लांवर फिसरकारणं आणि स्वावलंबनासाठी कठोर होऊन त्यांना आपल्यापासून दूर ठेवणं असले प्रकार सुरू झाले. आणि आम्हाला आईने अशी दूर केलेली पिल्लं अजुनच केविलवाणी वाटली. त्यात त्यांच ओरडणं अजुनच केविलवाणं. मग पायात घूटमळणं, आपल्या पायांवर अंग झोकून देणं, आणि दूधासाठी आपल्याला लाडीगोडी लावणं, ह्या सगळ्याचा अखेरीस लळा लागू लागला. आणि ती मांजरं आमच्या घरातला एक भागच झाला. अजून काही दिवसांनी त्या पिल्लांची मोठ्या मांजरींमध्ये गणती व्हायला लागली. मोठी झाल्यावर त्यांच एकमेकांवरचं प्रेम गळून पडलं आणि ती एकमेकांशी भांडायला लागली आणि मग आमच्या घरातून त्यांची हकालपट्टी झाली.

त्यानंतर मन्नम्माने आणखी एकदा ३ पिल्लांना जन्म दिला, आणि परत आमच्या इथे आणून ठेवलं. आणि परत तोच खेळ सुरू झाला. त्यांच्यातलं एक पिल्लू अतिशय अशक्त होतं आणि पुढच्या ४-५ दिवसातच त्याची ह्या मोहमायेतून सुटका झाली. आणि ही २ पिल्ल परत आमच्या घरात आली. अतिशय गुटगुटीत अशी ती पिल्लं दुडूदुडू धावायची तेव्हा मजा वाटायची. काही दिवसांनी ह्यातल्याच एका पिल्लाला म्हणजेच मांजरीला २ पिल्लं झाली. आणि आधीच्या पिढीतल्या मांजरींना झालेली पिल्ल, अशी मिळून एकूण १८ मांजरं आमच्या सोसायटीत आनंदाने नांदू लागली. आणि त्यांचा सुळसुळाट सुरू झाला. कोणत्याही विंगच्या कोणत्याही मजल्यावर, कोणाच्या घरासमोर घाण करून ठेवणं वगैरे प्रकार सुरू झाली आणि ती मांजरं उच्छाद म्हणून ओळखली जाऊ लागली. कोणीतरी हरामखोर त्यांना खाण्यातून विष देऊ लागलं आणि त्यात ९ मांजरांची मोहमायेतून सुटका झाली. आमच्या घरात २ मांजरी अखंड राहू लागल्या. त्यांना घरातून बाहेर जायची परमिशन मिळाली नव्हती माझ्या आई आणि बहिणीकडून. सोसायटीतल्या आणखी एका मांजरीला झालेली पिल्लं आमच्या खालच्या आजींच्या घराबाहेर खेळत होती. २ महिन्यांच्या एका पिल्लाला त्या आजीनी एकदा काठी मारली आणि त्याचा पाय मोडलां. त्याच्याबरोबरची पिल्लं खेळायची नी हे नुसतं बघत बसायचं. मग माझ्या बहिणीनी आणि शेजारच्या मुलीनी त्या पिल्लाला डॉक्टरांकडे नेलं. आणि पायाला प्लास्टर बांधून आणलं. ऍनिमल वेल्फेअर मधून एक नोटिस लिहून आणली आणि सोसायटीच्या हापिसात सादर केली. आणि प्राण्यांना मारल्यानंतर होणाऱ्या परिणामांची माहिती मिळताच सगळ्यांचे धाबे दणाणले. मग ते मोडक्या पायाचं पिल्लूही आमच्याच घरात राहू लागलं. दरम्यान कित्येक मांजरींना त्यांच्या आवडत्या ठिकाणी म्हणजे मच्छीबाजारात सोडलं.

पण आमच्या घरातला उच्छाद तसाच होता. पिल्ल जरा मोठी होऊदेत. मग पावसाळा संपल्यावर सोडू बाहेर. ती जरा मोठी झाल्यावर भांडायला लागतील, तेव्हा सोडू बाहेर अशी निरनिराळ्या कारणांनी ती ८ वर्ष घरातच राहिली. आणि तो प्राणी खरंच जितका लळा लावतो तेवढाच आपला छळही करतो. निसर्गाच्या हाकेला ओ देण्यासाठी कुठले कुठले कोपरे शोधणे आणि घाण करणे, वगैरे अनेक प्रकारे आमचा छळ झाला आमचा त्यांच्याकडून. आमच्या गॅलरीत लावलेल्या दुर्वा गणपतीपेक्षा मांजरीच जास्त खातात. नखं साफ़ करण्यासाठी ठिकठिकाणी ओरबाडून आमचे सोफे खराब केले त्या कारट्यांनी.

असो, १ मांजर २ वर्षांपूर्वी ढगात गेली. ढगासारखीच पांढरी शुभ्र होती ती. मांजरींच मरण जवळ येत तेव्हा त्या घर सोडून निघून जातात. त्या मरताना कोणाला दिसत नाहीत. पण मी मांजर आचके देत मरताना पाहिलंय. अतिशय वाईट वाटलं तेव्हा. दुसऱ्या मांजरीला आम्ही भल्या पहाटे तिच्या आवडत्या ठिकाणी सोडलं. अजून एक अतिशय वयस्कर मांजर आमच्या घरात आहे. जेवढा तिचा लळा लागला तेवढाच मांजरींचा कंटाळाही आला आता. तरीही भविष्यात कुठेही मांजर दिसली की आमच्याकडच्या मांजरी आठवल्याशिवाय राहाणार नाही.

No comments: