Sunday, July 27, 2008

अध्याय नऊ - मोर्चेबांधणी...

श्रोते तुम्हास दंडवत । माझा तुम्हास साक्षात ।
सद्भाव असल्या मनात । भगवंत येतो मदतीला ॥

त्याची प्रचिती तुम्हास । कथिली मागील भागास ।
`ती"च्या पूर्ण मनास । मी होते जिंकिले ॥

माझा सद्भाव एकदाचा । `ती'च्या ध्यानी आला साचा ।
अंतिम विजय सत्याचा । हा न्याय खरा असे ॥

`ती'ला माझा विश्वास । वाटू लागला खास ।
माझा तिला लागला ध्यास । अंदाज मम आला ॥

संपर्क राती-बेराती । करू लागली निर्धास्ती ।
शंका-निरसनाप्रती । दूर कराया कारणे ॥

कित्येक मिस्ड कॉल देई । एसेमेस करी तेही ।
झोपू न देई निशी । पाठवून मेसेज भावुक ॥

माझा निश्चय दॄढ झाला । वाटे हिच्या मनाला ।
आला प्रेमाचा उमाळा । आता आपण जाऊ पुढे ॥

परी धीर होईना । पुढे मजला जाववेना ।
वाटे मनींच्या कामना । कळो हिला नकळत ॥

`ती' येता समोर । बावरे होई मन ।
जैसे की ते मांजर । घुटमळणारे पायात ॥

मी करे निश्चय । आता बोलावे आपण ।
कशी करावी सुरुवात पण । हाची असे प्रश्न मज ॥

कित्येक पत्रे लिहिली । आणि फाडून टाकिली ।
मनाप्रमाणे नाही झाली । बांधणी पत्राची हे समजताच ॥

`ती' आपल्याबद्दल । काय विचार करेल ।
हाच एक सवाल । छेडीत होता मजला ॥

`ती'च्या मनी नसेल काही । अन होईल अपुली फजिती ।
लागून राहिली ही भीती । कसे दूर करावे ती ॥

रोज मी विचार करी । आज हिला सांगू खरी ।
भावना मनीची सारी । आपल्या गोड वैखरीने ॥

विचार हा येता मना । पोटात येई मोठा गोळा ।
कुठूनसा मोठा भला । कावलो मी तयाला ॥

ओळख होऊन आज । गेले भुर्रकन षट्मास ।
गाडी नव्हती आसपास । माझ्या ध्येयाच्या ॥

मोर्चेबांधणी माझी । सुरूच राहिली साची ।
बात माझ्या प्रेमाची । राहिली तिथल्या तिथेच ॥

Tuesday, July 22, 2008

अध्याय आठ - उपरती

श्रोते सस्नेह वंदे । योजुनी छलिकेचे धंदे ।
भरले आम्ही कांदे । हितशत्रुंच्या डोस्क्यात ॥

छलिकेची पायरी । चढलो एक सोडून वरी ।
आता गंमत आली खरी । ऐका जरा श्रोते ॥

एकदा माझ्या सदनी । ह्या मंडळीस बोलावूनी ।
केली गाणी-बजावणी । खिशात टाकले सा-यांसी ॥

‘ती’ही एकदम चपापली । आदराने पाहू लागली ।
नजर ‘ती’ची जरा न हलली । माझ्यावरून यत्किंचित ॥

माझ्या हितशत्रुंना । एकही कला अवगत ना ।
समाधान माझ्या मना । वाटले तेव्हा अनंत ॥

त्यानंतर बरेचदा । घरी बोलावले एकमेकां ।
पार्ट्या केल्या ओल्या-सुक्या । आम्ही सोबतच ॥

म्होरक्याने त्यांच्या । एकदा बोलावले आम्हाला ।
घरी त्याच्या जेवायला । एकटा असल्याकारणे ॥

ऐनवेळी मी दिली । त्याला टांग भली ।
माझ्याविना इतरांनीही । जाण्यास नकार दिला ॥

परी ‘ती’ला जायचे । होते त्याच्या घरी साचे ।
त्यासाठी ‘ती’ अमुचे । पाय धरू लागली ॥

शेवटी ‘ती’ रागावून । त्यांच्यासमवेत निघून ।
गेली आम्हास टाकून । म्हणले बिघडले पाखरू ॥

परी ‘ती’चे जाणे । होते माझ्या खेळाप्रमाणे ।
कारण ठरले होते करणे । पार्टी तिथे ओली ॥

ऐनवळी मी मुलींना । बोलावले त्याच्या सदना ।
आणि नकार दिला जाण्या । धुडकावूनी तया आमंत्रणा ॥

कारण कार्टे होते निर्लज्ज । ‘ती’च्यासमोर होतिल सज्ज ।
घेऊन हातात ग्लास । भरूनीया सोमरसाचे ॥

मला त्यांच्यावर । होता पूर्ण विश्वास ।
माझ्या अपेक्षेनुसार ।ते वागणार हे निश्चित ॥

‘ती’ गेल्यावर एक तास । होतो आम्ही कॉलेजास ।
चिंता होती माझ्या मनास । काय करत असेल ‘ती’?

आणि पुढच्या पाव तासात । रडत रडत ‘ती’ आली आत ।
शब्द न येई मुखात । ‘ती’च्या काही केल्या ॥

शिरली सखीच्या मिठीत । पाणी अखंड नेत्रांत ।
होते नाक फुरफुरत । लाल झाली रडून ‘ती’ ॥

मीही गेलो जवळ । करावयासी सांत्वन |
करून मोठे धाडस । काय झाले विचारले ॥

माझ्याकडे बघुनी । ओलावलेल्या डोळ्यांनी ।
जोरात मजला बिलगुनी । रडली ती हमसून ॥

चूक तिजला उमगली । मैत्रीस मात्र ती जागली ।
ना माफी मागितली । झाली अमुची ‘ती’ परत ॥

पूर्वीसारखी ‘ती’ । वागू लागली परत ‘ती’
भेटली जुनी ‘ती’ । त्या ‘ती’ला तोड नाही ॥

Thursday, July 17, 2008

अध्याय सात - छलिका

श्रोतेहो नमस्कार । मानतो मी आभार ।
तव आशीर्वादे आकार । घेतला कथेने इथवर ॥

श्रोतेहो ‘ती’ज रक्षण्या । करण्या रिपुंच्या कण्या ।
डाव अमुचा योजिण्या । चालवली अमुची बुद्धी ॥

‘ती’ला जिंकिले होते त्यांनी । भुरळ ‘ती’जवर घालोनी ।
थोडे दूर मजपासोनी । केले तयांनी मम पाखरा ॥

जिंकण्यासी पुन्हा ‘ती’ला । रिपुंस दूर लोटण्याला ।
युक्तीस माझ्या चालवण्याला । भाग होते निश्चित ॥

लावण्यासी त्यांची वाट । शोधणे मज वहिवाट ।
आगळी अन बिकट । अनिवार्य होते जनहो ॥

एक गोष्ट निश्चित । ध्यानी आली खचित ।
रिपुंशी त्या मजप्रत । मैत्री करणे भाग असे ॥

मित्रच एका मित्राची । वाट लावू शकतो साची ।
शत्रुस एक मित्रचि । घातक बनू शकतो खरा ॥

ह्या सर्व प्रकारात । साथ होती मजप्रत ।
सवंगड्यांची सोबत । अखंड ती सुदैवे ॥

आम्ही करतसू लबाड्या । काढतसू ‘ती’च्या खोड्या ।
बोलवतसू ‘ती’च्या सवंगड्या । नेहमी अमुच्यासमवेत ॥

दोन-तीनदा काही सिनेमे । पाहिले आम्ही त्यांच्यासंगे ।
अमुच्या मैत्रीची सोंगे । ध्यानी न येती तयांच्या ॥

कधीतरी पिझ्झा हटात । कधीतरी इनॉर्बिटात ।
घेतसू त्यांसी संगत । अमुच्याही अधेमधे ॥

अशाप्रकारे एक मास । आम्ही खर्चिला खास ।
मिळविण्या ‘ती’चा विश्वास । काय न आम्ही केले ॥

रिपुंचा विश्वास होताच । ‘ती’चाही झाला मिळताच ।
धन्यता लाभली साच । थोडी माझ्या जीवा ॥

राजकारण हे अमुचे । खटकेल कोणासही साचे ।
परी हेतु होते अमु्चे । चांगलेच निश्चित ॥

ह्या असल्या खेळास । कोणाचे चांगले होण्यास ।
खेळलेल्या राजकारणास । छलिकाविद्या नाव असे ॥

तब्बल चार सहली । त्यांच्यासमवेत केल्या आम्ही ।
तेथे फूस लावली । त्यांना व्यसने करण्यास ॥

अर्थात आम्ही होतो दूर । नाही काढला जरा धू्र ।
आमचा हा आगळा नूर । कळलाच नाही कवणाला ॥

अशाप्रकारे अमुची । साधना छलिकाविद्येची ।
चालूच राहिली साची । काही दिसांसाठी ॥

ह्यापुढील पायरी । आम्ही गाठली लवकरी ।
कळवू त्याची मात सारी । लवकरच तुम्हासी ॥

तत्पूर्वी आपला । निरोप घेणे भाग मला ।
सदिच्छा त्या अपुल्या । सदैव पाठीशी असुद्या ॥

Friday, July 11, 2008

अध्याय सहा - समजुतीची ऐशी तैशी

श्रोते मागे म्हटल्यागत । जे होते अभिप्रेत ।
तेच घडून होते येत । माझ्या `ती'च्या बाबतीत ॥

मैत्री दिनाच्या दिशी । मैत्री झाली अनेकांविशी ।
जो तो उडवून दाखवे मिशी । आपुली हिच्यापुढे ॥

मी त्या सर्वांविषयी । हिला बोललो त्याच समयी ।
हि मंडळी मोहमायी । जाळे टाकेल तुजवर ॥

तिला हे रुचले ना । माझे बोलणे पटले ना ।
तिने माझे ऐकले ना । त्यांना बोलवी आमच्यात ॥

अमुच्या छान कंपुत । ते होते आगंतुक ।
तिची मोकळी वागणूक । पसंत होति तयांना ॥

माझे सर्व सवंगडी । तिची एक सखी बापडी ।
ह्यांनी घालून पाहिली काडी । ही आणि त्यांच्यात ॥

हिला समजले । आमचे हेत उमजले ।
परी ना गवसले । हित तिचे त्यातले ॥

उलट तिने आम्हांस । पाडले उलटे खोट्यात ।
हरतऱ्हेने समजूत । काढून पाहिली तिची ॥

सारे यत्न व्यर्थ गेले । उलट मन तिचे वळले ।
त्यांच्या बाजूने गेले । त्यांचे आयते फावले ॥

म्हटले मी इतरांस । आता आपण करू बास ।
अपुल्या बोलण्याची आस । हिला नाही समजत ॥

स्वानुभव खरा शिक्षक । तोच तो समीक्षक ।
तोच होईल रक्षक । आपण गुमान बसावे ॥

तिला आम्ही म्हणले । जे मनास पटले ।
जे मनास रुचले । तेच फक्त कर तू ॥

शेवटी तेच तुझे मैत्र । अमुच्यासकट सर्वत्र ।
आहेत तुझे सावत्र । साथ न सोड तयांची ॥

उपहास माझ्या बोलण्यात । न आला तिच्या ध्यानात ।
होती अखंड धुंदीत । हात टेकले सर्वांनी ॥

समजुत तिची काढण्याची । तसदी नाही घ्यायची ।
खुणगाठ बांधिली साची । ही आम्ही अखेर ॥

Wednesday, July 2, 2008

अध्याय पाच - वाटे हुरहुर....

श्रोतेजनहो ऐका आता । माझ्या `ती'ची गाथा ।
मध्यावर आली कथा ।ह्या 'ती'पुराणाची ॥

मैत्री अमुची होती छान । तिजसंगे मी विसरे भान ।
तिची संगत होती शान । मजसाठी जनहो ॥

तो दिवस कठिण । मजसाठी अतोनात ।
ती होती अखंड व्यस्त । मुलांच्या गराड्यात ॥

दिन तो मैत्रीचा । लाडका कॉलेजविश्वाचा ।
मजसाठी परीक्षेचा । काय सांगू तुम्हासी?

मैत्री करण्या खरोखर । दोस्तहो तिच्याबरोबर ।
अश्याच दिसाची जरूर । हवी होती पोरांना ॥

ती संधी सुंदर । चालून आली अखेर ।
पोरांनी तो घातला घेर । पक्का हिच्याभोवती ॥

हिच्या सुंदर दिसण्यावर । फिदा होते सर्वजण ।
करीत असत वणवण । अखंड हिच्यामागे ॥

ती वणवण त्यांची । थांबणार होती साची ।
होणार होती कायमची । मैत्री हिच्यासंगे ॥

अंग हिचे सारे । नावांनी भरलेले ।
ज्याने त्याने लिहिलेले । नाव तिच्या हातावर ॥

कोणी लिही हातावर । कोणी लिहि गालावर ।
कोणी लिहि तळव्यावर । सांगायची सोय ना ॥

हात तिचा भरलेला । फ़्रेंडशीप बॅंड लाल, निळा ।
हाती तिच्या बांधलेला । कोणी कोणी राम जाणे ॥

हिच्याबरोबर मी होतो जरी । अमुच्यामध्ये होती दुरी ।
जनता होती सारी । हिच्याभोवती अविरत ॥

मीही थोडा विचार केला । आजच्या ह्या सुदिनाला ।
वाचा फोडावी प्रेमाला । अपुल्या एकदाची ॥

धीर मात्र होईना । तिच्या समोर जाववेना ।
नजरही भिडवण्यास होईना । धाडस मला इवलेसे ॥

छाती माझी तेधवा । उडू लागली धडधडा ।
वाटे जैसे हुडहुडा । भरला असे थंडीचा ॥

दिवसाच्या शेवटी । मोकळी झाली अखेर ती ।
गोड हसून माझ्याशी । येऊन बसली ती ॥

आता म्हटलं सांगाव । गुपित आपल्या मनींचं ।
परी साधं बोलण्याचं । तेही धारिष्ट्य होईना ॥

म्हटल आता जाऊ दे । आपल्या प्रेमाचं राहू दे ।
मैत्रीच अपुली टिकू दे । तूर्तास म्हणजे मिळवलं ॥

आजच्या ह्या दिवसात । अनेक आले मार्गात ।
कसेही करून हिच्या नजरेत । आपल्यास मोठे व्हायचे ॥

असा विचार करून । तिला घरी सोडून ।
मनात थोडा हुरहुरून । अखेर घरी पोचलो ॥