Wednesday, August 15, 2007

बाळ गंगाधर टिळक


हे शीर्षक वाचुन तुम्ही म्हणाल,'टिळक ना? महान माणूस होता माहिती आहे! पण च्यायला हा काय नविन सांगणार आहे आता टिळकांबद्द्ल?'

नाव : बाळ गंगाधर टिळक
जन्मदिन : २३-०७-१८५६
स्थळ : चिखलगाव, रत्नांगिरी.

'हुर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र, हे आम्हालाही माहिती होतं(चक्क!). १ ऑगस्ट १९२० रोजी ते पंचत्वास विलीन झाले. प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता तेव्हा मुंबईत त्यांच्या अंत्ययात्रेला. youtube वर पाहिलाय हो आम्ही त्यांचा video.'

माणूस खरंच ज्ञानी होता हा पण! त्यांचे गुरु, केरुनाना छत्रे त्यांना सूर्याचं पिल्लू म्हणायचे. बुद्धीचं तेज होतंच त्यांच्या तसं. सामान्य माणूस उजव्या मेंदुचा उपयोग फार कमी करतो. शास्त्रज्ञ १०-१५% करतात. लोकमान्यांनी २४% केला.......

गणितात तर त्यांचा व्यासंग होताच, त्याशिवाय राजकारण, तत्त्वज्ञान, खगोलशास्त्र, लेखन,न्यायशास्त्र, सनातन धर्मग्रंथांचा अभ्यास, त्यावर सखोल विचार व लेखन...एक ना दोन!

टिळक मुंबईला ज्या मित्राकडे राहायचे तो वैद्यकशास्त्र शिकायचा. त्याच्या घरी बसुन हेही जीवशास्त्रात घुसले. एकदा disection साठी बैलाच ह्रदय घेऊन आले. तेव्हा मात्र त्या मित्राने लोकमान्यांना गणितातंच व्यासंग करण्याचा प्रेमळ सल्ला दिला. असो!

टिळक जर शे-सव्वाशे वर्ष उशिरा जन्मले असते तर?
त्यांची शेंगांची गोष्ट आज आम्हाला सांगितली गेली नसती. ते लोकमान्य ह्या नावाने प्रसिद्ध झाले नसते. 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!' असं लहान मुलांना १५ ऑगस्ट किंवा २६ जानेवारीच्या भाषणात सांगायची संधी मिळाली नसती! बिचारे..... एक सच्चा नेता हरवून बसले असते!!
सार्वजनिक गणेशोत्सव झाले असते? शिवजयंतीवरुन वादही झाले नसते, कारण तोही उत्सव कदाचित टिळकांनी सुरु केला नसता. आणि इतर सुपीक टाळक्यांच्या डोक्यातही आलं नसतं. सावरकर,चाफेकरबंधुंसारख्या कट्टर हिंदुत्ववाद्यांनी कोणाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला असता?

केसरी निघाला नसता,त्यातील पाश्चिमात्त्यांना हादरवून टाकणा-या अग्रलेखांना आज सगळे मुकले असते. गीतारहस्य,The arctic home in vedas वगैरेसारखे अव्वल दर्जाचे ग्रंथ लिहिले गेले नसते. गीतेवर टिका करणारे पुष्कळ आहेत. पण त्यातला योग्य अर्थ कोणी सांगितला असता?

आज टिळक असते आणि जर ते राजकारणात असते तर? भल्याभल्यांची शब्दांनी मुंडीच मुरगळली असती त्यांनी! कदाचित ते राजकारणात टिकलेही नसते. विवेक नक्कीच जागृत राहिला असता त्यांचा. भ्रष्टाचार,लाचारी,स्वाभिमानाचा अभाव ह्या दुर्गुणांविरुद्ध कडक शब्दात टिका केली असती. एकीकडे टिळक आणि दुसरीकडे उरलेले राजकारणी असा देखावा झाला असता. कारण टिळक एकटेच मनापासून जनतेसाठी झटले असते.

आज टिळक जर I.T. मध्ये असते तर? Software,hardware आणि network ह्या तीन शाखांमध्ये विभागल्या गेलेल्या ह्या क्षेत्रात टिळक तीनही विभागात गुरु झाले असते. कित्येक नवनवीन codes लिहिले असते त्यांनी. नवीन hardware configurations शोधली असती, आणि कित्येक नवीन topologies शोधल्या असत्या. भारतीय IT मध्ये कितीही पुढे असले तरी अजुन ते स्वतःची programming langauge बनवू शकले नाहीत. टिळकांनी कदाचित तीही बनवली असती. कारण कोणत्याही विषयाच्या मुळाशी हात घालायचा स्वभावंच होता त्यांचा!!

किंवा कदाचित टिळक न्यायशास्त्रातही गेले असते. तसं झालं असतं तर किती न्याय्य कायदे बनवले गेले असते! जुने पुराणे इंग्रजांच्या काळातले कायदे कदाचित आज वापरलेच गेले नसते, कारण इतिहासात टिळकांनी, हिंदुधर्माबद्द्ल इंग्रजांनी कायदे करण्याच्या विरुद्ध उठवलेल्या आवाजाचे दाखले आहेत. जातीवाद वाढवणा-या कायद्यांना तर टिळकांनी आवर्जुन विरोध केला असता.

असो, ह्या सगळ्या त्यांच्या आजच्या अस्तित्वाविषयीच्या कल्पना सोडल्या तरीही आज त्यांच अस्तित्व ही काळाची गरज आहे. टिळक स्वर्गातून हे सगळ बघत असतील तर रडतील का? छे, रडणं हा त्यांचा स्वभाव नाही. गीतेवर एवढा सखोल विचार केलेला माणूस मार्ग शोधेल, रडणार नाही. लोकमान्य,खरंच तुम्ही परत या हो!! देश आज जरी स्वतंत्र झाला असला तरीही समाज अजूनही अज्ञान,गरीबी,भ्रष्टाचार,लाचारी,पक्षपात,जातीवाद,धर्मवाद,अप्रामाणिकपणा,स्वार्थी राजकीय पक्ष ह्यांच्या विळ्ख्यात अडकून पडलाय. ह्या सगळ्या शत्रुंपासून मुक्त करण्यासाठी तुमच्यासारखाच खंबीर,बुद्धीजीवी नेता हवाय हो देशाला. देशासाठी रक्ताचं पाणी करणारा नेता हवाय. इथे आधीच सगळ्यांची शरीरे थंडगार पाण्यानी भरलेली आहेत!!! रक्ताची तर बात सोडाच...