Wednesday, March 28, 2007

भगवंताची प्राप्ती

१० मार्च, रात्री ८.४० वाजता मुंबई-नागपून विदर्भ एक्सप्रेस कल्याण स्टेशनवर येणार होती.
आम्ही आमच्या मातोश्रींनी घाई केल्याने पावणे आठलाच कल्याणला हजर!!!
५ नंबरच्या फलाटावर गाडी येणार असल्याने आम्ही तिथेच बॅगा ठेवून लोकांची गंमत बघत उभे होतो. माणसांनी तुडुंब भरलेल्या लोकल गाड्या एकीमागोमाग येत होत्या आणि तश्याच भरुन जात होत्या.

"८.३० झाले, येईल आता १० मिनिटांत गाडी." मातोश्री...

५व्या फलाटावर एक टिटवाळा आली आणि ती पुढे जाईच ना.. तिला बिचारीला हिरवा सिग्नल मिळतंच नव्हता. १०,१५,२० मिनिटं वाट पाहिली आणि शेवटी विदर्भ ६ नंबरवर लावली.

गाडी स्टेशनवर आली, आणि एका वडापाववाल्याने इंजिनाला नमस्कार केला,'आत्ता छान धंदा होऊ दे' असलं काहीतरी म्हणाला असेल.

आरक्षित जागांवर आम्ही बसलो. ५ मिनिटं थांबणारी गाडी २० मिनिटं झाली तरी हालेच ना!!! त्या वडापाववाल्याचा खरंच छान धंदा झाला असेल. थोड्या वेळाने 'आंबिवली,खडवली इथे over-head wire तुटली आहे' हे घोषित करण्यात आलं.
नेहेमीप्रमाणे या वेळीही शेगांवला जाताना प्रवासाच्या सुरुवातीलाच विघ्न आलं!

८.४०ला सुटणारी गाडी ११.०० वाजता सुटली.तब्बल २ तास २० मि. खोळंबा झाला.
पहाटे ४ ला शेगांवला पोहोचलो असतो, छानपैकी भक्त-निवासमध्ये जागा मिळाली असती, आणि शूचिर्भूत होवून ७.३० पर्यंत रांगेत आलो असतो. पण नाही. महाराज परीक्षा घेतात. जसं ठरवतो तस कधीच होत नाही. ७.३०ला गाडीच शेगावला पोहोचली. पुढे रिक्शाने भक्तनिवासावर गेलो तर ते भरलेलं. दुस-या एका हॉटेलवर २ रुम्स बूक केल्या फटकन. भराभर अंघोळी आटोपल्या, आणि एकदाचे दर्शनासाठीच्या रांगेत येउन ठाकलो. आम्ही सुरुवात केली तेव्हा ८.१५ झाले होते. रांग फार मोठी होती. अमाप भक्त येतात महाराजांच्या दर्शनाला. संस्थेने फार छान सोय केली आहे भक्तांची. सगळं काही शिस्तीने व्हावं ह्यासाठी एका मोठ्ठा हॉलचे ७-८ भाग केले आहेत. माणूस शेवटच्या भागापासून सुरुवात करुन सरकत सरकत हळूहळू पुढच्या भागात येतो. तो हॉल झाला की पुढचा हॉल!! प्रत्येक भागात भक्तांसाठी बसायला जागा आहे, जेणेकरून ३-४ तास भक्ताला उभं राहावं लागणार नाही आणि त्याच्या पायाचे तुकडे पडणार नाहीत!! रांगेतच काही लोक पोथीचं पारायण करतात, काही मुखाने जप करतात, काही नुसतेच इकडे तिकडे बघत असतात. भक्तांसाठी ठराविक अंतरावर पाणी घेउन काही स्वयंसेवक उभे असतात. त्यात काहीवेळा रांग सोडून मधेच कुठेतरी घुसायचा मोह होतो, एवढा वेळ लागतो. पण 'शिस्तीचा भंग केल्यास दर्शनाचा मंडप सोडावा लागेल' अशी पाटी दिसते, आणि वाटते,'आपण आहोत तिथे छान आहोत!'..

असेच त्या रांगेतून हळुह्ळु सरकत सरकत आम्ही दुस-या मंडपात गेलो.९.३० वाजले होते. दुस-या मंडपातून बाहेर येईपर्यंत ११ वाजले. तिथून संथगतीने पुढे सरकत होते लोक! ११.३० वाजता महाराजांची आरती सुरू झाली. महाराजांच्या जयजयकाराने आरती संपली.

आता अगदी हद्द झाली होती. तीन तासापेक्षा जास्त वेळ उभा होतो, अगदी ठरवून. बसायला जागा असूनही बसलो नव्हतो. एकतर महाराजांच्या दर्शनासाठी जीव आतूर झाला होता. कधी एकदा गाभा-यात त्या समाधीस्थानाशी येतोय अस झालं होतं!! पण अजून अर्धा तास तरी अवकाश होता त्याला. कारण रांग खुप संथपणे सरकत होती. आयुष्यात कधी केला नाही तेवढा जप त्या ३-४ तासात केला. असं ऐकलं आहे की, आपल्या आराध्यदैवताचा जप जेव्हा १ लाखापेक्षा जास्त होतो तेव्हा पत्रिकेतलं बारा घरांपैकी एक घर शुद्ध होतं. समर्थ रामदासांनी १३ कोटी जप केला होता. मी मोजला नाही पण भरपूर जप झाला त्यादिवशी. कारण तो एकच विषय डोक्यात होता.

हळूहळू करत समाधीजवळच्या रामाच्या मंदिराशी आलो आम्ही. महाराजांची रामावर नितांत श्रद्धा असावी. तिथले स्वयंसेवक ठराविक थोड्या थोड्या लोकांनाच आत सोडत होते. ज्यामुळे सगळ्यांना नीट दर्शन घेता येत होतं, बेशिस्तपणा कोस दूर होता.

मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाचं दर्शन घेतलं, आणि रांग पुढे सरकू लागली. तेवढ्यात गावातल्या कोण्या मुलाचं लग्न होतं, मुहूर्त गाठायचा म्हणून तो मध्येच घुसला, त्याचे पालक, बहीणी, इतर नातेवाईक असं लटांबरच मधे आलं. त्यात थोडा वेळ मोडला. अखेर आम्ही समाधीच्या द्वाराशी आलो. जिथे महाराजांनी समाधी घेतली, तिथेच त्यांचा देह ठेवला अन त्यावर त्यांची समाधी बांधली.

थोडं खाली उतरून आम्ही समाधीच्या अगदी समोर उभे, संगमरवरात घडवलेली महाराजांच्या मूर्तीच्या जागीच त्यांचा देह ठेवला हे वाचलं आणि खरोखरंच महाराज तिथेच बसले आहेत असं वाटलं. 'सब्रका फल मीठा होत है।' वगैरे सुविचार आठवला. तिथे त्यांच्यासमोर डोळे मिटून, हात जोडून उभा होतो, काही सुचत नव्हतं. ठरवलं होतं आत गेल्यावर खुप काही मागायचं. आपल्यासाठी, समाजासाठी. पण डोक्यातून सगळे विचारंच गेले. अगदी गहिवरल्यासारखं झालं होतं. तेवढ्यात मागून कोणीतरी जोरात ओरडलं,


"अनंत कोटी ब्रह्मांडनायक,
महाराजाधिराज, योगीराज,
सच्चिदानंद, भक्तप्रतिपालक,
शेगांवनिवासी, समर्थ सद्गुरु,
श्री गजानन महाराजकी जय"

मीहि मनात जय म्हणालो त्या ब्रह्मांडनायकासाठी.

बरोब्बर १२.१५ वाजता बाहेर आलो दर्शन घेउन. ४ तास रांगेत उभा राहिलो, तेव्हा ४ सेकंदांसाठी दर्शन लाभलं. कारण तिथले पुजारी आणि स्वयंसेवक हात जोडल्यावर लगेच,"चला चला, पुढे चला.." म्हणायला लागले. पण एकूण दर्शनासाठी कराव्या लागेलेल्या तपश्चर्येवरून, भगवंतप्राप्तीचा मार्ग किती खडतर असेल ह्याची जाणिव मला झाली. हे येरा गाबाळ्याचे काम नाही. कदाचित म्हणून रामदास स्वामी सांगून गेले-->प्रपंच करावा नेटका.......