Thursday, June 26, 2008

अध्याय दोन - शोधन

नमस्कार पु्न्हा श्रोतेजन । स्वागत तुमचे मनोमन ।
ऐकावयासी कथन । आपल्या प्रेमाचे ॥

श्रोते पहिल्या दिसानंतर । वाढत गेले अंतर ।
अमुच्यामधले निरंतर । काय बोलावे नियतीला ॥

माझे शेवटचे वर्ष विद्यालयिन । कित्येक वाया गेले दिन ।
दिसलाही नाही मजला मीन । विद्यालयाच्या भवसागरी ॥

विद्यालयात अनेक पाखरे । कैक सुंदर सुंदर चेहरे ।
परि हिच्यापरी न दुसरे । मुखकमल कोणाचे ॥

पण तो सुंदर चेहरा । एक मास मज दिसला न जरा ।
मित्र सांगती "कशास झुरा?" । त्या एका चेहऱ्यापायी ॥

माझे मनही मानेना । तिच्यावाचून रमेना ।
दुसरीकडेही बघेना । किमया हिच्या चेहऱयाची ॥

शेवटी मी केला ’पण’ । हिलाच मिळवावी आपण ।
गड्यांस म्हटले "सर्व जण" । शोधा हिला मजसाठी" ॥

गडी मैत्रीस जागले । अवघा गाव हिंडले ।
नाव,गाव शोधले । मजसाठी त्या पाखराचा ॥

कुठे येते काय करते । किती वाजता घर गाठते ।
मित्र झाले कळविते । वेळापत्रक तियेचे ॥

धन्य धन्य ते सांगाती । लावूनिया सर्व शक्ती ।
मदत केली मजप्रती । जागले अपुल्या दोस्तीला ॥

No comments: