Thursday, June 12, 2008

॥ ॐ ॥

शीर्षक फ़क्त ’ॐ’?
त्याचं कारणही तसच आहे.खाली एक फ़ोटु लावलेला दिसतोय का? दिसतोय ना?

नशीबवान आहात. नाही नाही नाही!!! अश्या चिवित्र नजरेने बघु नका screen कडे.
हा फोटु बघुन बऱ्याच जणांनी असंच चिवित्र नजरेने पाहिलं. आपापल्या बुद्धिमत्तेप्रमाणे स्वतःची मतंही मांडली.

"अरे वा! असं कसं झालं रे?"

"छे! हा त्या चाळणीवरचा ठसा तर नाही? पहिल्यापस्नंच असेल असं डिजाईन.."

"नाही रे, माझा विश्वास नाही बसत!"

"अय्या ऽऽऽऽऽऽऽऽ कॊय सुंदर नाहीऽऽऽऽ! फारच छान! पुण्यवान माणसं तुम्ही!"


अश्या प्रतिक्रिया चालू असतानाच फोन वाजतो,

"हॅलो..."
"अगं मामी ऐकली तुझाकडची चमत्कारीक घटना. तु ही चाळण घेउन येशील का ग इथे? कर्जतला?"----अपेक्षांचा कहर.

मी सेकंड शिफ्ट्ला होतो, माझा मो्बाईल भुरभुरला खिश्यात. घरुन होता फोन.

"ह्र्दयेश , अरे आपल्या बाबांनी एक चमत्कार केलाय. म्हणजे झालाय त्यांच्या नकळत."
"कसला चमत्कार?"
"दुपारी ते दळून आणलेलं पीठ चाळत होते, तर चाळणीवर अचानक ॐ उमटला"
"काऽऽऽऽय????(!!!!), असं कसं होईल?"
"मस्त नक्षीपण आलीये बाजुला कोणीतरी हाताने काढल्यागत"
"बाबांनीच काढली असेल, सिमेट्री नसेल बघ त्या नक्षीमध्ये"
"बाबांनी पहिल्यांदा चाळल्यावरंच आला तो. त्यांनी झटकला, त्यावर टिचकी मारुन पाहिली , उरलेलं ५ किलोचं पीठही चाळून झाल. तरी जस्साच्या तस्सा राहीला आहे. अमेय, बंडुकाका वगैरे पण आलेत. अमेयनी फोटो काढला आहे. आणि अनुया पण येत्ये ऑफिसमधुन, दोन मैत्रिणीपण येणारेत तिच्याबरोबर."
"बरररर!!!"

मी इथे हापिसात हैराण... म्हणलं हा काय प्रकार आहे? घरच्या चाळणीवर ॐ? अचानक उमटला? आणि तोही बाबांच्या हातुन? थोड्यावेळाने मेल्स चेक केले तर मेव्हण्याने फोटु पाठवले होते. ते पाहुन मी थक्क झालो. माझी वाचाच बंद झाली!! ११ पर्यंत कसातरी बसलो हापिसात. बसमध्ये झोपही येत नव्हती. डोक्यात एकंच...कसा आला असेल ॐ? नेमका बसचा driver ही बदलला होता, साला जाम हळू चालला होता. रात्री १२.१५ वाजता घरी पोहोचलो तर आई-बाबा दोघेही माझ्यासाठी जागे होते.

मी मुद्दाम हळुहळु आवरत होतो. मला तो ॐ दाखवण्यासाठी आई-बाबा आतुर झाले होते. पण मी सावकाश सगळ आवरत होतो. आरामात बुट काढले, बेडरूममध्ये कपडे बदलले, बाहेर येऊन हात-पाय धुतले, तोंड धुतलं. आणि स्वच्छ होऊन स्वयंपाकघरात गेलो आणि देव्हाऱ्यालगतच्या खुर्चीवरची चाळण मी पाहिली आणि मी ठार येडा झालो. ताबडतोब आईला विझलेलं तुपाचं निरंजन परत लावायला सांगितलं. आणि एक फोटु काढला, जो आज तुम्हाला इथे बघायला मिळतोय.

फोटो बघुन कोणीही काहीहि म्हणोत. ज्याने प्रत्यक्ष पाहिला आहे हा प्रकार तो हे नक्की कबूल करेल की हा काहितरी चमत्कार आहे. कारण जो ॐ दिसतोय ते पीठ आहे जे चाळणीच्या खालच्या बाजुला चिकटलेलं आहे. बाकीचं पीठ गाळून पडलं आणि एक वर्तुळ तयार झालं, ज्यामू्ळे ॐ उठून दिसतोय. बाजुला जी नक्षी तयार झाली आहे ती वरवर बघता एकसारखी वाटली तरीही त्यात काही मराठी आणि इंग्रजी अक्षरंही दिसतात. नीट पाहीलंत तर G A N असं काहीसं दिसेल. बाबांनी चाळायला सुरुवात केली तेव्हा दुपारचे ३.१५-३.३० वाजले होते. तेव्हा घड्याळाचे काटे ज्याजागी असतात, तिथल्या भागातली नक्षी अपूर्ण आहे. का माहीती नाही. काही ठिकाणी ग दिसेल, तर काही ठिकाणी भुमितीतला पाय(३.१४) दिसेल. पायच चिन्ह नाही ह्या फॉंटमध्ये. ह्याचा अर्थ मला लागला नाही. पण मला हे चमत्कारीक आहे हे कबुल करावं लागलं. त्यापु्ढे नतमस्तक होण्याशिवाय पर्यायच नाही शिल्लक राहिला.

त्यानंतर अनेक जण घरी आले, ॐ पाहुन चकित झाले. आज आठ दिवस झालेत, ॐ तसाच्या तसा आहे. माझी एक दूरची आजी आली होती एक दिवस. वयस्कर आहे, बिचारीला चार मजले नाही चढता येत. बसून बसून यायला लागतं. पण केवळ इच्छाशक्ती आणि श्रद्धा ह्यांच्या बळावर ती चार मजले चढून आली. तिच्या डाव्या डोळ्याचं ऒपरेशन झालेलं असल्यामूळे तिला फकस्त उजव्या डोळ्यानेच दिसतं. आणि त्यामुळे त्या डोळ्यावर ताण येऊन तोही डोळा दुखायला लागतो आणि खायला उठतो. तिला काही केल्या हा ॐ दिसेना..!! मी बाहेर बसलो होतो, आईचा आतुन कॉल आला.

"ह्र्दयेश, आत्याला दिसत नाही चष्म्याशिवाय, जरा तुझ्या मोबाईलमधला फोटो दाखव तिला."

मी मोबाईल घेऊन आलो. त्याचा आकार लहान दिसत होता कारण screen लहान. तरी n73 आहे. आई pc चालू करून त्यावर दाखवायला सांगत होती. पण मी आळस केला आणि मोबाईलमधला फोटो उघडून आजीच्या पुढे धरला. काही सेकंद तिला ॐ दिसला नाही पण तिचे हात जोडले गेले. मी अजून जरा तिच्या जवळ धरला मोबाईल आणि angle थोडा adjust केला. तोच तिने पूर्ण नमस्कार केला आणि जोरात ओरडलीच,

"दि्सला दि्सला! ॐ दिसला, मला ॐ दिसला, ॐ दिसला मला!!" आवाज कापरा झाला, हात जिवणीजवळ गेले पदरासकट, आणि डोळ्यातून घळाघळा पाणीच वाहायला लागलं. मोबाईलच डोक्याला लावलाऩ आपल्या!! प्रचंड खुष झाली ती आणि उर एकदम भरून आलं तिचं. मीही थोडा हळवा झालो, स्वतःवर ताबा ठेवल्याने कंठ जड झाल्यासारखा वाटलं. पु्ढे ती आजी तिच्यापेक्षा २०-२५ वर्ष लहान असलेल्या माझ्या बाबांनाही नमस्कार करायला गेली. म्हणे तुमच्या हातुन झालाय हा चमत्कार. पण बाबांनी तिला आवरलं . हॉलमधल्या गजानन महाराजांच्या portrait कडे बोट दाखवून म्हणाले "ह्यांना करा नमस्कार! ही सगळी त्यांचीच कॄपा!!"