Sunday, June 15, 2008

वाहक

त्यादिवशी मी खाकी कपड्यांमध्ये होतो. आणि ४६० मध्ये प्रचंड गर्दीत बसच्या ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत फिरत होतो. खांद्यात ती चामड्याची पर्स, आणि ऍल्युमिनीयमची पर्स, आणि त्यातुन मी कोणाला कांजुर, कोणाला पवई, कोणाला, गोरेगाव चेकनाका, कोणाला दिंडोशी, कोणाला ठाकूर कॉम्प्लेक्स अशी तिकीटं देत होतो. माझ्या पर्समध्ये सूट्ट्या पैश्यांचा तुटवडा होता. लोकं फक्त ५० आणि १०० च्या नोटा काढत होते. आणि मी प्रचंड कावलो होतो. सगळेच ५० आणि १०० द्यायला लागले तर मी त्यांना उरलेले आकाशातून पाडून देणार? बसमध्येही फारच गर्दी होती. लोकंपण एवढा का प्रवास करतात? मधल्या जागेत ३ रांगा झाल्या होत्या प्रवाश्यांच्या. आणि त्या गर्दीत कोणी मध्येच हॅंडलच्याऐवजी घंटेची रस्सीच खेचायचं आणि बिचारा ड्राईवर गोंधळात पडायचा. एका थांब्यावर तर त्या full-loaded बसमध्ये अजून १० माणसं चढली. चढली म्हणजे काय, लटकलीच ती. माझ्याशी झालेली गर्दी मी पुढे ढकलली तर धडाऽऽऽऽमकरुन मोठा आवाज झाला. बघतो तर काय, दिवाणावरची माझ्या डोक्याखालची उशीच मी बाजूच्या खुर्चीवरच्या पाण्याने ओतप्रोत भरलेल्या तांब्यावर फेकली होती आणि तो तांब्या खाली कोसळून सगळं पाणी वाहायला लागलं होतं!! पण त्या दुःस्व्प्नातून मी जागा झालो आणि मला कंडक्टरची व्यथा समजली.....


BEST संपूर्ण भरलेली असते. जेवढी माणसं बसलेली आहेत, त्याच्या तिप्पट माणसं उभी असतात. उभ्या असलेल्या माणसांच्या तीन रांगा झालेल्या असतात. एक हलला की दुसरा चेपला गेला, अशी हालत असते. पवई, इनॉर्बिट मॉल सारख्या ठिकाणी बस ट्रॅफिकमध्ये थांबलेली असते, किंवा दीड मिनिटांच्या दीर्घ सिग्नलमुळे थांबलेली असते, त्यात आपली बस सर्वात शेवटी असते, सिग्नल संपून आपण हळूहळू पुढे सरकत असतो, आणि तेवढ्यात अजून एकदा दीड मिनिट सुरू होतं. बसमध्ये प्रचंड कोंडल्यासारखं होत असतं, अखंड घामाच्या धारा वाहत असतात. आपल्या हातावरचा घाम आपला कि शेजारच्याचा? अशी परिस्थिती असते, आणि असल्या बिकट अवस्थेत कंडक्टर बसच्या ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत तिकीट विकत फिरत असतो. त्याला माझा सलाम !!!!

"चला चला , पु्डं चला..."

"ए च्यिमन्ये , चल न पु्डं, हाक्की बस रिकामी हाए, आन तु हितंच काय माश्या माराया हुबी हाए काय?"

"साएब सुट्टे द्या हो."

"रेल्वेमदे तिकीट मांगाया जाता तेवा सु्टे नसतील तर नोट फेकतात परत. द्येता न त्यान्ला सुट? आम्च्या ब्येस्टने काय घोडं मारलंय?"

"ए बॉंबे टु गोआ, मागुन येतिय ना खाली बस, झोपुन कर न प्रवास, हितं कशाला घुसतोस मदे?"

"अओ म्याडम, १६ रुपये तिकीट हाए, तुमी विसाची नोट दिली,४ सुटे न्हाईत म्हनुन रुपया मागितला आनि ५ दिले न परत. हिशेब येतो न? शाला पाहिली हाए ना कशी असते ती?"

"ओ दादा, बेस्ट म्हंजे रिजर्व ब्यांकेतलं सुटी नानी फेकनारं मशीन न्हाई"

त्याची ही वाक्य ऐकली कि तो तसा तुसडा वाटतो. पण त्याच्यावर नियतीनी वेळच तशी आणलेली असते.दिवसभर एकतर प्रवास करायचा. तोही आरामात बसुन नाही. फिरायचं बसभर. त्यात लोकं १४ रुपयांची ४ तिकिट घेताना, ५०० ची नोट पुढे करतात. कोणीही कावेल. कित्येकदा लोकं चुकीच्याच बसमध्ये बसतात. कित्येकांना स्टॉप माहिती असतो, पण तो बसल्यापासून किती वेळाने येणार माहिती नसतं. मग ते अधुन मधुन विचारणार. त्यांच्यासाटी तो दर थांब्यावर आवाज देणार. त्यात मधेच लेडिज सीटवर कोणी भैय्या येऊन बसतो, तो मग्रुरी करतो. मग बायका विरुद्ध भैय्या असा वाद सु्रू होतो. त्यात त्या बायका कंडक्टरला ओढायला बघतात, पण तो गुपचुप तिकीट काढतो. बायकांच्या तक्रारीकडे रितसर दुर्लक्ष करतो.

दिवसभरात कंडक्टर किती फे्ऱ्या मारत असेल? किती किलोमीटर चालत असेल बस मध्येच? पायाचे तुकडे पडत असतील. त्यात अखंड कलकलाट, गाड्यांचे हॉर्न्स, गोंगाट असा त्याचा दिवस ! आणि काही जण हा त्रास रविवारीही सहन करतात. नाईलाज असतो की घरची परिस्थिती? काहीही असलं तरी शेवटी नाईलाजंच.

कोणत्याही प्रकारची हमाली न करता, कितीतरी शारीरिक मेहनत घ्यावी लागते. लोकांकडून तुसडी वागणूक. शिवाय सगळ्या तिकीटांचा हिशेब. कितीतरी शारीरिक आणि मानसिक त्रासाचं काम आहे, पण बिचारा गुमान करत असतो. पण समाजात काय स्थान आहे त्यांना त्याबदल्यात? असो. पण त्याच्या तुसडेपणाच्या मागची बाजू लक्षात घेतली तर बसचा वाहक हा माझ्यासाठी आदरणीयंच असेल..

1 comment:

Pallavi Joshi said...

vahaka baddal itaka sanvedanshilpane kelela vichar pahilyandach vachala.

good one