Sunday, July 27, 2008

अध्याय नऊ - मोर्चेबांधणी...

श्रोते तुम्हास दंडवत । माझा तुम्हास साक्षात ।
सद्भाव असल्या मनात । भगवंत येतो मदतीला ॥

त्याची प्रचिती तुम्हास । कथिली मागील भागास ।
`ती"च्या पूर्ण मनास । मी होते जिंकिले ॥

माझा सद्भाव एकदाचा । `ती'च्या ध्यानी आला साचा ।
अंतिम विजय सत्याचा । हा न्याय खरा असे ॥

`ती'ला माझा विश्वास । वाटू लागला खास ।
माझा तिला लागला ध्यास । अंदाज मम आला ॥

संपर्क राती-बेराती । करू लागली निर्धास्ती ।
शंका-निरसनाप्रती । दूर कराया कारणे ॥

कित्येक मिस्ड कॉल देई । एसेमेस करी तेही ।
झोपू न देई निशी । पाठवून मेसेज भावुक ॥

माझा निश्चय दॄढ झाला । वाटे हिच्या मनाला ।
आला प्रेमाचा उमाळा । आता आपण जाऊ पुढे ॥

परी धीर होईना । पुढे मजला जाववेना ।
वाटे मनींच्या कामना । कळो हिला नकळत ॥

`ती' येता समोर । बावरे होई मन ।
जैसे की ते मांजर । घुटमळणारे पायात ॥

मी करे निश्चय । आता बोलावे आपण ।
कशी करावी सुरुवात पण । हाची असे प्रश्न मज ॥

कित्येक पत्रे लिहिली । आणि फाडून टाकिली ।
मनाप्रमाणे नाही झाली । बांधणी पत्राची हे समजताच ॥

`ती' आपल्याबद्दल । काय विचार करेल ।
हाच एक सवाल । छेडीत होता मजला ॥

`ती'च्या मनी नसेल काही । अन होईल अपुली फजिती ।
लागून राहिली ही भीती । कसे दूर करावे ती ॥

रोज मी विचार करी । आज हिला सांगू खरी ।
भावना मनीची सारी । आपल्या गोड वैखरीने ॥

विचार हा येता मना । पोटात येई मोठा गोळा ।
कुठूनसा मोठा भला । कावलो मी तयाला ॥

ओळख होऊन आज । गेले भुर्रकन षट्मास ।
गाडी नव्हती आसपास । माझ्या ध्येयाच्या ॥

मोर्चेबांधणी माझी । सुरूच राहिली साची ।
बात माझ्या प्रेमाची । राहिली तिथल्या तिथेच ॥

No comments: