Friday, July 11, 2008

अध्याय सहा - समजुतीची ऐशी तैशी

श्रोते मागे म्हटल्यागत । जे होते अभिप्रेत ।
तेच घडून होते येत । माझ्या `ती'च्या बाबतीत ॥

मैत्री दिनाच्या दिशी । मैत्री झाली अनेकांविशी ।
जो तो उडवून दाखवे मिशी । आपुली हिच्यापुढे ॥

मी त्या सर्वांविषयी । हिला बोललो त्याच समयी ।
हि मंडळी मोहमायी । जाळे टाकेल तुजवर ॥

तिला हे रुचले ना । माझे बोलणे पटले ना ।
तिने माझे ऐकले ना । त्यांना बोलवी आमच्यात ॥

अमुच्या छान कंपुत । ते होते आगंतुक ।
तिची मोकळी वागणूक । पसंत होति तयांना ॥

माझे सर्व सवंगडी । तिची एक सखी बापडी ।
ह्यांनी घालून पाहिली काडी । ही आणि त्यांच्यात ॥

हिला समजले । आमचे हेत उमजले ।
परी ना गवसले । हित तिचे त्यातले ॥

उलट तिने आम्हांस । पाडले उलटे खोट्यात ।
हरतऱ्हेने समजूत । काढून पाहिली तिची ॥

सारे यत्न व्यर्थ गेले । उलट मन तिचे वळले ।
त्यांच्या बाजूने गेले । त्यांचे आयते फावले ॥

म्हटले मी इतरांस । आता आपण करू बास ।
अपुल्या बोलण्याची आस । हिला नाही समजत ॥

स्वानुभव खरा शिक्षक । तोच तो समीक्षक ।
तोच होईल रक्षक । आपण गुमान बसावे ॥

तिला आम्ही म्हणले । जे मनास पटले ।
जे मनास रुचले । तेच फक्त कर तू ॥

शेवटी तेच तुझे मैत्र । अमुच्यासकट सर्वत्र ।
आहेत तुझे सावत्र । साथ न सोड तयांची ॥

उपहास माझ्या बोलण्यात । न आला तिच्या ध्यानात ।
होती अखंड धुंदीत । हात टेकले सर्वांनी ॥

समजुत तिची काढण्याची । तसदी नाही घ्यायची ।
खुणगाठ बांधिली साची । ही आम्ही अखेर ॥

No comments: