Thursday, July 17, 2008

अध्याय सात - छलिका

श्रोतेहो नमस्कार । मानतो मी आभार ।
तव आशीर्वादे आकार । घेतला कथेने इथवर ॥

श्रोतेहो ‘ती’ज रक्षण्या । करण्या रिपुंच्या कण्या ।
डाव अमुचा योजिण्या । चालवली अमुची बुद्धी ॥

‘ती’ला जिंकिले होते त्यांनी । भुरळ ‘ती’जवर घालोनी ।
थोडे दूर मजपासोनी । केले तयांनी मम पाखरा ॥

जिंकण्यासी पुन्हा ‘ती’ला । रिपुंस दूर लोटण्याला ।
युक्तीस माझ्या चालवण्याला । भाग होते निश्चित ॥

लावण्यासी त्यांची वाट । शोधणे मज वहिवाट ।
आगळी अन बिकट । अनिवार्य होते जनहो ॥

एक गोष्ट निश्चित । ध्यानी आली खचित ।
रिपुंशी त्या मजप्रत । मैत्री करणे भाग असे ॥

मित्रच एका मित्राची । वाट लावू शकतो साची ।
शत्रुस एक मित्रचि । घातक बनू शकतो खरा ॥

ह्या सर्व प्रकारात । साथ होती मजप्रत ।
सवंगड्यांची सोबत । अखंड ती सुदैवे ॥

आम्ही करतसू लबाड्या । काढतसू ‘ती’च्या खोड्या ।
बोलवतसू ‘ती’च्या सवंगड्या । नेहमी अमुच्यासमवेत ॥

दोन-तीनदा काही सिनेमे । पाहिले आम्ही त्यांच्यासंगे ।
अमुच्या मैत्रीची सोंगे । ध्यानी न येती तयांच्या ॥

कधीतरी पिझ्झा हटात । कधीतरी इनॉर्बिटात ।
घेतसू त्यांसी संगत । अमुच्याही अधेमधे ॥

अशाप्रकारे एक मास । आम्ही खर्चिला खास ।
मिळविण्या ‘ती’चा विश्वास । काय न आम्ही केले ॥

रिपुंचा विश्वास होताच । ‘ती’चाही झाला मिळताच ।
धन्यता लाभली साच । थोडी माझ्या जीवा ॥

राजकारण हे अमुचे । खटकेल कोणासही साचे ।
परी हेतु होते अमु्चे । चांगलेच निश्चित ॥

ह्या असल्या खेळास । कोणाचे चांगले होण्यास ।
खेळलेल्या राजकारणास । छलिकाविद्या नाव असे ॥

तब्बल चार सहली । त्यांच्यासमवेत केल्या आम्ही ।
तेथे फूस लावली । त्यांना व्यसने करण्यास ॥

अर्थात आम्ही होतो दूर । नाही काढला जरा धू्र ।
आमचा हा आगळा नूर । कळलाच नाही कवणाला ॥

अशाप्रकारे अमुची । साधना छलिकाविद्येची ।
चालूच राहिली साची । काही दिसांसाठी ॥

ह्यापुढील पायरी । आम्ही गाठली लवकरी ।
कळवू त्याची मात सारी । लवकरच तुम्हासी ॥

तत्पूर्वी आपला । निरोप घेणे भाग मला ।
सदिच्छा त्या अपुल्या । सदैव पाठीशी असुद्या ॥

No comments: