एक लहान बाळ असतं. ते २-३ महिन्यांच असतं तेव्हा ते उपडं व्हायला बघत असतं. आईच्या किंवा आणि कोणाच्या मदतीने एकदा ते उपडं झालं कि त्याला सारखा, उपडं व्हायचाच नाद लागतो. अजुन ३-४ महिन्यांनी ते सरपटत पुढे जायला लागतं मग सारखं तेच! वयाच्या ९-१०व्या महिन्याला ते रांगायला लागतं मग सारखं रांगणंच. रांगता रांगताच पळत ते मस्ती आली कि! मग कशा कशाचा आधार घेऊन उभं राहातं आणि वर्षा-दीडवर्षाचं होइपर्यंत चालु लागतं. मग सारखा चालायचाच नाद! लहान बाळाच्या ह्या मानसिक अवस्थेसारखीच माझी अवस्था झाली आहे सध्या.....
जवळ फावला वेळ पुष्कळ आहे. त्यामुळे मी अखंड online असतो. सतत ऑर्कट, ym आणि gtalk ह्या तिघांच्या जोडीला blogger.com हि चालूच. कारण , मी भले तारेवर असलो तरी समोरपण कोणीतरी तारेवर असायला हवं. तारेबाहेर असलेल्या किती जणांना तारेबाहेरचा निरोप धाडणार? मग काय, एकटा बसून blogger वर अशी खर्डेघाशी करत बसतो. काय लिहायचं? हा सर्वात मोठा प्रश्न असल्याने तारेवरची कसरत चालूच असते. कारण मी काही फार छान लेखक नाही. उगाच काहीतरी लिहायचं म्हणून लिहितो.
कधी वाटतं राजकारणावर तिखट शब्दात लिहावं. राजकारण्यांना शिव्यांची लाखोली वाहावी. पण लाखो शिव्या संपून ; संगीतात जसे मिश्र राग असतात ; तश्या लाखो शिव्यांच permutation-combination करुन बनवलेल्या मिश्र शिव्याही संपतात. आणि तेवढी विशेषणही त्या राजकारण्याला नीट व्यक्त करत नाहीत असं वाटतं आणि तो राजकारणी खुप महान आहे असं जाणवू लागतं.
कधी अस वाटत, एखादा विषय निवडायचा, त्यासंदर्भात google वर जोरदार search मारायचा. येणाऱ्या प्रत्येक link वर टिचकी मारून सगळी माहिती गोळा करायची. थोडं इकडून, थोडं तिकडून असं एकत्र करून त्याची मिसळ करून इथे, ब्लॉगवर लिहायचं! पण जन्मजात आळस, सातत्याचा अभाव, आणि वाचन करताना येणारी झोप ह्या त्रिरिपुंचा प्रभाव इतका असतो, की ठरवल्याप्रमाणे काहीच होत नाही.
मध्येच कधीतरी देव, भक्तिमार्ग, तत्त्वज्ञान आदी रुक्ष विषयावर मथळा लिहावासा वाटतो. पण माझ्या वयाचा अंदाज घेता, आणि त्याविषयातील अल्पमती असल्याची जाणिव होताच, असा blogger.com चा दुरुपयोग करू नये असं वाटू लागतं. आणि देवाबद्दल लिहायचं तरी काय? हाही मोठा प्रश्न असतो. कोणत्या देवाबद्दल लिहावं? शिवाय भक्तिमार्गावर ज्ञानेश्वर, तुकारामांनी एवढ लिहून ठेवलंय की आपला post म्हणजे, काजव्याने सूर्यापुढे आपल्या प्रकाशाची शेखी मिरवण्यासारखं आहे. त्यामुळे तो विषय तिथेच बारगळंला.
कधी कधी आपल्या हातून आजपर्यंत काय काय चुका झालेल्या आहेत त्याचा एक आढावा इथे घ्यावा, अस वाटतं. आपल्या आगाऊ, खडूस, माजोरी बोलण्यामुळे कोण कोण दुखावलं गेलंय, किती जणांशी आपण हरामखोरी केलीये, शाळेत कित्येकांना उगाच बदडलंय. जिममध्ये आपल्या वेंधळेपणामुळे, दोघा-तिघांच्या हातावर ५-६ किलोची प्लेट पडली आहे त्याचा पश्चात्ताप वगैरे आठवणी येऊ लागतात आणि त्या लिहाव्याश्या वाटतातं. पण गेले ते दिन गेले, आता त्याची आठवण परत परत कशाला? म्हणून तो विषय बाजुला राहतो.
आपल्या झकास मोबाईलच्या कॅमेऱ्यातुन आजवर कित्येक बोलकी चित्र निघाली आहेत. एकदा ती सगळ छायाचित्र इथे upload करून, आपल्या फोटोग्राफीचं दर्शन blogger वासियांना घडवावं असं वाटतं. पण मगाशी म्हणल्याप्रमाणे, माझ्याबरोबरच जन्माला आलेला आळस(हे माझ्या जुळ्या भावाच वगैरे नाव नाही, कारण मल जुळं भावंडं नाही). मोबाईल PC ला जोडणं हे मला खुप कंटाळवाण काम वाटतं. त्यामुळे ते फोटु इथे येणं मुश्कील आहे.
कधी कधी एखादी कविता, ३-४ चारोळ्या असं काहीसं लिहावसं वाटतं. पण कविता आपल्याला सुचत नाहीत. एखादी सुचलीच तर ट ला ट, ते ला ते असं जुळवू शकेनही. अर्थाचं आपल्याला नाही माहिती. तो ज्याचा त्याने लावून घ्यायचा. आणि आपल्याला विचारायचा नाही. मुक्तछंदातल्या कवितेला मी कविता मानतंच नाही. प्रत्येक वाक्य नवीन ओळीवर लिहिणं म्हणजे मुक्तछंद असा माझा आता समज झालेला आहे.
कधी वाटतं, एक post होऊन जाऊ दे तिच्यासाठी!!
तिचं हसणं
तिच लाजणं
लाजून हसणं अन
हसून बघणं
ह्र्दय विरघळवणारी
तिरपी नजर,
केसांमध्ये फुललेला
फुलांचा डवर
कधी भाळी येणारी
केसांची बट
ओठांची खुललेली
कळी नटखट
जेव्हा तिच्या चेहे्ऱ्यावर
हास्य बहरतं
तेव्हा तेव्हा खरोखर
सौंदर्य 'कहर'तं
असली काहीतरी विचारांची साखळी मनात सुरु होते आणि आपल्या ब्लॉगवर अजुन एका post ची कधी भर पडते ते समजतही नाही. खरंच असा कसा हा छंद?
३ एप्रिल.....एका अस्मितेचा अस्त.....
15 years ago
1 comment:
जेव्हा तिच्या चेहे्ऱ्यावर
हास्य बहरतं
तेव्हा तेव्हा खरोखर
सौंदर्य 'कहर'तं
hehe..sahiye!
hota asa anekda.. kay lihaycha kalatch nahi!
Post a Comment