Monday, October 12, 2009

क्षण

"oh my god, आपल्याकडे अक्षरशः एकच क्षण आहे. आणि आपल्याला त्या एका क्षणात काय काय करायचंय ह्याची यादी मात्र भली मोठी आहे.
सर्वात आधी पहिल्या सॅलरीमधुन आईला आणि आजीला साडी द्यायची होती.

ताईला एक छानसं नेकलेस द्यायचं होती.

बाबांना काय द्यायचं समजत नव्हतं, पण एखादा साधा सेलफोन घेउन द्यायचा होता. बाहेर गेले कि काही chanceच नसतो त्यांना contact करण्याचा. आणि नेहमी ते बाहेर गेले की सुचतं की अमुक एक वस्तु आणायला सांगायला हवी होती.

येत्या रविवारी विन्याचा वाढदिवस आहे, फक्त ४ दिवसांनी. कॉलेज संपल्यावर पहिल्यांदा आमचा ग्रुप भेटणार आहे. पुढच्या क्षणी जे घडणार आहे त्यानंतर करेल का विन्या वाढदिवस साजरा? काय वाटेल माझ्या मित्रांना?

आज बाबांशी खुप भांडले सकाळी सकाळी....बाबांचे मुद्दे विचारात घेता माझंही थोडं चुकलंच होतं. उगाच तोंड वर करून बोलले, आकांडतांडव केला. त्यांची माफी मागायची राहणारे.

येत्या शनिवारी नाचाच्या बाईंकडे जाणार होते मी. कधीपासुन बोलवत होत्या त्या! नोकरी लागल्यापासुन नाच सुटलाय.

दसऱ्याला ताईच्या साखरपुड्याची आणि दिवाळीची अशी एक भलीमोठ्ठी खरेदी करायची होती. पण आता शक्य नाही. वेळंच नाहीये तेवढा......

निषाद मला मनापासुन आवडतो. त्याने प्रपोज केलं तेव्हा नाही म्हणाले खरी, पण माझं त्याच्यावर अतोनात प्रेम आहे हे त्याला सांगायचं आहे मला एकदातरी. तो तर हादरणार आहे.....बिच्चारा....

मला आत्ता, या क्षणी घरी जायचंय, माझ्या आई-बाबांकडे, आजीकडे. त्यांची अवस्था बघवणार नाही मला. मीच कारणीभूत आहे या सगळ्याला. काय आभाळ कोसळेल त्यांच्यावर. एकमेकींच्या झिंज्या उपटेपर्यंत भांडलो मी आणि ताई, पण तिचं माझ्यावरचं प्रेम आज खुप miss करत्ये मी.

आता डोळ्यात अश्रु येऊन काय फायदा? जे व्हायचे ते......"

एक क्षण, त्यात अर्धवट राहिलेल्या विचारांची साखळी...पार दुर कुठेतरी फेकली गेली......


sms टाईप न करता, mobile गुपचुप पर्समध्ये ठेवुन विक्रोळी सबवे क्रॉस केला असता, तर २० फुट दुर असलेल्या ट्रेनचा हॉर्न ऐकुन, दडपणामुळे रुळावरुन बाजुला व्हायला हवं याचंही जे भान राहिलं नाही ते राहिलं असतं आणि ज्या जबाबदाऱ्यांची जाणिव शेवटच्या क्षणी झाली ती काही क्षण आधी झाली असती, तर एक रेल्वे अपघात टळला झाला असता......