Friday, June 27, 2008

अध्याय चार - ओळख

नाव तिचे कळले । गावही ते समजले ।
परी मजला न उमगले । ओळख कैसी करावी ॥

कधी वाटॆ जावे समोर । बोलून टाकावे खरोखर ।
की "तुझ्यापायी माझा मनमोर । नाचे ताथै ताथै" ॥

कशास करावी घाई । का पाऊल टाकावे आततायी ।
ससा-कासवाच्या सशापायी । का करावे वर्तन? ॥

ओळख तिच्याशी होताच । छंद तिचा समजताच ।
पोहोचू तिच्यापाशी साच । नि:संशय आपण ॥

पर छंद तिचा कसा कळावा? । हाच प्रश्न का मज छळावा?
खूप ह्यावर विचार केला । बुद्धी काही चालेना ।

सखीस तिच्या गाठावे का ?। खरेखुरे सांगावे का? ।
मदतीसाठी मागावे का? । हात तिचा ऐसे वाटे ।

परी सखी तिची नेमकी । मैत्रिण निघाली खमकी ।
होणार गोची , हे चमकी । लगेच अमुच्या टाळक्यात ।

तोही विचार बारगळला । वाटे उत्साहही गळला ।
परि दुसरा विचार उजळला । अमुच्या सुपिक टाळक्यात ॥

नाव ठाऊक होते मला । गाठण्यास शीघ्र तिला ।
ऑर्कट आले मदतीला । आभार त्याचे मानतो मी ॥

पाठवून १-२ स्क्रॅप । ओळख झाली आपोआप ।
मैत्रीचा केला पुढे हात । पाठवून विनंती मैत्रीची ॥

जाणून घेतले तिचे छंद । मीही बाणवले तिचे छंद ।
अंगी जोपासले तिचे छंद । तिला खुष करण्यास ॥

मग तिला हळूच । सांगितले वेळ बघून ।
आपण एका कॉलेजात । शिकतो हे अभिमानाने ॥

ती फार खूष झाली । भेटण्यास आतुरली ।
म्हणे उद्या सकाळी । भेटू आपण कॉलेजा ॥

देवघेव नंबराची । करूनिया संपर्काची ।
तयारी चढण्या पायरीची । केली पहिल्या प्रेमाच्या ॥

दुस-या दिवशी प्रभाती । उत्साह तो माझ्याप्रती ।
रक्तामधून धावती । आतुरलो तिला भेटाया ॥

इतक्यात माझ्या खिश्यात । मोबाईल भुरभुरला जोरात ।
'कॅटीनमध्ये भेटण्याप्रत । ये ' ऐसा निरोप तियेचा ॥

पहिले लेक्चर बुडवोनी । कॅंटीनमध्ये बैसोनी ।
होती डोळा लावूनी । माझ्या येण्याकडे ॥

तिला मी पाहिले । काहूर मनी उठले ।
तिला पाहून मी केले । स्मितहास्य समाधानी ॥

सकाळच्या वातावरणी । होती ती ताजीतवानी ।
मोहक, सुंदर, सात्त्विक परिणी । ह्रदय माझे धडधडे ॥

करून थोड्या गप्पा-टप्पा । सोबत घेऊन कॉफीच्या कपा ।
उघडू लागलॊ एकेक कप्पा । ती आपल्या मनाचा ॥

पोरगी एकदम बडबडी । मनानी मोकळी ढाकळी ।
जणू कमळाची पाकळी । आहेच की ऐसे वाटे ॥

मैत्री झाली निरंतर । संपुन गेले सगळे अंतर ।
खुष झाली मजवर । नियती ऐसे दिसते ॥

आभार त्या देवाचे । ज्याने जोडले अमुचे ।
नाते घट्ट साचे । कॄतञता दाटली मनी ॥

Thursday, June 26, 2008

अध्याय तीन - सांगे कवतिक

तिच्यासाठी माझी । दिनचर्या मी बदलली साची ।
बात आहे प्रेमाची । शिथील मी कसे व्हावे ॥

रोज तो गोड चेहरा । दिसू लागला परत मजला ।
भिडू लागती अमुच्या नजरा । जाता येता एकमेकां ॥

नजर तिची बोलकी । नयन तिचे हरिणीपरी ।
फास टाकिती मजवरी । अडकून जाई मी त्यात ॥

हास्य तियेचे मोहकु । तोच तियेचा कनकु ।
मन माझे लागे बहकु ।तिच्या एका स्मितापायी ॥

ओठ तिचे सुंदर । वाटे जैसा की धनुर ।
हसताच ती, होई वार । अपार मम ह्र्दयी ॥

पाठीवरी रुळे अपार । केशभार कुरळाकार ।
ठाव घेई आरपार । अपुल्या ह्रदयाचा ॥

भाळी रूळे अनवट । एखादीच छान बट ।
झुळुकेवर उडे बेछुट । केशपुंज वलयाकारी ॥

कांती तिची मोहमय । दुधावरली जणू साय ।
बेताल करी ह्रदय । ठेका चुकवी दिलाचा ॥

वर्णन तिचे किती करू । शब्द लागती तोकडे पडू ।
अद्वितीय ऐसे पाखरू । वाहवा खुदाच्या प्रतिभेला ॥

अध्याय दोन - शोधन

नमस्कार पु्न्हा श्रोतेजन । स्वागत तुमचे मनोमन ।
ऐकावयासी कथन । आपल्या प्रेमाचे ॥

श्रोते पहिल्या दिसानंतर । वाढत गेले अंतर ।
अमुच्यामधले निरंतर । काय बोलावे नियतीला ॥

माझे शेवटचे वर्ष विद्यालयिन । कित्येक वाया गेले दिन ।
दिसलाही नाही मजला मीन । विद्यालयाच्या भवसागरी ॥

विद्यालयात अनेक पाखरे । कैक सुंदर सुंदर चेहरे ।
परि हिच्यापरी न दुसरे । मुखकमल कोणाचे ॥

पण तो सुंदर चेहरा । एक मास मज दिसला न जरा ।
मित्र सांगती "कशास झुरा?" । त्या एका चेहऱ्यापायी ॥

माझे मनही मानेना । तिच्यावाचून रमेना ।
दुसरीकडेही बघेना । किमया हिच्या चेहऱयाची ॥

शेवटी मी केला ’पण’ । हिलाच मिळवावी आपण ।
गड्यांस म्हटले "सर्व जण" । शोधा हिला मजसाठी" ॥

गडी मैत्रीस जागले । अवघा गाव हिंडले ।
नाव,गाव शोधले । मजसाठी त्या पाखराचा ॥

कुठे येते काय करते । किती वाजता घर गाठते ।
मित्र झाले कळविते । वेळापत्रक तियेचे ॥

धन्य धन्य ते सांगाती । लावूनिया सर्व शक्ती ।
मदत केली मजप्रती । जागले अपुल्या दोस्तीला ॥

अध्याय एक - सुदिन

तो दिवस होता खास । कोणी नव्हते आसपास ।
कसलीतरी लागली आस । माझिया मनाला॥

खास दिवसाचे कारण । होतेही तसेच खास ।
तुम्ही ऐका श्रोते खास । कान देऊनि इथे ॥

मी होतो कॉलेजात । शिकत तिसऱ्या वर्षात ।
माहिती तंत्रञानात । शिक्षण घेण्याकारणे ॥

चार वर्षे कॉलेजाची । कोरडीच गेली साची ।
गरज वाटे पाण्याची । मला खरेच विबुधहो ॥

दरसालाच्या आरंभा । वाटे कोणी येईल रंभा ।
सर्वांच्याधी प्रारंभा । बोलू आपण हिच्याशी ॥

परी वेगळेच असे ललाटी । जिच्यासाठी आटाआटी ।
करावे तीच पॊरटी । घेई संगे सखयाला ॥

सखा तिचा काळाकुट्ट । कपडे ज्याचे मळकट्ट ।
परी तोच वाटॆ बळकट्ट । त्या बिचाऱ्या बापडीला ॥

अशी अमूची स्थिती । काहीही न आले हाती ।
यत्न केले अपरिमिती । काय बोलावे नशीबा ॥

ऐसे बोलता माझे मन । काय सांगू सकल जन ।
केले कॉलेजात आगमन । एका सुंदर कन्येने ॥

महत्त्व त्या क्षणाचे । मीच एक जाणतो साचे ।
करावया वर्णन तीचे । शब्द न मज सापडती ॥

तरी आपण एके दिवशी । वर्णू त्या कामिनीशी ।
जिने नुकतेच षोडशी । केले आहे पदार्पण ॥

निरोप अपुला घेतो अता । होण्याआधी ती बेपत्ता ।
शोधावयासी तिचा पत्ता । निघणे आहे भाग मला ॥

Wednesday, June 25, 2008

असा उतरला माज

"आई-वडीलांचा आशीर्वाद"
"आई-वडलांचा आर्शीवाद"
"बाबांचा आर्शिवाद"

"नैतिकता पाळा एड्स टाळा"(रिक्षातलं वर्तन "नैतिकता टाळा एड्स पाळा")
"मुलगी शिकली प्रगती झाली"(प्रत्यक्षात मुलगी शिकली आगाऊ झाली)"
"तीन माणसं"
"ठाणे तेथे काय उणे"
(सगळेच)

ही आणि ह्यासारखी अनेक वाक्य रिक्षाच्या मागच्या बाजूला लिहिलेली असतात. वाटत, व्वा! रिक्षावाला एकदम सभ्य आणि समंजस दिसतोय. म्हणून रिक्षात बसायला जातो तर आत भैय्या मग्रुरी दाखवत असतो. आणि आपल्या तळपायाची आग, चामड्याची चप्पल न वितळवता मस्तकात जाते. असं वाटतं साल्याच बकोट धरावं आणि बाहेर ओढून बेदम मारावं. सगळा माज गलितगात्र झाला पाहिजे xxxचा!! आपले मराठी रिक्षाचालक तंगड्या वर करून घरात लोळत पडतात आणि ह्या टिटव्यांना इथे भाड्याने चालवायला देतात. हे साले बिहारी रिक्षाच्या रांगेत उभे राहतात आणि आपल्याला जिथे जायचं असतं तिथे जायला नकार देतात.

एकदा मी आणि माझा एक मित्र ठाण्यात होतो आणि आम्हाला चेकनाक्याला जायचं होतं. रिक्षात बसलो आणि भैय्याला सांगितलं चेकनाका म्हणून. साला नाही म्हणाला.

भैय्या-नही, चेकनाका हम नही आऍंगे

मित्र-क्यु?

भैय्या-मुझे दुसरी जगा जाना है

मी-ठिक है, हम भी वही आऍंगे

भैय्या-देखो भैय्या नादानी ना करो. दुसरी रिक्षा पकडो

मी-साले, भैय्या तू है , मै नही! हम भी नही उतरेंगे, जिधर लेके जाना है उधर लेके चलो

मित्र-पुलिस इस्टेसन, इस्टेसन (खास भैय्या इस्टाईलमध्ये),तेरा रंडी बजार, या फिर चेकनाका....

भैय्या-भाई आप क्यु परेसान कर रहें है गरीब को?(आवाजात जरा मार्दव आला साल्याच्या)

मी-कौन साला तेरेको परेसान कर रहा है? सांतक्रुझमें होता अभी तो MNS वालोंसे पिटाई होती तेरी...

आम्ही आमच्या गप्पा सुरू केल्या, त्या शिंधडीच्याकडे लक्षच दिलं नाही. ठरवलंच होतं, काही झालं तरी रिक्षा आपल्याला हवी तिथे नेल्याशिवाय खाली उतरायचंच नाही.

भैय्या-(ओरडून)आपका क्या नाटक......

मी-(त्याला मध्येच तोडत आणि त्याच्याहून जोरात ओरडत) ए टिटवे, आवाज नीचे कर, और जहॉं हम बता रहे है वहॉं सीधेसे चल, हम उतरनेवाले नही है

पाठचे रिक्षावाले एकएक करून , गि-हाईक मिळेल तसे निघून जायला लागले. त्यामुळे ह्याचा जीव खाली-वर झाला. की आपण पहिले असून अजून इथेच आणि आपल्या मागचे निघून पण गेले. मागचे २-३ रिक्षावाले येऊन विचारून पण गेले काय झालं म्हणून. तुम्ही तुमचं काम करा , म्हणून त्यांनाही आम्ही मार्गी लावलं.
शेवटी वैतागून भैय्या रिक्षात बसला. "साला क्या बोलेगा अभी?" म्हणत रिक्षा चेकनाक्याला आणून सोडली.

भैय्या-आपके जैसा भाडा कभी मिला नही आजतक

मित्र-चुत्ये लाईनमें खडा होके ना नही बोलने का! हम फोकटमें नही बैठते तेरी गाडीमें। पैसा देते है । जिधर बोलते है उधर आनाही पडेगा ।

मान हलवत निघून गेला भैय्या. एका भैय्या रिक्षावाल्याची जिरवल्याचं समाधान मिळालं.

एकदा रात्री बारा वाजता ऑफिसमधून घरी येत होतो. मुलुंड(प) चेकनाक्यावर बस थांबली. तिथून पूर्वेला माझं घर असल्याने मला रिक्षा करावी लागते. रात्री फक्त भैय्येच रिक्षा चालवतात. मराठी माणूस बायकोला कुशीत घेऊन झोपलेला असतो त्याच्या घरी.

मी-ईस्ट जानेका है

भैय्या-नही आएगा

ज्या मग्रुरीने तो बोलला माझा टाळकंच फिरलं. माझ्याबरोबर अजून एक मित्र पण होता.

मी-तो गाडी इधर क्या मॉं xxxxके लिये खडी की है क्या?

भडकला तो. अंगावर धावून आला माझ्या. माझी कॉलर पकडून शिव्या द्यायला लागला. माझ्या कानफडात लगावली त्याने एक. मीही ह्या झालेल्या हल्ल्यातून सावरलो. त्याच्या पोटात एक गुच्चा दिला. आणि गुटघ्याने त्याच्या 'सामानावर'च लाथ मारली. त्यासरशी त्याच्या अंगातला जोरंच गेला. माझी कॉलर सोडून खाली बसला. असह्य वेदना झाल्या असतील त्याला. माझ्या मित्राने मला सोडवायचे कष्ट घेतले नाहीत. स्टॅंडच्या बाजूला एक divider चा दगड होता. तो त्याने उचलला आणि रिक्षावर टाकला. काच फुटली आणि दगड धाडक्न खाली पडला रिक्षात. काय नुकसान झालं असेल त्याचं माहिती नाही. बाजुला थोडे लोक जमा झाले. इतर रिक्षावाले बघत होते रांगेतले.

मी-अब चला जितनी चलानी है उतनी रिक्षा!

पाठच्या रिक्षावाल्याला म्हणलं.

मी- देखता क्या है? ईस्टमें चल..

तोही भैय्याच

तो-बैटीयें ना साहब....

त्याने मीटर टाकलं. पहिलं मीटर कधी पडतं त्यावरून मला आता समजायला लागलंय मीटर fast आहे की normal आहे. ह्याचं मीटर फास्ट होतं. मी काहीच बोललो नाही. घराच्या इथे आलो.

मी-मीटर फास्ट है तेरा..

भैय्या-हॉं है ना साब.

मी- क्यु?

भैय्या-वो सिटीके लिये है, लोकल के लिये नही

मी-लेकीन मै अभी लोकलमें हु. मेरा नुकसान हुआ उसका क्या? भले वो २-३ रु. का है, मै उससे बंगला नही बांधनेवाला. फिर भी क्यु?

भैय्या-(लाचार हसणं, आणि भीती वाटुन)आ..आपसे किधर ले रहें है हम ज्यादा?

साल्याने गुमान जेवढे पैसे होतात तेवढेच घेतले. आणि निघून गेला. ह्या हरामखोरांचा माज उतरवण्याची वेळ आली आहे..

Friday, June 20, 2008

म्यॅंव.....


पु. ल. देशपांड्यांनी, प्राण्यांमध्ये सर्वाधिक उच्छाद जर कोणत्या प्राण्याचा असेल तर तो प्राणी म्हणजे मांजर, ह्या त्यांच्या पाळीव प्राणीमधल्या ह्या मताशी थोड्या प्रमाणात सहमत आहे. कारण १९९८ पासून आज आमच्या घरात मांजरांच्या तीन पिढ्या नांदून गेल्या आहेत. तिसऱ्या पिढीतला शेवटचा पुरावा शेवटची काही वर्षं जगत आहे.

मी शाळेत होतो तेव्हा. उन्हाळ्याची सुट्टी होती. सकाळी ३-४ तास खाली खेळून घरी आलो, तर दारात एका मांजरीने तिची १-२ महिन्यांची पिल्लं आणुन ठेवली होती. आणि मी आलो तेव्हा ती बया स्वतःच अंग चाटण्यात मश्गुल होती , बया म्हणजे मांजर. तिची पिल्लं एकमेकांशी खेळत होती, मस्ती करत होती, एकमेकांना खोटं खोटं चावत होती, त्यातलं एखाद पिल्लू मध्येच काहीतरी पकडल्याचा हावभाव करायचं... अश्या एक आणि अनेक प्रकारे त्यांच्या टिवल्याबावल्या चालल्या होत्या. अर्थातच मला त्या पिल्लांनी आकॄष्ट केलं. तिथेच त्यांच्याशी खेळत बसायलाही मी तयार होतो. पण माझ्या पोटातही भुकेने खेळ मांडलेला होता. म्हणून मी घरात आलो.

जेवतानाही मनाला शांतपणा कुठे? कधी एकदा जेवण संपवून त्यान पिलांशी खेळतोय अस झालं होतं. त्याप्रमाणे जेवून केरसुणीची एक बारीक काडी घेतली आणि सेफ्टी डोअर आणि उंबरठा ह्यांच्यातल्या छोट्याश्या फटीतुन मी ती काडी थोडी बाहेर काढुन हलवायला लागलो. पिल्लं झोपलेली होती. पण जमिनीवर कसलातरी आवाज येतोय हे बघुन त्यांनी कान टवकारले आणि आवाजाच्या दिशेने बघू लागली. जशी काडी हलेल तितक्याच चपळाईने त्यांच्या माना हलत होत्या, हे तेव्हा मला फार मजेशी वाटलं. झोपेमुळे ती जरा आळसावलेली होती. थोड्यावेळाने मीही काडी हलवायची थांबवली. तसं त्यातल एक पिल्लू उठलं. नाक उडवत काठीपासून सावधपणे थोड्या दूर उभं राहिलं आणि हळुच एक डावली मारून पहिली. त्याने जशी डावली मारली तशी मीही नकळत काठी मागे घेतली आणि त्यान उंच आणि 'reverse' उडी मारली. आणि परत ते सावरलं आणि सावध झालं. मग त्याच्याबरोबरची अजून दोन पिल्लंही उठली. आणि मग एकाच काडीच्या मागे तिन्ही पिल्लं पळायला लागली. आळस कुठच्या कुठे पळाला त्यांचा. पिल्लांमधला हा खेळकरपणा आणि चळवळेपणा प्रचंड भावतो.

हळुहळु रोज त्यांच्याशी खेळणं हा एक दिनचर्येतला भागच झाला. मग खेळून खेळून दमली असतील बिचारी दूध देऊ त्यांना. असं म्हणत म्हणत तोही एक दिनचर्येतलाच भाग झाला. आणि अश्याच एके दिवशी त्यांचा गृहप्रवेशही झाला. मग त्यांच ह्याखोलीतुन त्याखोलीत पळणं. एक टि-पॉय बसून आणि दुसरं टि-पॉयच्या खाली बसून एकमेकांना डावल्या मारणं, त्यात लपाछुपी खेळणं, पकडापकडी खेळणं असे अनेकविध खेळ ती पिल्लं खेळत असत. मग जरा मोठी झाल्यावर त्यांच्या आईचं म्हणजे मन्नम्माचं पिल्लांवर फिसरकारणं आणि स्वावलंबनासाठी कठोर होऊन त्यांना आपल्यापासून दूर ठेवणं असले प्रकार सुरू झाले. आणि आम्हाला आईने अशी दूर केलेली पिल्लं अजुनच केविलवाणी वाटली. त्यात त्यांच ओरडणं अजुनच केविलवाणं. मग पायात घूटमळणं, आपल्या पायांवर अंग झोकून देणं, आणि दूधासाठी आपल्याला लाडीगोडी लावणं, ह्या सगळ्याचा अखेरीस लळा लागू लागला. आणि ती मांजरं आमच्या घरातला एक भागच झाला. अजून काही दिवसांनी त्या पिल्लांची मोठ्या मांजरींमध्ये गणती व्हायला लागली. मोठी झाल्यावर त्यांच एकमेकांवरचं प्रेम गळून पडलं आणि ती एकमेकांशी भांडायला लागली आणि मग आमच्या घरातून त्यांची हकालपट्टी झाली.

त्यानंतर मन्नम्माने आणखी एकदा ३ पिल्लांना जन्म दिला, आणि परत आमच्या इथे आणून ठेवलं. आणि परत तोच खेळ सुरू झाला. त्यांच्यातलं एक पिल्लू अतिशय अशक्त होतं आणि पुढच्या ४-५ दिवसातच त्याची ह्या मोहमायेतून सुटका झाली. आणि ही २ पिल्ल परत आमच्या घरात आली. अतिशय गुटगुटीत अशी ती पिल्लं दुडूदुडू धावायची तेव्हा मजा वाटायची. काही दिवसांनी ह्यातल्याच एका पिल्लाला म्हणजेच मांजरीला २ पिल्लं झाली. आणि आधीच्या पिढीतल्या मांजरींना झालेली पिल्ल, अशी मिळून एकूण १८ मांजरं आमच्या सोसायटीत आनंदाने नांदू लागली. आणि त्यांचा सुळसुळाट सुरू झाला. कोणत्याही विंगच्या कोणत्याही मजल्यावर, कोणाच्या घरासमोर घाण करून ठेवणं वगैरे प्रकार सुरू झाली आणि ती मांजरं उच्छाद म्हणून ओळखली जाऊ लागली. कोणीतरी हरामखोर त्यांना खाण्यातून विष देऊ लागलं आणि त्यात ९ मांजरांची मोहमायेतून सुटका झाली. आमच्या घरात २ मांजरी अखंड राहू लागल्या. त्यांना घरातून बाहेर जायची परमिशन मिळाली नव्हती माझ्या आई आणि बहिणीकडून. सोसायटीतल्या आणखी एका मांजरीला झालेली पिल्लं आमच्या खालच्या आजींच्या घराबाहेर खेळत होती. २ महिन्यांच्या एका पिल्लाला त्या आजीनी एकदा काठी मारली आणि त्याचा पाय मोडलां. त्याच्याबरोबरची पिल्लं खेळायची नी हे नुसतं बघत बसायचं. मग माझ्या बहिणीनी आणि शेजारच्या मुलीनी त्या पिल्लाला डॉक्टरांकडे नेलं. आणि पायाला प्लास्टर बांधून आणलं. ऍनिमल वेल्फेअर मधून एक नोटिस लिहून आणली आणि सोसायटीच्या हापिसात सादर केली. आणि प्राण्यांना मारल्यानंतर होणाऱ्या परिणामांची माहिती मिळताच सगळ्यांचे धाबे दणाणले. मग ते मोडक्या पायाचं पिल्लूही आमच्याच घरात राहू लागलं. दरम्यान कित्येक मांजरींना त्यांच्या आवडत्या ठिकाणी म्हणजे मच्छीबाजारात सोडलं.

पण आमच्या घरातला उच्छाद तसाच होता. पिल्ल जरा मोठी होऊदेत. मग पावसाळा संपल्यावर सोडू बाहेर. ती जरा मोठी झाल्यावर भांडायला लागतील, तेव्हा सोडू बाहेर अशी निरनिराळ्या कारणांनी ती ८ वर्ष घरातच राहिली. आणि तो प्राणी खरंच जितका लळा लावतो तेवढाच आपला छळही करतो. निसर्गाच्या हाकेला ओ देण्यासाठी कुठले कुठले कोपरे शोधणे आणि घाण करणे, वगैरे अनेक प्रकारे आमचा छळ झाला आमचा त्यांच्याकडून. आमच्या गॅलरीत लावलेल्या दुर्वा गणपतीपेक्षा मांजरीच जास्त खातात. नखं साफ़ करण्यासाठी ठिकठिकाणी ओरबाडून आमचे सोफे खराब केले त्या कारट्यांनी.

असो, १ मांजर २ वर्षांपूर्वी ढगात गेली. ढगासारखीच पांढरी शुभ्र होती ती. मांजरींच मरण जवळ येत तेव्हा त्या घर सोडून निघून जातात. त्या मरताना कोणाला दिसत नाहीत. पण मी मांजर आचके देत मरताना पाहिलंय. अतिशय वाईट वाटलं तेव्हा. दुसऱ्या मांजरीला आम्ही भल्या पहाटे तिच्या आवडत्या ठिकाणी सोडलं. अजून एक अतिशय वयस्कर मांजर आमच्या घरात आहे. जेवढा तिचा लळा लागला तेवढाच मांजरींचा कंटाळाही आला आता. तरीही भविष्यात कुठेही मांजर दिसली की आमच्याकडच्या मांजरी आठवल्याशिवाय राहाणार नाही.

Monday, June 16, 2008

बुड्बुड

अजय
रिसबुड
जाड्या
पोटॅशियम
बुड्बुड
आणि ह्याखाली शिव्या. हे काय असेल सगळ? ही आहे आमच्या कट्ट्यावरच्या , माझा चांगला मित्र अजय रिसबुड ह्याची नामावली. साधारण ५’६” उंची असलेला, विटी दांडू मधल्या विटीच्या आकाराची शरीरयष्टी असलेला अजय, "चंद्र वाढतो कलेकलेने, अजय वाढतो किलोकिलोने" ह्या उक्तीला जागून आहे. कोणी विचारलं ह्या ओळीचा अर्थ काय? तर उत्तर ठोकून द्यायचं अजय रिसबुड!! त्याच्या आकाराच्या तिप्पट % , उत्तर बरोबरच येणार. आणि त्याच्या कष्टाने कमावलेल्या शरीरयष्टीचा त्याला अभिमानही आहे. आणि तो माझा मित्र आहे ह्याचा मलाही अभिमान आहे. एखादा तरी मित्र असा असायलाच हवा.



तसा तो माझ्यापेक्षा ५ वर्ष मोठा आहे, आमची मैत्री ३ वर्षांपूर्वी झाली. त्याचं कारण म्हणजे आम्हाला असलेला गाण्याचा छंद. मला गाण्याचा छंद आहे, पण मी गाणं शिकलेलो नाही. पू्र्वपुण्याईच्या जोरावर, मला स्वरञान लाभलं. त्याआधारे मी गातो. मी पेटी शिकलो, त्यामुळे नोकरी लागण्यापूर्वी रोज सकाळी अजयकडे पेटी बडवायला जातसे. तो त्याचा शास्त्रीय संगीताचा रियाज करायचा, नी मी त्याला पेटीवर साथ करायचो. केवळ त्याच्यामुळे मला कित्येक रागांची माहिती मिळाली. कारण मी पेटी शिकलो, माझ्या गुरुंनी मला माझा हात तयार करुन दिला. त्यांनी मला सांगितलं होतं की तुला शास्त्रीय संगीताच ञान साथ केल्यावर जसं मिळेल तसं कधीच मिळणार नाही. आणि त्यांच्या ह्या वाक्याची अनुभूती मला अजयमुळे मिळाली. त्याच्या गाण्याची खासियत म्हणजे त्याच्या आवाजातला जोर, स्थैर्य, सूराचं जबरदस्त ञान ह्या्मुळे त्यातून ठासून भरलेला आत्मविश्वास दिसतो. त्याच्या आवाजाची खासियत, म्हणजे तो पांढरी तीन मध्ये शास्त्रीय गातो, आणि सगळ्या सप्तकांमध्ये तेवढाच जोरकस आवाज त्याच्या नरड्यातून निघतो. आवाज कितीही बसलेला असला, तरीही तो सहज गाऊ शकतो. ह्याला दैवी देणगी म्हणतात.

ह्या रसायनाचा अजुन एक गुणधर्म म्हणजे खवैय्येगिरी! हा माणूस प्रचंड खातो. खायला कधीही लाजत नाही. समोर काहीही आणून ठेवा, हा खातो. मला वांग, कार्ल, कित्येक पालेभाज्या, मटकी , डाळिंब्याची उसळ, अश्या कितीतरी आवडी-निवडी आहेत. पोटॅशियमचं तसलं काही नाही. काही द्या, आम्ही खाणार. माझ्याबरोबर मसाल-पाव खाल्ल्यावर दुसरा मित्र भेटला आणि म्हणला की, ’चल अजय चायनीज खाऊ’ तर शेठ लगेच तयार होतील. आणि त्याला सांगणार नाही कि अरे आत्ताच मी मसाला पाव खाऊन आलोय. त्या मित्राला वाटेल हा रिकाम्या पोटी खातोय सगळं! एकदा ह्याची आजी बाहेर होती २-३ दिवस. तेव्हा तिच्या घरी ह्याने आम्हाला बोलावलं. आम्ही घरी २.५ किलो बटाटा वडे आणले ४ जणांसाठी. रात्री ९.३०-१० च्या सुमारास आम्ही ते आणले, थोडे खाऊन आमचं पोट भरलं. त्यानंतर २-३ तास रात्री गप्पा मारून सांडलो. आणि थोड्यावेळाने निसर्गाच्या हाकेला ओ देण्यासाठी मी उठलो, तर मला गोणीच्या आकाराचं काहीतरी स्वयंपाकघराच्या उंबरठ्यावर दिसलं. आणि मी झोपेत होतो, म्हण्लं गोणी कशी काय हलत्ये? मगाच पासून घरी होतो तेव्हा दिसली नाही,आत्ता कशी काय आली? म्हणून मी मधला दिवा लावला, तर बुड्बुड उरलेले पाच वडे खात होता. मी हरलॊ. पहाटे ३.३० वाजता हा मनुष्य वडे खात होता!! म्हणे,‘अरे फार भूक लागली मला’. म्हणलं साहेब तुम्ही धन्य आहात!!!

ह्याच्यातला अजुन एक गुण मला आवडतो गबाळेपणा. जो गूण माझ्यातही आहे. कोणत्याही पॅंटवर कोणताही सदरा घालणे, जीन्सवर स्लीपर्स घालणे. आम्ही जे कपडे घालू तीच फॅशन आणि बाकीचं सगळं म्हणजे मूर्खपणा, असा आमचा समज आहे. एकदा तर ह्याने वेंधळेपणाची परिसीमा गाठली होती. रात्री जेवल्यावर बाहेर पडलो सगळे. आणि एका नाक्यावर गप्पा छाटत उभे होतो. ह्याला त्याच्या बायकोचा फोन आला. आणि हा तिच्याशी बोलता बोलता, आमच्यापासून वेगळा झाला, आणि येर-झारा घालत बोलण सु्रु होतं. आमचं आधी कोणाचंच लक्ष नव्हतं, कारण आम्ही आमच्या गप्पांमध्ये दंग होतो. थोड्यावेळाने बघतो तर ह्याच्या पाठीमागे काहीतरी लोंबत होतं. नीट बघतो तर साहेबांनी अर्धी-चड्डी उलटी घातली होती. उलटी म्हणजे नाड्या मागे. आणि चड्डीला elastic असल्यामूळे ह्याने वेण्यांसारख्या नाड्या सोडल्या होत्या बाहेर. बेफाम हसलो. हसता हसता पडायचं बाकी राहिलं होतं.

अजून एक फाजिल किस्सा आहे. पण तो ज्या क्रियेबद्दल आहे ती क्रिया पुर्णपणे नैसर्गिक आणि अत्यावश्यक आहे. ती म्हणजे शरीरातून वायु सोडणे!! बुड्बुड आणि अमोद चितळे ह्याबाबतीत आचरटपणाचा कळस गाठतात. दोघांमध्ये पादण्याची स्पर्धा लागते. आणि जो जास्तवेळा वायु सोडेल तो जिंकला. त्याचे गुणही असतात. त्यामुळे अजयने अमोदवर २०/७ ने मात केली वगैरे असा धावता गुण-फलकही असतो. आणि वास आला की बाद.........एवढा आचरटपणा अजुन कुठे चालत असेल असं वाटत नाही.

अजयची चालण्याची पण एक ढब आहे. चालताना त्याचं मांस सगळ्या बाजुंनी पॅंटवर वर्चस्व गाजवत असतं. त्यामुळे मध्येच हा एकाबाजुने पोट आत खोचून पॅंट वर घेतो, मग दुसऱया बाजुने मांस आत खोचून पॅंट वर घेतो. हाताची बोटं सतत जादू करत असल्यासारखी हवेत फिरत असतात. त्याच्याशी बोलणं म्हणजे जरा सगळ्या गोष्टींचं भान ठेवावं लागतं. कारण हा मध्येच विषय बदलतो. म्हणजे एका विषयावर आपण बोलत असतो आणि हा मध्येच असंबद्ध वाक्य टाकतो, वेगळ्याच विषयावर. त्या वाक्याआधीची त्या विषयावरची बरीच वाक्य त्याने मनातल्या मनात बोलून झालेली असतात. पण समोरचा माणूस मनकवडा नाही हे बहुदा तो विसरतो. खुप चंचल आहे ह्याबाबतीत. चिडतो फटकन. शांतही होतो, पण मनावरचा ताबा लवकर सुटतो. गाण्यातले राग लवकर येतात म्हणजे जगात बाकीचे जेवढ्या प्रकारचे राग आहेत तेही लवकर यायला हवेत अशी त्याची फल्तु अपेक्षा असावी.

हे सद्गुण-दुर्गुणभरीत बुड्बुड्चरित्र मी इथे लिहिलंय हे जर त्याला समजलं, तर माझ काही खरं नाही. पण तरीही अजय जसा आहे तसाच त्याने राहावं. उगाच टापटिप अजय, खाताना लाजणारा अजय माझ्या डोळ्यांना बघवणार नाही.

हा छंद जिवाला लावी पिसे....

एक लहान बाळ असतं. ते २-३ महिन्यांच असतं तेव्हा ते उपडं व्हायला बघत असतं. आईच्या किंवा आणि कोणाच्या मदतीने एकदा ते उपडं झालं कि त्याला सारखा, उपडं व्हायचाच नाद लागतो. अजुन ३-४ महिन्यांनी ते सरपटत पुढे जायला लागतं मग सारखं तेच! वयाच्या ९-१०व्या महिन्याला ते रांगायला लागतं मग सारखं रांगणंच. रांगता रांगताच पळत ते मस्ती आली कि! मग कशा कशाचा आधार घेऊन उभं राहातं आणि वर्षा-दीडवर्षाचं होइपर्यंत चालु लागतं. मग सारखा चालायचाच नाद! लहान बाळाच्या ह्या मानसिक अवस्थेसारखीच माझी अवस्था झाली आहे सध्या.....

जवळ फावला वेळ पुष्कळ आहे. त्यामुळे मी अखंड online असतो. सतत ऑर्कट, ym आणि gtalk ह्या तिघांच्या जोडीला blogger.com हि चालूच. कारण , मी भले तारेवर असलो तरी समोरपण कोणीतरी तारेवर असायला हवं. तारेबाहेर असलेल्या किती जणांना तारेबाहेरचा निरोप धाडणार? मग काय, एकटा बसून blogger वर अशी खर्डेघाशी करत बसतो. काय लिहायचं? हा सर्वात मोठा प्रश्न असल्याने तारेवरची कसरत चालूच असते. कारण मी काही फार छान लेखक नाही. उगाच काहीतरी लिहायचं म्हणून लिहितो.

कधी वाटतं राजकारणावर तिखट शब्दात लिहावं. राजकारण्यांना शिव्यांची लाखोली वाहावी. पण लाखो शिव्या संपून ; संगीतात जसे मिश्र राग असतात ; तश्या लाखो शिव्यांच permutation-combination करुन बनवलेल्या मिश्र शिव्याही संपतात. आणि तेवढी विशेषणही त्या राजकारण्याला नीट व्यक्त करत नाहीत असं वाटतं आणि तो राजकारणी खुप महान आहे असं जाणवू लागतं.

कधी अस वाटत, एखादा विषय निवडायचा, त्यासंदर्भात google वर जोरदार search मारायचा. येणाऱ्या प्रत्येक link वर टिचकी मारून सगळी माहिती गोळा करायची. थोडं इकडून, थोडं तिकडून असं एकत्र करून त्याची मिसळ करून इथे, ब्लॉगवर लिहायचं! पण जन्मजात आळस, सातत्याचा अभाव, आणि वाचन करताना येणारी झोप ह्या त्रिरिपुंचा प्रभाव इतका असतो, की ठरवल्याप्रमाणे काहीच होत नाही.

मध्येच कधीतरी देव, भक्तिमार्ग, तत्त्वज्ञान आदी रुक्ष विषयावर मथळा लिहावासा वाटतो. पण माझ्या वयाचा अंदाज घेता, आणि त्याविषयातील अल्पमती असल्याची जाणिव होताच, असा blogger.com चा दुरुपयोग करू नये असं वाटू लागतं. आणि देवाबद्दल लिहायचं तरी काय? हाही मोठा प्रश्न असतो. कोणत्या देवाबद्दल लिहावं? शिवाय भक्तिमार्गावर ज्ञानेश्वर, तुकारामांनी एवढ लिहून ठेवलंय की आपला post म्हणजे, काजव्याने सूर्यापुढे आपल्या प्रकाशाची शेखी मिरवण्यासारखं आहे. त्यामुळे तो विषय तिथेच बारगळंला.

कधी कधी आपल्या हातून आजपर्यंत काय काय चुका झालेल्या आहेत त्याचा एक आढावा इथे घ्यावा, अस वाटतं. आपल्या आगाऊ, खडूस, माजोरी बोलण्यामुळे कोण कोण दुखावलं गेलंय, किती जणांशी आपण हरामखोरी केलीये, शाळेत कित्येकांना उगाच बदडलंय. जिममध्ये आपल्या वेंधळेपणामुळे, दोघा-तिघांच्या हातावर ५-६ किलोची प्लेट पडली आहे त्याचा पश्चात्ताप वगैरे आठवणी येऊ लागतात आणि त्या लिहाव्याश्या वाटतातं. पण गेले ते दिन गेले, आता त्याची आठवण परत परत कशाला? म्हणून तो विषय बाजुला राहतो.

आपल्या झकास मोबाईलच्या कॅमेऱ्यातुन आजवर कित्येक बोलकी चित्र निघाली आहेत. एकदा ती सगळ छायाचित्र इथे upload करून, आपल्या फोटोग्राफीचं दर्शन blogger वासियांना घडवावं असं वाटतं. पण मगाशी म्हणल्याप्रमाणे, माझ्याबरोबरच जन्माला आलेला आळस(हे माझ्या जुळ्या भावाच वगैरे नाव नाही, कारण मल जुळं भावंडं नाही). मोबाईल PC ला जोडणं हे मला खुप कंटाळवाण काम वाटतं. त्यामुळे ते फोटु इथे येणं मुश्कील आहे.

कधी कधी एखादी कविता, ३-४ चारोळ्या असं काहीसं लिहावसं वाटतं. पण कविता आपल्याला सुचत नाहीत. एखादी सुचलीच तर ट ला ट, ते ला ते असं जुळवू शकेनही. अर्थाचं आपल्याला नाही माहिती. तो ज्याचा त्याने लावून घ्यायचा. आणि आपल्याला विचारायचा नाही. मुक्तछंदातल्या कवितेला मी कविता मानतंच नाही. प्रत्येक वाक्य नवीन ओळीवर लिहिणं म्हणजे मुक्तछंद असा माझा आता समज झालेला आहे.

कधी वाटतं, एक post होऊन जाऊ दे तिच्यासाठी!!

तिचं हसणं
तिच लाजणं
लाजून हसणं अन
हसून बघणं

ह्र्दय विरघळवणारी
तिरपी नजर,
केसांमध्ये फुललेला
फुलांचा डवर

कधी भाळी येणारी
केसांची बट
ओठांची खुललेली
कळी नटखट

जेव्हा तिच्या चेहे्ऱ्यावर
हास्य बहरतं
तेव्हा तेव्हा खरोखर
सौंदर्य 'कहर'तं

असली काहीतरी विचारांची साखळी मनात सुरु होते आणि आपल्या ब्लॉगवर अजुन एका post ची कधी भर पडते ते समजतही नाही. खरंच असा कसा हा छंद?

Sunday, June 15, 2008

वाहक

त्यादिवशी मी खाकी कपड्यांमध्ये होतो. आणि ४६० मध्ये प्रचंड गर्दीत बसच्या ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत फिरत होतो. खांद्यात ती चामड्याची पर्स, आणि ऍल्युमिनीयमची पर्स, आणि त्यातुन मी कोणाला कांजुर, कोणाला पवई, कोणाला, गोरेगाव चेकनाका, कोणाला दिंडोशी, कोणाला ठाकूर कॉम्प्लेक्स अशी तिकीटं देत होतो. माझ्या पर्समध्ये सूट्ट्या पैश्यांचा तुटवडा होता. लोकं फक्त ५० आणि १०० च्या नोटा काढत होते. आणि मी प्रचंड कावलो होतो. सगळेच ५० आणि १०० द्यायला लागले तर मी त्यांना उरलेले आकाशातून पाडून देणार? बसमध्येही फारच गर्दी होती. लोकंपण एवढा का प्रवास करतात? मधल्या जागेत ३ रांगा झाल्या होत्या प्रवाश्यांच्या. आणि त्या गर्दीत कोणी मध्येच हॅंडलच्याऐवजी घंटेची रस्सीच खेचायचं आणि बिचारा ड्राईवर गोंधळात पडायचा. एका थांब्यावर तर त्या full-loaded बसमध्ये अजून १० माणसं चढली. चढली म्हणजे काय, लटकलीच ती. माझ्याशी झालेली गर्दी मी पुढे ढकलली तर धडाऽऽऽऽमकरुन मोठा आवाज झाला. बघतो तर काय, दिवाणावरची माझ्या डोक्याखालची उशीच मी बाजूच्या खुर्चीवरच्या पाण्याने ओतप्रोत भरलेल्या तांब्यावर फेकली होती आणि तो तांब्या खाली कोसळून सगळं पाणी वाहायला लागलं होतं!! पण त्या दुःस्व्प्नातून मी जागा झालो आणि मला कंडक्टरची व्यथा समजली.....


BEST संपूर्ण भरलेली असते. जेवढी माणसं बसलेली आहेत, त्याच्या तिप्पट माणसं उभी असतात. उभ्या असलेल्या माणसांच्या तीन रांगा झालेल्या असतात. एक हलला की दुसरा चेपला गेला, अशी हालत असते. पवई, इनॉर्बिट मॉल सारख्या ठिकाणी बस ट्रॅफिकमध्ये थांबलेली असते, किंवा दीड मिनिटांच्या दीर्घ सिग्नलमुळे थांबलेली असते, त्यात आपली बस सर्वात शेवटी असते, सिग्नल संपून आपण हळूहळू पुढे सरकत असतो, आणि तेवढ्यात अजून एकदा दीड मिनिट सुरू होतं. बसमध्ये प्रचंड कोंडल्यासारखं होत असतं, अखंड घामाच्या धारा वाहत असतात. आपल्या हातावरचा घाम आपला कि शेजारच्याचा? अशी परिस्थिती असते, आणि असल्या बिकट अवस्थेत कंडक्टर बसच्या ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत तिकीट विकत फिरत असतो. त्याला माझा सलाम !!!!

"चला चला , पु्डं चला..."

"ए च्यिमन्ये , चल न पु्डं, हाक्की बस रिकामी हाए, आन तु हितंच काय माश्या माराया हुबी हाए काय?"

"साएब सुट्टे द्या हो."

"रेल्वेमदे तिकीट मांगाया जाता तेवा सु्टे नसतील तर नोट फेकतात परत. द्येता न त्यान्ला सुट? आम्च्या ब्येस्टने काय घोडं मारलंय?"

"ए बॉंबे टु गोआ, मागुन येतिय ना खाली बस, झोपुन कर न प्रवास, हितं कशाला घुसतोस मदे?"

"अओ म्याडम, १६ रुपये तिकीट हाए, तुमी विसाची नोट दिली,४ सुटे न्हाईत म्हनुन रुपया मागितला आनि ५ दिले न परत. हिशेब येतो न? शाला पाहिली हाए ना कशी असते ती?"

"ओ दादा, बेस्ट म्हंजे रिजर्व ब्यांकेतलं सुटी नानी फेकनारं मशीन न्हाई"

त्याची ही वाक्य ऐकली कि तो तसा तुसडा वाटतो. पण त्याच्यावर नियतीनी वेळच तशी आणलेली असते.दिवसभर एकतर प्रवास करायचा. तोही आरामात बसुन नाही. फिरायचं बसभर. त्यात लोकं १४ रुपयांची ४ तिकिट घेताना, ५०० ची नोट पुढे करतात. कोणीही कावेल. कित्येकदा लोकं चुकीच्याच बसमध्ये बसतात. कित्येकांना स्टॉप माहिती असतो, पण तो बसल्यापासून किती वेळाने येणार माहिती नसतं. मग ते अधुन मधुन विचारणार. त्यांच्यासाटी तो दर थांब्यावर आवाज देणार. त्यात मधेच लेडिज सीटवर कोणी भैय्या येऊन बसतो, तो मग्रुरी करतो. मग बायका विरुद्ध भैय्या असा वाद सु्रू होतो. त्यात त्या बायका कंडक्टरला ओढायला बघतात, पण तो गुपचुप तिकीट काढतो. बायकांच्या तक्रारीकडे रितसर दुर्लक्ष करतो.

दिवसभरात कंडक्टर किती फे्ऱ्या मारत असेल? किती किलोमीटर चालत असेल बस मध्येच? पायाचे तुकडे पडत असतील. त्यात अखंड कलकलाट, गाड्यांचे हॉर्न्स, गोंगाट असा त्याचा दिवस ! आणि काही जण हा त्रास रविवारीही सहन करतात. नाईलाज असतो की घरची परिस्थिती? काहीही असलं तरी शेवटी नाईलाजंच.

कोणत्याही प्रकारची हमाली न करता, कितीतरी शारीरिक मेहनत घ्यावी लागते. लोकांकडून तुसडी वागणूक. शिवाय सगळ्या तिकीटांचा हिशेब. कितीतरी शारीरिक आणि मानसिक त्रासाचं काम आहे, पण बिचारा गुमान करत असतो. पण समाजात काय स्थान आहे त्यांना त्याबदल्यात? असो. पण त्याच्या तुसडेपणाच्या मागची बाजू लक्षात घेतली तर बसचा वाहक हा माझ्यासाठी आदरणीयंच असेल..

Friday, June 13, 2008

शिस्त

आमच्या हापिसात, ३ मजले आहेत. प्रत्येक मजल्यावर कमीत कमी ३५-४० क्युबिकल्स आहेत. सगळीकडची स्वच्छता एकमेकींशी स्पर्धा करत असते, पण आमच्या क्युबिकलच्या स्वच्छतेला तोड नाही. शेवटी आय.टी. विभागाचं क्युबिकल आहे ते!! प्रचंड शिस्त आणि टापटिपपणा ह्यांचा उत्तम नमुना म्हणजे आमचं डिपार्टमेंट. बाकी कुठेही जा, कुठल्याही टेबलवर जा, लोक आपापलं काम गुपचुप करत असतात. त्यांच्यासमोर मोठमोठे प्लॉट्स(म्हणजे फक्त डिजाईन, खरे प्लॉट्स नाहीत) असतात. ज्याकडे ते एकटक बघत काहीतरी लिहीत असतात किंवा तपासत असतात.

draughtsmen च्या समोर २ २१ इंची मॉनिटर्स, पेन्सिली, हायलाईटर्स, खोडरबर्स, निरनिराळ्या लांबीच्या आणि पारदर्शकतेच्या पट्ट्या, अस सगळ अस्ताव्यस्त पसरलेलं असतं. मधेच कोणी अभियांत्रिक येतो, घडी केलेल्या प्लॉट्सचा गठ्ठा त्यांच्यासमोर आदळतो आणि परत आपल्या कामाला लागतो. कोणाच्या इथे बॉक्स फाईल्सची थप्पी, कंपनीचे स्टॅंप्स असलं सामान पडलेलं असतं. कोणाच्या इथे कधीही गेलं तरीही फक्त खाण्याचे निरनिराळे पदार्थ मिळतात.



पण ह्या सगळयाहून IT ची टेबल्स फार वेगळ्याप्रकारे सजवलेली असतात कारण तिथे बिघडलेले keyboards, mouse, monitors, जुने पुराणे डब्बे म्हणजे PCs असा सगळा थाट असतो. ते डब्बेही कपडे काढलेले असतात, दुरुस्तीसाठी आलेले. ज्यात कैक वर्षांची धुळ कैक वर्षांसाठी वास्तव्याला आलेली असते. एकदा फुंकर मारली की कशी मस्त आभाळात जाते ढगांसारखी. फक्त हे काळे सावळे ढग बरसत नाहीत.



इथल्या बेशिस्तीवर मी मनोमन फिदा आहे. Hard-Disks, RAMs नुसत्या जास्त झाल्यासारख्या लोळत पडलेल्या असतात. कोणीऽऽही त्या उचलायची तसदी घेत नाही. माझ्या स्वभावाला अगदी अनुरुप वातावरण असल्यामुळे मीही इथे रुळत गेलो, आणि माझ्या अंगी असलेले सद्गुण, सद्सद्गुणात रुपांतरीत होवू लागले. आणि त्या सद्गुणांना परत दुर्गुणांमध्ये परावर्तित व्हावं लागतं कारण इटली किंवा तत्सम देशांमधुन कोणीतरी पाहुणा येणार असतो. आणि आम्हाला सगळ उचलून ठेवावं लागतं.

"ह्र्दयेश, चल जल्दी हमें ये सब हटाना है । बाहरसे कोई आ रह है । बॉसने सब हटानेको बोला है ।"

"हम्म्म्म्म्म"

"चल ये देख तेरे यहॉं की ट्रे में कितने गेटपासके xerox हैं, कितनी invoices, delivery challan , customer call reports पडे है । "

"पडे है तो उठानेका उसको, उसमें क्या?"

"तू भी आ । दिनभर gtalk पे मत बैठ ।"

"मैं किधर gtalk पे बैठा हुं? गोदरेजकी सडेली chair है मेरे नीचे ।"

"ये ले punch-machine । फाईल करना है सब ।"

"क्या बात है ! इतने जल्दी मिला punch-machine?"

"सही जगेपे रखा तो सब कुछ सही समय पे मिलता है ।"

"तु तो आसाराम बापु कि तरह बात करता है रे ! रवीबाबा की जय । लेकीन काम गाडगेबाबा का क्यु करता है ? फाईल लाके दे ना"

"मैं पंच करता हुं, तु फाईल कर।"

"देख भैय्या , पहिले सब पेपर्स categorize कर और ...... अबे क्यु फाडा वो पेपर? "

"ब्लॅंक था ।"

"तो फाडा क्यु? रफ के लिये वापर सकते थे ।"

"क्यु चाहिये रफ? ये क्या , ये सब रफ्ही है मेरे नीचे।"

"keyboard के नीचे ऐसा clear बोल भैय्या । मतलब अलग और गंदा होता है नही तो!!"

"वोही रफ्ही है सब ।"

"रफी? गाता है क्या ये रफी ?"

"ह्र्दयेश, कितना pj मारोगे?"

"ऎ साला, मेरा पेन मिल गया । तुने ढापा था ।"

"हॉं ! मेरे पास है ही नही ना !"

"वही मैं बोल रहॉं हुं ।"

"चल गेटपासका फाईल ला ।"

असं म्हणत एकएक करून सगळ्या फाईल्स मधलं सामान परत त्या त्या फाईल मध्ये गेलं. सगळ्या कपाटांवर आत ठेवलेल्या सामानानुसार बाहेर नावं चिकटवण्यात आली. server-racks ना त्या त्या server प्रमाणे नाव लिहिलेले कागदाचे कपटे चिकटवण्यात आले. कोणाच्या टेबलखाली असलेली चण्याची आणि दाण्यांची सालं कचऱ्याच्या बादलीत गेली. नको असलेले कागदाचे कपटेही त्याच बादलीत गेले. कंप्युटर्सना कपडे घालून वरच्या गोदामात फेकण्यात आलं. प्रत्येकाच्या टेबलवर चालू कि-बोर्ड, उंदिर, मॉनिटर, फोन आणि चालु डब्बा, एवढंच दिसू लागलं. जिवंतपणा नाहीसा झाला. आणि इतके दिवस शिस्तशीर दिसत असलेलं आमचं क्युबिकल परत एकदा बेशिस्त दिसू लागलं !!!!

Thursday, June 12, 2008

॥ ॐ ॥

शीर्षक फ़क्त ’ॐ’?
त्याचं कारणही तसच आहे.खाली एक फ़ोटु लावलेला दिसतोय का? दिसतोय ना?

नशीबवान आहात. नाही नाही नाही!!! अश्या चिवित्र नजरेने बघु नका screen कडे.
हा फोटु बघुन बऱ्याच जणांनी असंच चिवित्र नजरेने पाहिलं. आपापल्या बुद्धिमत्तेप्रमाणे स्वतःची मतंही मांडली.

"अरे वा! असं कसं झालं रे?"

"छे! हा त्या चाळणीवरचा ठसा तर नाही? पहिल्यापस्नंच असेल असं डिजाईन.."

"नाही रे, माझा विश्वास नाही बसत!"

"अय्या ऽऽऽऽऽऽऽऽ कॊय सुंदर नाहीऽऽऽऽ! फारच छान! पुण्यवान माणसं तुम्ही!"


अश्या प्रतिक्रिया चालू असतानाच फोन वाजतो,

"हॅलो..."
"अगं मामी ऐकली तुझाकडची चमत्कारीक घटना. तु ही चाळण घेउन येशील का ग इथे? कर्जतला?"----अपेक्षांचा कहर.

मी सेकंड शिफ्ट्ला होतो, माझा मो्बाईल भुरभुरला खिश्यात. घरुन होता फोन.

"ह्र्दयेश , अरे आपल्या बाबांनी एक चमत्कार केलाय. म्हणजे झालाय त्यांच्या नकळत."
"कसला चमत्कार?"
"दुपारी ते दळून आणलेलं पीठ चाळत होते, तर चाळणीवर अचानक ॐ उमटला"
"काऽऽऽऽय????(!!!!), असं कसं होईल?"
"मस्त नक्षीपण आलीये बाजुला कोणीतरी हाताने काढल्यागत"
"बाबांनीच काढली असेल, सिमेट्री नसेल बघ त्या नक्षीमध्ये"
"बाबांनी पहिल्यांदा चाळल्यावरंच आला तो. त्यांनी झटकला, त्यावर टिचकी मारुन पाहिली , उरलेलं ५ किलोचं पीठही चाळून झाल. तरी जस्साच्या तस्सा राहीला आहे. अमेय, बंडुकाका वगैरे पण आलेत. अमेयनी फोटो काढला आहे. आणि अनुया पण येत्ये ऑफिसमधुन, दोन मैत्रिणीपण येणारेत तिच्याबरोबर."
"बरररर!!!"

मी इथे हापिसात हैराण... म्हणलं हा काय प्रकार आहे? घरच्या चाळणीवर ॐ? अचानक उमटला? आणि तोही बाबांच्या हातुन? थोड्यावेळाने मेल्स चेक केले तर मेव्हण्याने फोटु पाठवले होते. ते पाहुन मी थक्क झालो. माझी वाचाच बंद झाली!! ११ पर्यंत कसातरी बसलो हापिसात. बसमध्ये झोपही येत नव्हती. डोक्यात एकंच...कसा आला असेल ॐ? नेमका बसचा driver ही बदलला होता, साला जाम हळू चालला होता. रात्री १२.१५ वाजता घरी पोहोचलो तर आई-बाबा दोघेही माझ्यासाठी जागे होते.

मी मुद्दाम हळुहळु आवरत होतो. मला तो ॐ दाखवण्यासाठी आई-बाबा आतुर झाले होते. पण मी सावकाश सगळ आवरत होतो. आरामात बुट काढले, बेडरूममध्ये कपडे बदलले, बाहेर येऊन हात-पाय धुतले, तोंड धुतलं. आणि स्वच्छ होऊन स्वयंपाकघरात गेलो आणि देव्हाऱ्यालगतच्या खुर्चीवरची चाळण मी पाहिली आणि मी ठार येडा झालो. ताबडतोब आईला विझलेलं तुपाचं निरंजन परत लावायला सांगितलं. आणि एक फोटु काढला, जो आज तुम्हाला इथे बघायला मिळतोय.

फोटो बघुन कोणीही काहीहि म्हणोत. ज्याने प्रत्यक्ष पाहिला आहे हा प्रकार तो हे नक्की कबूल करेल की हा काहितरी चमत्कार आहे. कारण जो ॐ दिसतोय ते पीठ आहे जे चाळणीच्या खालच्या बाजुला चिकटलेलं आहे. बाकीचं पीठ गाळून पडलं आणि एक वर्तुळ तयार झालं, ज्यामू्ळे ॐ उठून दिसतोय. बाजुला जी नक्षी तयार झाली आहे ती वरवर बघता एकसारखी वाटली तरीही त्यात काही मराठी आणि इंग्रजी अक्षरंही दिसतात. नीट पाहीलंत तर G A N असं काहीसं दिसेल. बाबांनी चाळायला सुरुवात केली तेव्हा दुपारचे ३.१५-३.३० वाजले होते. तेव्हा घड्याळाचे काटे ज्याजागी असतात, तिथल्या भागातली नक्षी अपूर्ण आहे. का माहीती नाही. काही ठिकाणी ग दिसेल, तर काही ठिकाणी भुमितीतला पाय(३.१४) दिसेल. पायच चिन्ह नाही ह्या फॉंटमध्ये. ह्याचा अर्थ मला लागला नाही. पण मला हे चमत्कारीक आहे हे कबुल करावं लागलं. त्यापु्ढे नतमस्तक होण्याशिवाय पर्यायच नाही शिल्लक राहिला.

त्यानंतर अनेक जण घरी आले, ॐ पाहुन चकित झाले. आज आठ दिवस झालेत, ॐ तसाच्या तसा आहे. माझी एक दूरची आजी आली होती एक दिवस. वयस्कर आहे, बिचारीला चार मजले नाही चढता येत. बसून बसून यायला लागतं. पण केवळ इच्छाशक्ती आणि श्रद्धा ह्यांच्या बळावर ती चार मजले चढून आली. तिच्या डाव्या डोळ्याचं ऒपरेशन झालेलं असल्यामूळे तिला फकस्त उजव्या डोळ्यानेच दिसतं. आणि त्यामुळे त्या डोळ्यावर ताण येऊन तोही डोळा दुखायला लागतो आणि खायला उठतो. तिला काही केल्या हा ॐ दिसेना..!! मी बाहेर बसलो होतो, आईचा आतुन कॉल आला.

"ह्र्दयेश, आत्याला दिसत नाही चष्म्याशिवाय, जरा तुझ्या मोबाईलमधला फोटो दाखव तिला."

मी मोबाईल घेऊन आलो. त्याचा आकार लहान दिसत होता कारण screen लहान. तरी n73 आहे. आई pc चालू करून त्यावर दाखवायला सांगत होती. पण मी आळस केला आणि मोबाईलमधला फोटो उघडून आजीच्या पुढे धरला. काही सेकंद तिला ॐ दिसला नाही पण तिचे हात जोडले गेले. मी अजून जरा तिच्या जवळ धरला मोबाईल आणि angle थोडा adjust केला. तोच तिने पूर्ण नमस्कार केला आणि जोरात ओरडलीच,

"दि्सला दि्सला! ॐ दिसला, मला ॐ दिसला, ॐ दिसला मला!!" आवाज कापरा झाला, हात जिवणीजवळ गेले पदरासकट, आणि डोळ्यातून घळाघळा पाणीच वाहायला लागलं. मोबाईलच डोक्याला लावलाऩ आपल्या!! प्रचंड खुष झाली ती आणि उर एकदम भरून आलं तिचं. मीही थोडा हळवा झालो, स्वतःवर ताबा ठेवल्याने कंठ जड झाल्यासारखा वाटलं. पु्ढे ती आजी तिच्यापेक्षा २०-२५ वर्ष लहान असलेल्या माझ्या बाबांनाही नमस्कार करायला गेली. म्हणे तुमच्या हातुन झालाय हा चमत्कार. पण बाबांनी तिला आवरलं . हॉलमधल्या गजानन महाराजांच्या portrait कडे बोट दाखवून म्हणाले "ह्यांना करा नमस्कार! ही सगळी त्यांचीच कॄपा!!"