मी ऑफिसमध्ये बसलो होतो fb वर टाईमपास करत. दुसऱ्या डिपार्टमेंटच्या एका मॅडमनी सांगितलं फोनवर बोलता बोलता, "मुंबईत ३ ठिकाणी बॉम्ब्लास्ट झालेत, दादर, झवेरी बाजार, ऑपेरा हाऊस..." मोबाईल कानात(स्वतःच्या)खुपसुन मॅडम निघुन गेल्या. थोड्यावेळानी अजुन एक माणुस आला तोही तेच सांगुन गेला. डोळे वगैरे मोठे करुन, म्हणजे डोळे मोठे वगैरे करुन, "ब्लास्ट झालेत तीन" कलटी...... अजुन दोघेजण माझ्या डेस्कवरुन पास झाले. आपसात बोलत होते, "सालं काय मिळतं या भोxxच्यांना common man ला मारुन समजत नाही. आपलं गव्ह...." असं काहीतरी बोलुन बहुदा पुढे सरकारलाही शिव्या घालुन झाल्या. मी लगेच news सुरु केल्या. कुठे सगळ्यात चांगला, ताजा मसाला मिळतोय याचा शोध सुरु...आम्ही तेच करु शकणार उभ्या आयुष्यात! परत शिफ्टमधल्या दुसऱ्या मुलाला फोन पण केला, "काय रे लवकर सोडायचे काही चांसेस?" माझ्यासारखा अतिसामान्य माणुस तरी अशा वेळेला असाच react होऊ शकतो.
थोड्यावेळाने मित्रांना फोन करायचा प्रयत्न केला, सगळ्या सर्विस प्रोवायडर्सचे सगळे नंबर ‘नोट एवेलेबल’ झाले होते. हरामखोरांनी लॅंडलाईन्स पण बंद केल्या होत्या. हे म्हणजे अतीव बोरिंग होतं. म्हणजे माणुस या असल्या घटनांनतर इतर बडबड फोनवर करुच शकत नाही का? काय वाट्टेल ते समज असतात सरकारचे. बॉम्बस्फोट, ताजसारख्या ठिकाणी दहशतवादी हल्ले, या सगळा घडामोडी अताश्या मुंबईकराच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक होत जाणार आहेत. मुंबईकरांना याची सवय नको का व्हायला? फोन लाईन्स बंद करुन ठेवल्यामुळे काहीतर आभाळ कोसळल्यासारखं वाटलं ना उगाच. Actually, it was just a bomb blast! जपानी, इंडोनेशियन जनतेला भुकंप, त्सुनामी आणि ज्वालामुखींची सवय झाली आहे. हे दहशतवादी लोकं आपल्याला बॉम्बस्फोटांची सवय लावताएत....असो!!!
आपल्या देशातले तरुण तर असल्या घटना घडल्या कि लईच active होतात. सर्वात पहिल्यांदा ते जर काही करत असतील तर सोशल नेटवर्किंग साईट वर लोगिन करतात. स्वतः काहीतरी हास्यास्पद पोस्ट टाकतात, त्याला कोण कोण `Like' करतंय ते बघतात, मग दुसऱ्यांच्या हास्यास्पद पोस्ट्स ना ‘Like’ करतात, मग त्यावर हास्यास्पद `Comment' टाकतात. एवढाच काय तो धंदा त्यांना शिल्लक राहतो. हे सगळं मी स्वानुभवावरुन सांगतोय बरं का!
आज सकाळी उशीरा उठुन सर्वात आधी मी टीव्ही सुरु केला. News Channels फिरवुन रिमोटची बॅटरी थोडी संपवुन झाली. प्रत्येक channel वरचे शब्द वेगवेगळे होते. पण सगळ्यांनी बहुदा एकंच पॅरा रेडी करुन ठेवला होता. त्यामुळे सगळीकडे तासभर एकच पॅराग्राफ परत परत वाचला जात आहे असा भास मला झाला. एकाच channel वर मुसळधार पावसात भिवंडी आणि कल्याणची १०० घरं पाण्याखाली गेल्याची बातमी चालु होती. त्यातही एकच पॅरा परत परत वाचुन दाखवत होते. वैतागुन परत वर्तमानपत्र हातात घेतलं. त्यात काही नवीन, वेगळं दिलंय का ते शोधायचा प्रयत्न केला. त्यात कोण काय म्हणाले? हे जरा वाचनीय वाटलं.
त्या सगळ्यात आपले लाडके, धैर्यशील, कर्तबगार अशा राहुलसाहेब गांधींचे उद्गार समजल्यावर माझ्या अंगात अजुन आग आहे आणि ती तळपायापासून मस्तकापर्यंत वाहते आहे अशी जाणीव मला झाली. तो भडवा म्हणतो,"दहशतवाद आपण रोखुच शकत नाही." या त्याच्या उद्गारावरुन एकुणच राजकारण्यांचा या सगळ्या घडामोडींकडे बघण्याचा काय दृष्टीकोन आहे हे समजलं. त्यांना काय, त्यांच्या बुडाखाली मऊ सीट असलेल्या AC गाड्या असतात. शिवाय सोबत Z किंवा Z+ सुरक्षा. म्हणजे साला जे या पृथ्वीतलावरच काय, अख्या विश्वात एक क्षण पण जगायला लायक नाही, अश्या राजकारण्यांना या स्फोटांमध्ये साधं खरचटत पण नाही शिवाय हे ज्यादा पोलिस दल स्वतःच्या सुरक्षेसाठी वापरुन तोंड वर करुन बोलतात!!! यांना सत्तेच्या खुर्च्या हव्यात, त्यावर बसुन प्रचंड पैसा ओरपायला हवाय, जनता कष्ट करुन पैसा कमवते, त्यावरचा टॅक्स हे लोक बायांवर उडवायला वापरतात. अफजल गुरु आणि कसाब सारखे दोशी चैनीत या टॅक्सवर जगत आहेत. लोकं रिटर्न फाईल करतात पण non-taxable amount जनतेला पैसे चारल्याशिवाय परत मिळत नाही. अमेरिकेवर एकदा हल्ला झाल्यावर १० वर्षात तिथे परत अशी घटना घडली नाही. आणि आपल्या इथे वर्षातुन १० वेळा घडतात. असे हे षंढ आपले राजकारणी. साले वोट-बॅंकसाठी गुन्हेगाराल पोसताएत. गिरगाव चौपाटीवर लोकांनी कसाबला झोडपला आहे, हे सर्वश्रुत आहे. तरी हल्ला करणारा कसाब हाच का? याचे पुरावे गोळा केले जाताएत! कहर आहे.
इथे आम्ही मरमरून कामं करतो, वेळेत कर भरतो आणि त्याचा वापर हे दळभद्री लोक अतिरेक्यांना पोसायला वापरतात, नाहीतर ५ वर्ष खुर्च्या राखुन स्वतःच्या घश्यात घालतात. रस्त्यावरचे खड्डे वर्षानुवर्ष तसेच आहेत. त्यामुळे अनेक अपघात होतात. महागाईनी हद्द पार केली आहे. पेट्रोल, डिझेल आणि एकुण इंधन दरवाढ मोठ्या प्रमाणात झालीये. तरी ठिके पेट्रोल, डिझेल हे आपले चोचले आहेत. पण खाद्यपदार्थांच काय? ते तर अखिल मानवजातीचं इंधन आहे. जीवनावश्यक वस्तू आहे ती. माणसाच्या तीन मुलभुत गरजांपैकी १ नंबर गरज आहे अन्न! महिन्याला ५-६ हजार रुपये कमावणारे काय खात असतील? किती खात असतील? त्यांच्या कुटुंबाला पुरत असेल का ते? हवामान बदल किंवा अन्य काही कारणांमुळे जर शेतीवर किंवा तत्सम उत्पादनाचं नुकसान होत असेल तर स्वस्त दरात ते जनतेला उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी सरकारची नाही का? कोणत्याही उत्पादनावर कर पण भरायचा परत नुकसान भरपाई म्हणून ज्यादा दरातले खाद्यपदार्थही विकत घ्यायचे? मग इतके कोटी रुपये कर भरणाऱ्या लोकांनी कर भरावाच का? त्याचा जनतेसाठी कुठे आणि कधी वापर होणार?
१३ जुलै २०११, मुंबईच्या ३ गजबजलेल्या भागांमध्ये गजबजलेल्या वेळेलाच दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा साखळी बॉंम्बस्फोट घडवून आणले. काही लोक याचे हकनाक बळी गेले तर काही शे लोक हकनाक जखमी झाले. दर १-१.५ वर्षांनी हि घटना आता मुंबईमध्ये घडु लागली आहे. राहुल्याचे उद्गार वर दिलेले आहेतच. दिग्विजय नावाच्या सिंगानी आज विनोद केला. म्हणे आपली परिस्थिती पाकिस्तानपेक्षा बरी आहे. तिथे आठवड्याला होतात स्फोट. पण अरे मूर्खा तू इथे तशी परिस्थिती यायची वाट बघणारेस का? आणि तुलना कोणाबरोबर करायची याची जाणीव नको का? आम्ही तुझ्या सगळया बँक खात्यांवरची रक्कम देशातल्या सगळ्यात गरीब भिकाऱ्यापेक्षा जास्त राहील असं बघतो, बाकीची काढुन घेऊन आपसात वाटतो. वर आम्ही असं म्हणतो, "समाधान मान कि तो भिकारी तुझ्यापेक्षा गरीब आहे" चालेल का हे त्याला? पाकिस्तानशी तुलना करतोय हिंदुस्तानची!!! लोकांच्या हतबलतेचा गैरफायदा घेतला जातोय. मऊ भाग लागतोय तो कोपराने खणला जातोय. कठिण भाग लागतोय त्याला तोडून टाकण्यात येतंय. मानवाधिकार कसाब आणि अतिरेक्यांना लागु होतो, पण त्यांनी मारलेल्या जनतेला लागु होत नाही अजबंच आहे सगळं.
खरं सांगायचं तर आपण आता लोकशाहीत जगायच्या लायकीचे राहिलेलो नाही असंच वाटु लागलंय मला. किंबहुना आपण ज्याला लोकशाही म्हणतोय ते लोकांनी लोकांचे लोकांसाठी केलेले राज्यंच नाहीये. निवडणुका होतात, उमेद्वारांना राजकीय पक्ष तिकिट देतात. त्या उमेद्वाराची काय लायकी असते लोकांच प्रतिनिधित्व करण्याची? कोणत्यातरी झोपडपट्टीत राहणारा, बाजुच्या मैदानात दिवसभर क्रिकेट खेळणारा, ज्याच्या शिक्षणाचा बालवयातंच बोऱ्या वाजलाय, ज्याच्या पालकांचा आपल्या अपत्यावर ताबा नाही त्यामुळे संस्कार वगैरेंपासुन कोसो दूर राहिलेला असा माणूस निवडणूक लढवतो? त्याची काय पात्रता आहे? नगरसेवक या नावात सगळं आलंय, नगराचा सेवक आहे तो मालक नाही,याचं त्याला भान असायला हवं. ना ज्याला समाजशास्त्राच ज्ञान, ना राजकारणाचं ज्ञान, ना त्याला इथल्या संस्कृतीचं ज्ञान, ना त्याला इथल्या जनतेच्या समस्यांची कदर, असा माणूस आमदारकी आणि खासदारकीची निवडणूक लढवतो? तुमच्या आमच्यासारख्या माणसाने अश्या गयागुजऱ्या माणसांमधुन एखादा उमेद्वार निवडावा? हे म्हणजे वासरात लंगडी गाय शोधण्यासारखं आहे? खरतर परिस्थिती उलटी असायला हवी, सर्व उत्तम उमेद्वारांमधुन सर्वोत्तम उमेद्वार निवडायचा निर्णय आपल्याला द्यायला हवा.यातला एकही उमेद्वार आमचं प्रतिनिधित्व करायला लायक नाही असं मत नोंदवायची संधी आपल्याला मिळायला हवी. ते असेलही कदाचित, निवडणूक समिती आणि राजकारण्यांनी संगन्मतानी दडवून ठेवली असेल ही सोय. आपण निवडणूक समितीलाही काही बोलू शकत नाही, अक्षम्य गुन्हा आहे तो. का कबुल करावं आपण कि ही लोकशाही आहे?
नेहरू-गांधी कुटुंबीयांनी देशाची पार धुळधाण उडवुन टाकली आहे. ब्रिटिशांनी लुटलं नाही तेवढं यांनी अवघ्या साठ वर्षात लुटलं आहे. ब्रिटीशांनी फक्त धन-दौलत लुटली. स्वकीयांनी स्वाभिमान, स्वावलंबन, प्रामाणिकपणा, माणुसकी यासारखी कोणत्याही राष्ट्राला कोणत्याही संकटातुन तारुन नेणारी संपत्ती लुटली आहे. अगदी आर्य चाणक्य आणि पृथ्वीराज चौहान, छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, पेशवे, लोकमान्य टिळक, आगरकर, लाला लाजपत राय, बिपिनचंद्र पाल, क्रांतिसिंह नाना पाटील, स्वातंत्रवीर सावरकर, भगतसिंह आणि त्यांचे साथीदार, सुभाषचंद्र बोस आणि त्यांची सेना, स्वामी विवेकानंद आणि इतिहासाला माहिती नसतील अश्या अनेक स्वातंत्रसेनानींकडे ही संपत्ती होती. तेव्हाच्या देशद्रोह्यांनी किंवा शत्रुंनी आर्थिक संपत्ती वारेमाप लुटली असेल कदाचित, पण तेव्हाच्या भारतीय जनतेची स्वाभिमान, स्वावलंबन, प्रामाणिकपणा, माणुसकी, स्वराष्ट्राबद्दलचं प्रेम वगैरे वगैरे सारखी संपत्ती नाही लुटू शकले. म्हणून हिंदुस्थान एवढे वर्ष तग धरून उभा आहे. पण गेल्या साठ वर्षात गांधी-नेहरू कुटुंबाला जे रान मोकळं मिळालंय त्यांनी पार आपला बोऱ्याच वाजवलाय.
आपण जनताही या सगळ्याला मोठ्या प्रमाणात जबाबदार आहोत. आपण कधीच सामुहीक बहिष्कार नाही घातला. उभं बॉलिवुड अंडरवल्डच्या पैश्यावर आपलं मनोरंजन करतंय हे अनेकदा सिद्ध झालंय आणि आपणा सर्वांना ते ठाऊक असूनही आपण सर्व सिनेमे बघतो. ज्या माणसाला या देशाची फिकीर नाही त्या माणसाचे पैसे ज्या सिनेमाला लागले आहेत तो सिनेमा आपण का बघावा? आणि का त्याला दुप्पट पैसा कमवू द्यावा? इथल्या कित्येक कलाकारांवर देशद्रोहाचा आरोप झालाय. आधी देशाचा नागरिक मग कलाकार. आपण अश्या कलाकारांना डोक्यावर घेतो. कोणताही माणूस कितीही मोठा कलाकार, व्यावसायिक किंवा आणि कोणी असेल तो देशापेक्षा मोठा नाही. याची आपल्याला जाणीव असायला हवी. पाकिस्थानी गायक असतील चांगले गात कोण नाकारतंय पण त्यांनी त्यांची कला तिथे सादर करावी आणि नाव कमवावं. इमान पाकिस्तानशी राखायचा आणि पोट भारतात भरायचं, ही कोणती तऱ्हा? आपण या कलाकारांवर बहिष्कार टाकायला हवा. स्वदेशीच्या बाबतीत आपण आग्रही नसतो. स्वदेशी हे ब्रिटिशांविरोधी प्रभावी शस्त्र होतं हा इतिहास आपण विसरतोय. इथली प्रोडक्ट्स निकृष्ट दर्जाची असतात असा आपण ओरड करतो, पण MADE IN CHINA वाली प्रोडक्ट्स तरी अप्रतिम असतात का? पण त्यांनी इथलंच काय जगातला बाजार ताब्यात घेतला आहे.
असो, सगळं सुन्नं करणारं आहे. इथे सुधारण्यासारखं खुप आहे. आपापल्या ऑफिसात Team Lead बनण्यासाठी राजकारण करणारे हुशार लोक चांगल्या गोष्टी घडाव्यात म्हणुन, देशात सुधारणा व्हावी म्हणून समाजाच्या काही भागाचं नेतृत्व मिळवण्यासाठी का नाही असे तडफडंत? सगळा जोशंच गेलाय समाजातला. आता या घडीला मी देशातल्या पुरूष, स्त्रीया आणि तृतीय पंथी यांच्यात भेदच करू शकत नाहीये. मला सगळे हिजडेच दिसताएत. इथे तृतीय पंथीयांच्या नैसर्गिक व्यंगाची खिल्ली उडवण्याचा हेतु नाहीये. पण आपण चीनच्या मागोमाग इतर कोणत्याही बाबती प्रगती करत नसलो तरी लोकसंख्या वाढीच्या बाबतीत मात्र आपण चीनच्या पावलावर पाऊल ठेवतोय. किंबहुना आपलं पाऊल त्यांच्याहुन वेगाने चाललंय. पण बॉस २-४ पोरं काढून बाप झाल्याने कोणाची मर्दान्गी सिद्ध होत नाही ना!!
Friday, July 15, 2011
Wednesday, September 1, 2010
मंतरलेले दिवस
२००१ साली आईवर कविता सुचली, बरोबर चालही सुचली. आईच्या घराण्यातंच संगीत. तिथुनंच संगीत आमच्यात उतरलं. मामानी ती कविता आणि चाल ऐकली. आणि त्याच्या पुढच्या भेटीत मला मंगेश पाडगांवकरांचं जिप्सी भेट म्हणुन मिळालं. तेव्हा पहिल्यांदा कविता समजू लागली, कवितेबद्दल आवड निर्माण होऊ लागली. संगीतकार जसा स्वरज्ञान घेऊनच जन्माला येतो, तशी कविताही सूर घेऊनच जन्माला येते. संगीतकार आणि कवितेचे सूर जुळले, संगीतकाराला कवितेचा सूर समजला, भिडला, की ते सूर तो लोकांना ऐकवतो. आणि कवितेचं गाण्यात रुपांतर होतं. कवितेला जबरदस्ती सुरात बांधलं, कि तेच सूर साखळदंडासारखे नकोसे वाटतात. विहीर खोदून मिळवलेलं पाणी आणि दगडाला पाझर फुटून वाहणाऱ्या झऱ्याचं पाणी, यांच्या गोडव्यात जो फरक असतो, तोच फरक बांधलेल्या चालीत आणि सुचलेल्या चालीत असतो. त्या बांधकामात झालेली ओढाताण आपल्याला जाणवते. सुचलेल्या चालीत नाजुक, विणलेलं नक्षीकाम अनुभवायला मिळतं. हे जेव्हा समजलं, तेव्हापासून चाल सुचायची वाट पाहु लागलो. देवाच्या कृपेने छान कविता समोर येत गेल्या आणि त्यातल्या चाली मला दिसू लागल्या, सुचू लागल्या.
माझ्या अनेक मित्र-मैत्रिणी, नातेवाईकांनी वेगवेगळ्या प्रसंगी माझी गाणी ऐकली. २००९ साली माझ्या गाण्यांचा एक कार्यक्रम कट्टेकर मित्रांनी ठेवला. त्याला फार छान प्रतिसाद मिळाला. आपल्या चाली लोकांना आवडू शकतात याची जाणीव मला तेव्हा झाली. आणि हीच गाणी आपण लोकांसमोर आणायची असा निर्णय मी घेतला.
घर बांधणं जसं एक काम आहे, तसंच घर आतुन सजवणं ही देखील एक कला आहे. घर बांधणारा माणूस हा उत्तम interior decorator असतोच असं नाही. त्यासाठी वेगळ्या, त्यात माहीर असलेल्या माणसाची आपण मदत घेतो. पाटावरच्या गणपतीएवढंच महत्त्व मखरालाही आहे. गाण्य़ाची चाल म्हणज गणपती-आत्मा-गाभा. गाण्यात वाजणारं वाद्यवृंद, दोन कडव्यांमधलं म्युझिक म्हणजे मखर. चालीएवढंच त्या सजावटीलाही महत्त्व आहे. संगीत-संयोजक म्हणजे गाण्याचा मेक-अप मॅन. या महत्त्वाच्या जबाबदारीसाठी मला आनंद सहस्रबुद्धेसारखा योग्य आणि कोणी माणुस मिळाला नाही. श्री. अनिल मोहिले यांच्या हाताखाली शिकून आणि गेली ६-८ वर्ष संगीतक्षेत्रात राहुन तो ताराही आता लखलखू लागलाय. संगीत-संयोजनाशिवाय, एक मित्र म्हणून त्याने अनेक बाबतीत मला मदत केलीये, आणि त्याची एक मोठी यादी आहे.
अनेक चर्चांमधून कोणतं गाणं कसं करावं? त्यात कोणती वाद्य वापरायची? गाण्याचा साधारण आवाज कसा असेल? गाणं कसं ऐकु येणं अपेक्षित आहे? गाणं कोण कोण गाणार? त्यांच्या पट्ट्या काय? गाण्याची लय काय? या बाबी नक्की करण्यात आल्या.
पार्ल्यातल्या एका छोट्याश्या खोलीत आनंद, अभिजित सावंत(हा तबलजी Indian Idol चा विजेता नाही), अनिल करंजावकर आणि मी तालवाद्याच्या संयोजनासाठी भेटलो होतो. अनिल करंजावकरांचा मिश्किलपणा सुरु होता. माणुस ३०च्या आसपास असेल असा माझा अंदाज होता. नंतर समजलं कि संगीतसाधना करून माणुस १०-१५ वर्ष तरुण सहज राहु शकतो. धुमाळचे बोल ते "श्रीराम जय राम जय जय राम" असे बोलतात तर दादऱ्याचे "ह्याला पाडलं, त्याला पाडलं" असं म्हणतात. आनंद त्यांना एकेक गाणं वाजवुन दाखवे, M0, M1,M2, Fillers वगैरे वाजवुन दाखवे. कुठे कोणता ताल वापरावा? कसा पॅटर्न असावा? पखवाज कुठे असाव?, ढोलक कुठे असावं? इतर तालवाद्य कुठे असावीत? डफ कुठे असावा? टिंपनी कुठे असावी? मादल कसा वाजावा...वगैरे गोष्टींवर चर्चा करून सात तासात ती मैफल संपली. माझे स्टुडिओचे ७ तास वाचले. दोन दिवस हे तालवाद्यांचं सत्र चाललं.
त्यानंतर विजुजी आले. १० च्या ऐवजी ११ वाजले यायला. बाहेरगावहुन आल्याचा थकवा चेहऱ्यावर दिसत होता, अंगात थोडा ताप आहे असंही ते म्हणाले ते. पण हातात बासरी घेतल्यावर कानाला जे सुख मिळालंय ते अवर्णनीय! प्रत्येक पीसमध्ये एवढा भाव भरलेला होता! परत आखडूपणा न करता स्वतः अजुन सुधारणा करीत होते. "higher octave मध्ये वाजवुन बघतो", "lower octave घे याचा", "याचा सेकंड पण घेतो lower मध्ये" असं म्हणून जे काही द्यायचे.......प्रत्येक प्रयत्न आधीच्या प्रयत्नापेक्षा सरस आणि त्यांना जे सुचत होतं ते आधीच्या प्रत्येक पायरीपेक्षा वरचढ. दिल खुश हुआ........
दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता परत रेकॉर्डिंग सुरु होणार होतं. मी पावणे दहालाच हजर होतो.१० ला ५ कमी असताना स्टुडिओच्या गेटपाशी एक रिक्षा थांबली. त्यातुन साठीच्या आसपास वय असलेले एक काका उतरले. त्यांना कुठेतरी पाहिल्यासारखं वाटत होतं. त्यांनी रिक्षातुन एक उभ्या आकाराची बॅग काढली. आणि ते होते उमाशंकर शुक्ला. ती सतार पाहिल्यानंतर मला आठवलं, की गुलाम अलीसाहेबांच्या एका लाईव्ह शो ला मी गेलो होतो, तेव्हा बाजुला जे सतारवादक होते ते सतारवादक माझ्या गाण्यांसाठी सतार वाजवणार आहेत. आणि मी किती नशीबवान आहे याची जाणीव झाली मला.
संतुरवादन ही तर काही गाण्यांची गरज होती. त्याशिवाय गाणं पूर्णच झालं नसतं. आनंद म्हणाला आपण उल्हासजींना विचारु. त्यांचं मानधन आपल्या बजेटमध्ये बसणार असेल तर उत्तम. कारण VST किंवा साउंडफॉंट वापरुन वाजवलेल्या संतुरमध्ये मजा नाही. उल्हासजींना फोन लावला, त्यांचं मानधन आम्हाला झेपणार नव्हतं. त्यामुळे आम्ही मनाची तयारी करुन तो नाद सोडला होता. कारण सर्विस घ्यायची तर त्याचा मोबदला पण तेवढा गेला पाहिजे असं आमचं मत होतं. पण आधी नाही सांगुन त्यानंतर स्वतःहुन उल्हासजींचा फोन आला. "तुमच्याबरोबर मी कधीच काम केलेलं नाहीये, त्यामुळे मी वाजवीन संतुर". अगदी एस. डि. बर्मन, पंचमदांच्या काळापासुन म्हणजे कमीत कमी गेली ४० वर्षे जी व्यक्ती संतुर वाजवत्ये, आणि एवढ्या मोठ्या संगीतकारांसाठी ज्यांनी काम केलंय ते संतुरवादक ४ गाण्यांसाठी संतुर वाजवुन गेले. एकामागुन एक असे पिसेस देत होते. स्टुडिओ प्रसन्नतेने भारुन गेला होता. श्रावणातला वारा सुटावा, सगळीकडे हिरवंगार, प्रसन्न दिसावं असं काहीसं वाटत होतं. संतुरचा नाद कानात भिनत होता रात्री झोपल्यावर पण! उल्हास बापट दि ग्रेट!!!
ज्ञानेशदादांचं स्पॅनिश गिटार आणि ट्वेलस्ट्रिंग लाजवाब होतं. ज्ञानेसदादांना फक्त गाण्याची पट्टी सांगायची आणि गाणं ऐकवायचं, गाणं ऐकता ऐकता गाण्याचं बार टु बार नोटेशन काढतात. कसली तयारी असेल या माणसाची! ते खरोखर पट्टीचे वादक आहेत. टोनी वाझ म्हणून पंचमदांचे बेस गिटारवादक होते, उतारवयात त्यांना वृद्धाश्रमात राहायला लागले. त्यांची उतारवयात सगळी सेवा मनिष कुलकर्णीने वृद्धाश्रमात जाऊन केली. टोनीजींनंतर त्यांच बेस गिटार थेट मनिषदादाकडे. पंचमदांच्या गाण्यांमधलं बेस गिटार म्हणजे अतुलनीय. तीच नजाकत मनिषदादाच्या वादनात उतरलीये. गुरुवर श्रद्धा असल्याशिवाय असलं होत नाही. मला नाही वाटत गुरुंची अशी सेवा हल्ली कोणी करत असेल.
या सगळ्यांना साथ मिळाली ती दिपक बोरगांवकरांच्या साईड ऱ्हिदमची. तुम्हाला कसला आवाज हवाय एवढं फक्त सांगा, स्टुडिओभर त्यांची वाद्य असतात, त्यातुन ते वेळेत नेमक वाद्य शोधुन काढतात. पक्ष्यांचा, झऱ्याचा, वाहत्या पाण्याचा, घंटांचा, घुंगरुंचा, पाण्यात पडणाऱ्या थेंबांचा.........तुमच्या अपेक्षा पूर्ण होणारंच!
धर्म हे वंश हे देश भाषा किती,
सर्व सीमा सहज सूर ओलांडिती
हे दाखवण्यासाठी आम्ही भारतातल्या वेगवेगळ्या प्रांतातली वाद्य वापरुन ताल आणि सूर जुळवुन वरील ओळींचा अर्थ प्रगट केला. अक्षरश: १-१ बारसाठी नवीन वाद्य वापरलंय. म्हणजे गाण्यात एक वाद्य अंदाजे ५ सेकंदांसाठीच. ही सगळी वाद्य ते एवढ्या कमी अवधीसाठी शोधुन, ट्युन करून, परत त्याच जागी बांधुन ठेवत होते. एखादा असता तर कावला असता, आणि आम्हाला शिव्या हासडल्या असत्या. पण त्यांचा काम करण्यात असलेला लगाव तुम्हाला विडिओमध्ये दिसेलंच. आता हे गाणं बाजुच्या गाण्यांच्या यादी ऐका आणि कसं वाटलं ते सांगा. ‘बरसत आल्या अमृतधारा’मध्ये तर त्यांनी वाजवलेले घुंगरु डोळे मिटुन ऐकले तर समोर कथ्थक नृत्याच्या steps पण दिसतात, एवढं ते जिवंत वाजवलंय. दिपककाका तुफान आहेत!
कंठसंगीताच्या रेकॉर्डिंगचा पहिलाच दिवस होता. जो गायक समोर येऊन गाणार होता, ज्याच्या आवाजात माझ्या अल्बमचं पहिलं गाणं रेकॉर्ड होणार होतं, त्या गायकाने जवळजवळ गेली ३५ वर्षे मराठी आणि हिंदी संगीतक्षेत्रात आपल्या मृदु, मुलायम आणि सुरेल आवाजाने स्वतःभोवती एक वलय निर्माण करुन अढळपदी स्थान मिळवलं होतं. आणि असा गायक आपलं गाणं गातोय, यासारखी अभिमानास्पद गोष्ट कोणती असली तरी या गोष्टीशी त्याची तुलना होऊ शकत नाही. त्यांचं नाव श्री. सुरेश वाडकर! नावाप्रमाणे सुरेश....... एका दिवसात ४ गाणी रेकॉर्ड केली. एक गाणं समाधानकारक झालं नाही. तेव्हाच आणि वेळ नसल्यामुळे काही दिवसांनी रेकॉर्ड करू परत असंही सांगितलं आणि त्याप्रमाणे केलं. मी त्यांच्यापुढे एवढा छोटा असुनही मी सांगितलेल्या चुका मोठ्या मनाने सुधारत होते. कुठेही मी नवोदित संगीतकार आहे अस मला भासवु दिलं नाही. कोणा लहान माणसामुळे लहान होण्याच्या पलिकडे गेले आहेत ते.....
मंदारने तर मला सीडीची कल्पना डोक्यात आल्यापासूनच वेगवेगळ्या प्रकारे आणि वेळी मदत केली आहे. कितीही वरची पट्टी असली तरी त्याचा आवाज गोडच येतो. तो स्वतः उत्तम संगीतकार असल्यामुळे कवितेची जाण आहे त्याला. वैशाली तर विश्वगायिका शोभेल अशीच गायलीये. तिच्यातला सर्वात चांगला गुण असा कि तिला तिची चुक समजते आणि ती लगेच सुधारते. मोठं होण्याचं लक्षण आहे हे. श्रीरंग तर फारच सुरेख गायला आहे. त्याचा आवाजही गाण्याला साजेसा, कॉलेजमधल्या मुलासारखा आल्यामुळे ते गाणं एकदम तरुण झालंय.
हे सगळं एकत्र बांधण्यात मला सर्वात जास्त मदत केली आनंदनी. त्याच्या संयोजनाने गाण्यांचं सोनंच नाही, तर गाणी सोन्याहुन पिवळी झालीत. Hats off to his sincerity, commitment, devotion, creativity and aesthetic sense. त्याच्या कामाची पद्धत बघुनच हा ‘लंबे रेसका घोडा’ असल्याची मला खात्री पटली.
सगळे गायक, वादक, रेकॉर्डिस्ट यांनी आपापली कामे चोख केली आहेत. आता पाळी श्रोत्यांची. उत्तम दर्जा राखण्यासाठी जे जे आवश्यक होतं ते ते सगळं आम्ही आमच्यापरीनी केलं. सर्व गायकांनी, वादकांनी गाण्यांचं नुसतं सोनंच केलं नाही, तर गाणी सोन्याहुन पिवळी केली आहेत. ‘टेक’ म्हणून ते जे काही देतात ते घ्यावं तेवढं कमीच! त्यांनी घेतलेल्या मेहनतीसाठी तरी ‘आता उजाडेल’ हा अल्बम सर्वांनी विकत घ्यावा हि माझी सुज्ञांकडुन किमान अपेक्षा आहे. आपणा सर्वांसाठी १०० रुपये जड नाहीत. ४० रुपयांमध्ये १५० गाणी आणि १०० रुपयांमध्ये दहाच गाणी? असा विचार कृपया कोणीही करु नये. ही दहा गाणी समोर येण्यासाठी खुप मेहनत, लगाव आणि कामावरची निष्ठा असायला लागते, ती ४० रुपयांमध्ये १५० तयार गाण्यांची सीडी बनवुन धंदा करणाऱ्यांना नाही समजणार. आपण सुज्ञं रसिक आहात, त्यामुळे पायरसी करणाऱ्यांमध्ये तुम्ही सहभागी होणार नाही, याची मला पूर्ण खात्री आहे. आपण सीडी जरुर विकत घ्या, आणि तुमचा जो काही खराखुरा अभिप्राय असेल तो मला नक्की कळवा...धन्यवाद.
Subscribe to:
Posts (Atom)


