Sunday, September 15, 2013

आध्यात्मिक व्यभिचार

       गणपतीच्या आकाराचा एक दगड ठेवलाय प्लास्टरचा, आणि त्याच्यापुढ्यात लोकं नतमस्तक होताहेत, काय आश्चर्यकारक चित्र आहे! मंडळाचा कार्यकर्ता स्त्री-पुरुष न पाहता सर्व भक्तांना अंगलट करून बाजूला ढकलण्याचं कार्य करतोय, या वयात वडील पण आपल्या मुलीला असा सहज स्पर्श करत नाहीत! अरे जागे व्हा.....
      
       ते मंडळ त्या गणेशाच्या आकाराच्या दगडामुळे नाही प्रसिद्ध झालंय, ते तुमच्यासारख्या अंधश्रद्ध भाबड्यांमुळे प्रसिद्ध झालंय. निर्गुण निराकार असणाऱ्या त्या गणेशाला दगडात शोधायला निघालेत. तुमच्या अंधश्रद्धेला ते आणि तुम्ही श्रद्धा म्हणताय, तुमच्या अंधश्रद्धेवर पोट भरतंय त्या मंडळाचं. आणि मला खात्री आहे तुम्ही मूर्ख, अंधश्रद्ध त्या दगडाच्या पायाशी उभ्या असलेल्या सो कॉल्ड कार्यकर्त्याने तुमच्या बुडावर लाथा घातल्या तरी तुम्ही जागे होणार नाही...

       आणि तिथे १०-१२ आणि २४ तास रांगेत उभे राहून तुम्ही काय तुमची त्याच्यावरची श्रद्धा त्याला सिद्ध करून दाखवताय? अरे झापडं बांधली आहेत तुम्ही तुमच्या डोळ्यावर! गांधारी पण डोळस होती तुमच्याहून. नाकाच्या वरच्या टोकाला जी दोन भोक आहेत ना तुमच्या तिथे फक्त डोळे आहेत, खरं बघण्याची क्षमता नाही किंवा सवय नाही किंवा तुम्हाला खरं बघायचंच नाही. काम-धंदे टाकून तिथे खुळचट आध्यात्मिक व्यभिचार केल्याने प्रसन्न होणार नाही तो राजा. तुमच्या असल्या वागण्यानी, तुम्ही केलेल्या नवसांनी तुमचं एक कण पण भलं होत नाहीये, पण मंडळ, कार्यकर्ते, राजकारणी आणि समाजातले इतर संधीसाधू यांच्या तुंबड्या अगदी तुडुंब भरल्यात आणि गलेलठ्ठ झाल्याएत. कोणत्याही बुवा आणि बाबांपेक्षा हे वेगळे नाहीत. ध्येय एकच, पद्धत वेगळी. अरे बंद करा हे स्तोम माजवणं. ज्यांची क्षमता नाही त्यांना खांद्यावर, डोक्यावर नका घेऊ. पापाचे धनी व्हाल. तुमचा कान, बुद्धी यांनी भ्रष्टावली आहे. तुम्ही नादी लागला आहात या भोंदूंच्या. एवढ्या प्रचंड प्रमाणात गोळा कशासाठी व्हायचं? तर एका रुबाबदार राजासारखा आकार असलेल्या दगडावर डोकं ठेवायला! किलोकिलोनी सोनं नवसावर वाया घालवायला! अरे एवढी संपत्ती जास्त झालीये तर गरीबांसाठी काही विधायक काम सुरु करा. दगडाला कशाला देताय? अखेर मंडळ त्याचा लीलावंच करणारे.. कधी शहाणे होणार तुम्ही? त्या माजलेल्या कार्यकर्त्यांपेक्षाही त्यांचा माज वाढवण्यासाठी तिथे गर्दी करून प्रोत्साहन देणारे तुम्ही सर्वात जास्त दोषी आहात.

भा+रत, भक्ती मध्ये रत असलेला समाज... भक्तीचा अर्थ समजून घ्या. प्रज्ञाचक्षू जागे करा.....

No comments: