Friday, August 28, 2009

अध्याय तेरा - निकाल

श्रोतेजनांसि वंदन । तुम्ही अभिष्टचिंतन ।
द्यावे मजसि आतुन । थेट कप्प्यातुन ह्रदयाच्या ॥

दिवस खरेच आजचा । आहे फार मोलाचा ।
प्रश्न जीवन-मरणाचा । आहे खरा नि:संशय ॥

ठरल्याप्रमाणे तयारी । करून मनाची सारी ।
निघालो दोपहरी । भेटावयासि ’ती’ला ॥

एवढे निकाल आजवरी । लागले आहेत परि ।
एवढे काहुर अंतरी । नाही कधीच माजले ॥

कँटिनमध्ये बसुन । मग्न झाले नयन ।
चालु होते चिंतन । ‘ती’च्याच विचारांचे ॥

आणि अखेर स्वारी । पडली दुरुनच दर्शनी ।
अन सावरलो अंतरी । जवळच ‘ती’ येता ॥

नजरेस ‘ती’च्या नजर । भिडवायास वाटे डर ।
पण सौंदर्याचा कहर । रोखु न शके मजला ॥

क्षणभर पाहुनि ‘ती’जसि । झुकली माझी दृष्टी ।
अन त्याच क्षणी वृष्टी । झाली सुरु ‘ती’ची ॥

"अनेक मुलं आजवर । पडले माझ्या प्रेमात ।
त्यातल्या एकाने धाडस । केले खरे बोलण्याचे ॥

आठवते का तुजला । त्यानंतर तु एकला ।
येऊन मला भेटला । समजुत माझी काढावया ॥

त्यापूर्वी ही एकदा । लागले होते नादा ।
शोधु लागले आनंदा । दु:संग मला लागला ॥

तेव्हा गिळुन अवमान । झाकुन अपुला अभिमान ।
आलास तु धावुन । सांभाळलेस मजला ॥

मित्र म्हणुन आजवरी । लाभली तुझी संगत खरी ।
तुझपरी मित्र निर्धारी । मला न कदा मिळाला ॥

मजसाठी तु खरोखरी । भांडलास नेकवारी ।
धाडस तुझे सत्त्वरी । वाखाणते मी आज ॥

रिक्षावाला फसवता । झालास तत्क्षणी भांडता ।
तोडून त्याच्या दाता । आणलेस त्याला वठणीवर ॥

खरोखरंच रे तद्वेळी । वाटलास तू महाबळी ।
तुझ्या धाडसाची मी केली । स्तुतीच केवळ मनोमनी ॥

तू एवढा कलासक्त । तू मोठा रसिक ।
आहे तुजला कवीमन । सर्वकाही छानसे ॥

कधी कपट कारस्थान । आले न तुझ्या मनातुन ।
निर्मळ आत-बाहेरुन । मानले बा तुला मी ॥

सर्वांशी छान वागशी । दु:ख परांचे वाटुन घेशी ।
नात्यांमधे येऊ न देशी । कधीही त्या दमड्याला ॥

हाच तुझा सद्गुण । आवडे फार मजलागुन ।
कधी न सोडी त्यालागुन । ह्यामुळेच तू निराळा ॥

सद्गुणांसि धरिसी । फार असून धाडसी ।
जिच्यावरी प्रेम करिसी । तिलाच बोलाया घाबरतो ?"

अन मध्येच थांबली । मैत्रिणीस पुटपुटली ।
मैत्रिण ‘ती’ची पोचलेली । दूर जाऊन थांबली ॥

"थोडा असशी भांडकुदळ....असे ना का?
थोडा असशी विचित्र....असे ना का?
थोडा असशी ढेरपोट्या....असे ना का?
मजसाठी तूच लिओनार्डो.........."

ऐसे म्हणुन अखेरी । माझा कर धरून करी ।
झटकून जळमटांसि दूरी । नाते केले पारदर्शी ॥

तो क्षण मजप्रत । मोददायी नी उत्कट ।
त्या एका क्षणाप्रत । मजला न मुळी वर्णवे ॥

जे जे पाहिले स्वप्नी । ते ते पाहिले आज नयनी ।
आभार मानितो चक्रपाणी । सर्वात्मका जगदोद्धारा ॥

2 comments:

swarmayee said...

hmmm..... tuch leonardo kai????

Mugdha said...

leonardo han??? shobhatay he nav tumhala..... :)