श्रोतेजनहो ऐका आता । माझ्या `ती'ची गाथा ।
मध्यावर आली कथा ।ह्या 'ती'पुराणाची ॥
मैत्री अमुची होती छान । तिजसंगे मी विसरे भान ।
तिची संगत होती शान । मजसाठी जनहो ॥
तो दिवस कठिण । मजसाठी अतोनात ।
ती होती अखंड व्यस्त । मुलांच्या गराड्यात ॥
दिन तो मैत्रीचा । लाडका कॉलेजविश्वाचा ।
मजसाठी परीक्षेचा । काय सांगू तुम्हासी?
मैत्री करण्या खरोखर । दोस्तहो तिच्याबरोबर ।
अश्याच दिसाची जरूर । हवी होती पोरांना ॥
ती संधी सुंदर । चालून आली अखेर ।
पोरांनी तो घातला घेर । पक्का हिच्याभोवती ॥
हिच्या सुंदर दिसण्यावर । फिदा होते सर्वजण ।
करीत असत वणवण । अखंड हिच्यामागे ॥
ती वणवण त्यांची । थांबणार होती साची ।
होणार होती कायमची । मैत्री हिच्यासंगे ॥
अंग हिचे सारे । नावांनी भरलेले ।
ज्याने त्याने लिहिलेले । नाव तिच्या हातावर ॥
कोणी लिही हातावर । कोणी लिहि गालावर ।
कोणी लिहि तळव्यावर । सांगायची सोय ना ॥
हात तिचा भरलेला । फ़्रेंडशीप बॅंड लाल, निळा ।
हाती तिच्या बांधलेला । कोणी कोणी राम जाणे ॥
हिच्याबरोबर मी होतो जरी । अमुच्यामध्ये होती दुरी ।
जनता होती सारी । हिच्याभोवती अविरत ॥
मीही थोडा विचार केला । आजच्या ह्या सुदिनाला ।
वाचा फोडावी प्रेमाला । अपुल्या एकदाची ॥
धीर मात्र होईना । तिच्या समोर जाववेना ।
नजरही भिडवण्यास होईना । धाडस मला इवलेसे ॥
छाती माझी तेधवा । उडू लागली धडधडा ।
वाटे जैसे हुडहुडा । भरला असे थंडीचा ॥
दिवसाच्या शेवटी । मोकळी झाली अखेर ती ।
गोड हसून माझ्याशी । येऊन बसली ती ॥
आता म्हटलं सांगाव । गुपित आपल्या मनींचं ।
परी साधं बोलण्याचं । तेही धारिष्ट्य होईना ॥
म्हटल आता जाऊ दे । आपल्या प्रेमाचं राहू दे ।
मैत्रीच अपुली टिकू दे । तूर्तास म्हणजे मिळवलं ॥
आजच्या ह्या दिवसात । अनेक आले मार्गात ।
कसेही करून हिच्या नजरेत । आपल्यास मोठे व्हायचे ॥
असा विचार करून । तिला घरी सोडून ।
मनात थोडा हुरहुरून । अखेर घरी पोचलो ॥
३ एप्रिल.....एका अस्मितेचा अस्त.....
15 years ago
No comments:
Post a Comment