श्रोते साष्टांग नमस्कार । तुमच्यामुळे साचार ।
स्वप्न झाले साकार । आता चिंता नसे मज ॥
‘ती’पुराण जो वाचेल । तो निश्चित काही शिकेल ।
मम अनुभवाचा करेल । स्वतःसाठी फायदा ॥
ह्या ‘ती’पुराणात । आहेत काही इशारे खास ।
अधोरिखित करतो त्यास । केवळ तुमच्या भल्यासाठी ॥
हे पुराण वाचुन । गोष्ट घ्या एक समजुन ।
एका मुलीवाचुन । दुसरीसाठी धावू नये ॥
हे पुराण वाचुन । गोष्ट घ्या ही समजुन ।
मुलीसाठी तुम्ही सोडून । दोस्तांस तुमच्या जाऊ नये ॥
हे पुराण वाचुन । गोष्ट घ्या ही समजुन ।
तुमच्या दोस्तांवाचुन । वाली तुमचा कुणी नसे ॥
हे पुराण वाचुन । गोष्ट घ्या ही जाणुन ।
सर्वांशी चांगले वागुन । ह्रदय तुम्ही जिंकावे ॥
हे पुराण वाचुन । गोष्ट घ्या ही भिनवून ।
जरी आभाळ गेले पडून । मुलीस कधी शिकवू नये ॥
हे पुराण वाचुन । गोष्ट घ्या ही समजुन ।
आपल्या घरापासून । वंचित मुलीस करू नये ॥
हे पुराण वाचुन । गोष्ट घ्या ही उमजुन ।
स्वत:वर पूर्ण विश्वासून । मगच प्रेम करावे ॥
हे पुराण वाचुन । गोष्ट घ्या ही जाणून ।
तुम्ही प्रेम केले म्हणून । ‘ती’च्याकडून अपेक्षु नये ॥
हे पुराण वाचोनि । गोष्ट एक जाणावी ।
मुलीच्या जे असे मनी । तेच खरे होते ॥
चुकून झाला प्रेमभंग । अडकावे न त्यात ।
आयुष्याचा प्रवाह । मान्य करावा हर्षे ॥
ऐसे न जरी केले । पाणी तिथे साचवले ।
दलदल होऊन तुम्ही भले । त्यात अडकाल नि:संशय ॥
असो हा कळसाध्याय । ‘ती’पुराण हा स्वाध्याय ।
शिकुन घ्यावे काय काय । हे तुमच्यावर विसंबे ॥
इति श्री ममविरचित । चौदाध्यायी ‘ती’पुराण ।
प्रेमीजनांचे होवो तारण । ऐसी प्रार्थना जगज्जेठी ॥
॥ शुभं भवतु ॥
३ एप्रिल.....एका अस्मितेचा अस्त.....
15 years ago