सामान्य माणसाचं आयुष्यात काय ध्येय असतं? शिक्षणात उत्तम प्रगती, उत्तम नोकरी, खूप नाही पण निदान उच्चमध्यमवर्गात गणना होईल इतकी तरी आर्थिक श्रीमंती, उत्तम पत्नी, उत्तम अपत्ये, त्यांचे उत्तम आरोग्य, शिक्षण, नोकरी वगैरे वगैरे. ध्येय असेल तर आयुष्याला एक दिशा मिळते, जगण्यातली उर्मी टिकून राहाते. जगण्यात एक जिवंतपणा असतो. कालांतराने आपली ध्येयं, कर्तृत्व हीच आपली ओळख बनते.... अर्थात फक्त समाजात!
समाजात असलेली ओळख हीच आपली खरी ओळख आहे असंच आपणही समजू लागतो. आपल्यालाही ती ओळख आवडत असते. इंजिनियर, शिक्षक, डॉक्टर, गायक, नोकरदार, कामगार, स्त्री, पुरुष आणि इतर अनेक पदं..... इतकंच काय, मी रामभक्त, मी कृष्णभक्त, मी शिवभक्त, मी स्वामीभक्त, आणि कोणाचे भक्त हेही छाती फुगवून सांगतो. प्रतिष्ठा सगळ्यांना आवडते. समाजात मान मिळत असतो. अहंकार पुष्ट होत असतो. त्यामुळे सगळं आवडत असतं. समाजातलं स्थान, प्रतिष्ठा सांभाळताना, समाजाला आवडणारी आपली प्रतिमा सांभाळताना नकळत या अहंकाराचं ओझं आपण सतत वाहू लागतो. आणि या सगळ्या भानगडीत आपण नक्की कोण आहोत हेच विसरून जातो. ध्येयापर्यंत पोहोचायच्या नादात आयुष्याचा हेतूच जाणून घेत नाही अथवा विसरून जातो.
अर्जुनाला कर्मयोग आणि भक्तियोग सांगण्यापूर्वी सांख्ययोग म्हणजे शुद्ध ज्ञानयोग सांगून कृष्णाने त्याला आरसाच दाखवला आहे. 'स्व'रुप समजल्यावर अर्जुन निर्मोही झाला. मोह, व्देष आणि मत्सर यांच्या पलीकडे जाऊन शुद्ध कर्तव्यबुद्धीने युद्ध करु शकला. सावकारीचा धंदा करताना लोकांच्या अडचणीचा गैरफायदा घेणाऱ्या तुकोबांना जेव्हा आत्मदर्शन झालं तेव्हा त्यांचं मनोगत होते;
पावले पावले तुझे आम्हा सर्व
नको दुजाभाव होऊ देऊ
जेथे देखे तेथे तुझीच पाऊले
त्रिभुवन संचले विठ्ठला गा...
'स्व'-रुप समजलं, अव्दैत अनुभवलं, तुकोबा वृत्तीने संन्यस्त झाले.
बरं, मी परमात्म्याचा अंश असलेला आत्मा आहे, त्यामुळे माझ्या स्वातंत्र्याला काहीही मर्यादा नाहीत, आणि माझ्यासारखेच आजुबाजुचे सगळे जीवही परमात्म्याचाच अंश आहेत. म्हणजे आपण सगळेच एकाच घराच्या निरनिराळ्या खोल्यांसारखे स्वतंत्र, पण एकत्र, एकमेकांशी जोडलेले आहोत. एका खोलीत उठलेली आनंद वा दुःखाची कंपनं सगळ्या घरात पसरतात. कारण आपण जोडलेले आहोत, आपल्यात अद्वैत आहे.. पण, अहम् बह्मास्मि हा अनुभव मी सतत कसा ध्यावा? ध्यानाच्या माध्यमातून समाधीचा अनुभव. म्हणजे २४ तासातली १५-२० मिनिटं आपण ध्यान करू आणि त्यातही चित्त स्थिर होऊन समाधी लागेल २-४ क्षण तेंव्हाच. हे २-४ क्षण केव्हा येतील किंवा कधी येतील तरी का या जन्मी ही स्थिती! 'मी अबक नाही, आत्मा आहे. अबक हे तर मी ग्रहण केलेल्या देहाचं नाव आहे.' हे भान सतत कसं राखावं? कारण माझा तर अगदी लीलया अपमान होतो, जीभेला खुष करणारे पदार्थ मला भरल्यापोटीही खावेसे वाटतात, आणि ते समोर आले की मी पोटापेक्षा जीभेचा विचार करून खातो. कोणाकोणाबद्दलचा राग, व्देष मी वर्षानुवर्ष उराशी बाळगतो. चित्ताच्या वृत्ती सतत उसळत असतात, क्लेश देत असतात. मी अबक नाही, आणि मी या सगळ्याच्या पल्याड अज, नित्य, शाश्वत, पुराण, अचल, अविनाशी, अविकारी आत्मा आहे, याचा मला वारंवार विसर पडतो. त्यामुळे मी सगळ्यांशी जोडलेला असूनही तसं अनुभवू शकत नाही. तेव्हा, मी सांख्ययोग कसा आचरावा, अनुभवावा?
गजानन महाराज अखंड गणी गण गणांत बोते असा जप करत असा पोथीत उल्लेख आहे. त्या जपाचा अर्थ 'सर्व जिवात्म्यांना शिवात्म्यात मोज' असा आहे हे ही पोथी वाचून समजतं. याचा सरळ अर्थ असा होतो, की गजानन महाराज जप करत नसून अखंड अहम् ब्रह्मास्मि अनुभवत होते. दैनंदिन जीवनात मन भरकटवणाऱ्या अनेक प्रसंगात भानावर राहून निःसंगपणे प्रत्येक क्षण अनुभवत होते. आणि गणी गण गणात बोते हा एक जप करत नसून स्वतःच्या आत्मरूपाची स्वतःला आठवण करून देत होते. अखंड आत्मस्वरूपाचं भान ठेवणं हेच खरं ध्यान आहे आणि त्यामुळे शमलेल्या चित्तवृत्ती हीच समाधी अवस्था आहे. महाराजांचं नामस्मरण करण्याच्या दृष्टीने गणी गण गणांत बोते या मंत्राला काही अर्थ नाही, ती एक आठवण आहे आत्मरूपाची!
काही वर्षांपूर्वी एका व्यक्तीशी माझी ओळख झाली. ती व्यक्ती गुरुभक्त होती. मग आपल्या घरी गजानन महाराजांची होत असलेली उपासना मीही मोठ्या तोंडाने सांगितली. 'काय उपासना करतोस?' या प्रश्नावर 'पोथीवाचन' याशिवाय आणि काय सांगणार! पण खरंच एवढंच पुरेसं आहे का? पोथीलेखन करून दासगणू महाराजांनी एकप्रकारे गंगातट दाखवला आहे.... 'बघा ही आहे पवित्र गंगा! हीच्या काठावर नुसतं बसायचं, पाण्यात पाय सोडून बसायचं, की पाण्यात डुबकी मारायची हे ज्याचं त्याने ठरवायचं.' आपण जेव्हा स्वतःला महाराजांचे भक्त म्हणवतो तेंव्हा पोथीवाचन हे उत्तम भक्त असण्याचं प्रमाण असतं का? किंबहुना आपणचं आपल्या भक्तीचं प्रमाण द्यावं का? आणि जेव्हा आपण महाराजांना गुरूस्थानी मानतो, तेव्हा आपण भक्ताच्या भूमिकेत असावं की शिष्याच्या? भक्त हा शिष्य असेलंच असं नाही, पण शिष्य हा भक्त नक्की असेल. भक्त हा अनेकदा नकळतपणे मूळ शिकवण न समजता व्यक्तिपूजेत अडकतो. महाराज वैराग्यात बुडालेले होते. पूजा झाली काय, नाही झाली काय; त्यांना सगळं सारखंच. शिवाय एक भूमिका अहंकारयुक्त आहे आणि दुसरी समर्पणाने युक्त. 'शिष्यस्तेहम् शाधि माम् तां प्रपन्नम्' असा अर्जुनाचा समर्पणभाव होता तेंव्हा कृष्णाने गीता सांगितली. आणि समर्पणाशिवाय भक्तीभाव दाटणं शक्य नाही. त्यामुळे निर्णय ज्याचा त्याने घ्यायचा आहे. वैराग्य - ही आहे महाराजांची खरी शिकवण! स्व-रूप ओळखून प्रारब्धात आलेले चांगले वाईट भोग निःसंगपणे भोगणे, ही आहे महाराजांची खरी शिकवण. आणि 'गणी गण गणांत बोते' हे आहे निःसंगपणे जगण्याचं सूत्र! स्व-रूपाचं भान राहिल्याशिवाय वैराग्य अशक्य आहे. अबकचे प्रश्न अबकचे आहेत. अबकची सुखं अबकची आहेत. मी अबकमध्येही असलो तरी अबक ही माझी ओळख नाही. नित्यः सर्वगतः स्थाणूः अचलोयम् सनातनःI अबक यातला कोणीही नाही, ह्याचं भान राहण्यासाठी अबकला संसार सोडायला नको, की संन्यास आश्रम धारण करायला नको. 'गणी गण गणात बोते'चा अर्थ ध्यानात ठेवण्याचा प्रयत्न करत राहणं पुरेसं आहे. गणी गण गणांत बोते ही महाराजांची शिकवण आहे, नामस्मरण नाही. अवघं अध्यात्म सामावलं आहे या एका सूत्रात! यातून येणारी अलिप्तता ही अंतिमतः वैराग्याकडे घेऊन जाणारी असेल. आणि हे वैराग्य निश्क्रियतेकडे झुकलेले न राहता कृष्णाने अर्जूनाला सांगितल्याप्रमाणे 'योगस्थः कुरु कर्माणि संगं त्यक्त्वा धनंजय, सिद्धयसिद्ध्याः समो भुत्वा समत्वं योग उच्यते' असं असेल!
स्वयंपाक करायचा आहे, करू - गणी गण गणात बोते
लादी पुसायची आहे, पुसू - गणी गण गणात बोते
मुलांचा अभ्यास घ्यायचा आहे, घेऊ - गणी गण गणात बोते
मुलांशी खेळायचं आहे, खेळू - गणी गण गणात बोते
जेवायचं आहे, जेवू - गणी गण गणात बोते
ऑफिसची मीटिंग आहे, अटेण्ड करू - गणी गण गणात बोते
लग्नसमारंभाला मिरवायचंय, मिरवू - गणी गण गणात बोते
बायकोशी वाद चालू आहेत - गणी गण गणात बोते
मयतीला जायचं आहे - गणी गण गणात बोते
कोणी टोमणा मारतंय - गणी गण गणात बोते
कोणाला टोमणा मारायचाय - गणी गण गणात बोते
कोणाबद्दल मनात राग बसलाय - गणी गण गणात बोते
कोणाबद्दल द्वेष, मत्सर वाटतोय - गणी गण गणात बोतेहो
कोणाकडे माफी मागायची हिंमत नाही - गणी गण गणात बोते
कोणाला माफ करवत नाही - गणी गण गणात बोते
आयुष्य संकटांनी भरलयं - गणी गण गणात बोते
.... अतिशय कठीण आहे, पण अशक्य नक्की नाही. इथवर हात धरून आणलंय महाराजांनी, यापुढे तरी हात कसा सोडतील! त्यामुळे, जेव्हा आठवण होईल तेव्हा, जिथे आठवण होईल तिथे, १५-२० मिनिटांच्या ध्यानाशिवाय गणी गण गणात बोतेचं 'ध्यान' रोज २४ तास चालू ठेवण्याचा प्रयत्न करत राहणं हीच खरी साधना आहे, आणि हीच महाराजांप्रती असलेली भक्ती आहे.
गणी गण गणात बोते