Monday, January 15, 2007

सांगड

(कल्पना म्हणजे माणसाची कल्पनाशक्ती आणि वास्तवता, क्वचितंच जुळून येतं. आपण त्यांना तात्पुरतं दोन मुली समजू.)
म्हणजे कल्पना आणि वास्तवता ह्या दोन मुली. दोन्ही मुली देवाच्याचं. दोघींना देवानेच जन्माला घातलं. दोघीं भयंकर अहंकारी.

कल्पना : आज विश्वाच्या निर्मितीमध्ये माझा सिंहाचा वाटा आहे. ब्रह्मदेवाजवळ जर कल्पनाशक्ती नसती तर तो विश्वाची निर्मितीच करु शकला नसता. अनेक जिवाणू, प्राणी, पक्षी, वनस्पती ह्यांचा जन्मंच झाला नसता. आज डोळे उघडे ठेवून जर बाहेर पाहिलं, तर जगात किती सौंदर्य आहे हे समजेल. रंगबेरंगी फुलपाखरं, निरनिराळ्या आकाराची, नाजुक-साजुक, ह्या फुलावरून त्या फूलावर उडतात तेव्हा बघायला किती गंमत वाटते!!! ती ज्या फूलांवरून फिरतात, ज्या फूलांमधला मधू शोषून घेतात ती फूलेदेखिल अनेक रंगांनी नटलेली, सजलेली वाटतात. एवढ्या सुंदर सुंदर, प्रत्येक दुसरीपेक्षा वेगळी अशी रंगसंगती त्या देवाला कशी बरं सुचली असेल? मी आहे ना ब्रह्मदेवाजवळ, चिंता कसली? पावसाळ्यात कधी फिरायला बाहेर पडलं कि कसं सगळं हिरवंगार दिसतं. त्या हिरव्या रंगांच्यादेखिल अनंत छटा आपल्याला दिसतात, आणि विशेष म्हणजे प्रत्येक छटा डोळ्यांना सुखावून जाते. माझ्या ताकदीचं सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे माणूस. दोन डोळे, दोन कान, एक नाक, ओठ ...... अवयव तेच पण प्रत्येक चेहेरा निराळा आणि छान!!! त्याच्या साच्यातून आजपर्य़ंत अगणित सुंदर चेहेरे घडले, अजुनही घडताहेत आणि घडतील!!!!!!

ही सगळी माझ्या ताकदीची उदाहरणं आहेत केवळ. माझ्याशिवाय जगात काहीच होऊ शकत नाही!!! मीच सर्वश्रेष्ठ आहे.

वास्तवता : अगं तू असशील श्रेष्ठ पण तुला वास्तवात आणायला मीच कारणीभूत आहे. देवाला जर वास्तवतेचं भान नसतं तर आज तुझं ह्या धरेवर अस्तित्वच नसतं. अजुनही तुला तू किती श्रेष्ठ आहेस हे ओरडून सांगावं लागतं. तुझ अस्तित्व कोणालाही जाणवंत नाही. मी आहे म्हणून तुला किंमत आहे. तु सर्वश्रेष्ठ असशील तर तुझ्याहून मी चांगलीच पुढे आहे. मी सर्वोत्तम आहे. माझं अस्तित्व लोकांना १००% समजलंय आणि त्याचं महत्त्वही जाणलंय. तेव्हा तुच महान हा जो तुझा बोंबाटा चालला आहे तो बंद कर...........

अशाप्रकारचं त्यांचं हे अहंपणाचं बोलणं ऐकून देव त्यांना मधेच अडवून म्हणाला...

देव : तुमच्यात महान कोण ह्याचा निकाल लावायला फार वेळ नाही लागणार. तुम्ही जमिनीवर राहून आकाशाला हात लावायचा, जिचा हात आधी लागेल अर्थात तिच असेल सर्वश्रेष्ठ!!!


दोघींची स्पर्धा सुरू झाली......दोघी जीव तोडून प्रयत्न करत होत्या. वास्तवतेचे पाय जमिनीवर होते परंतु हात काही केल्या आकाशाला लागेनात! तर कल्पनेचे हात आकाशाला लागले पण पाय हवेत होते त्याचे काय!!!

अखेर देव त्यांना म्हणाला,

देव :
तुम्ही दोघीही महान आहात. तुमच्यामध्ये तुलना होऊ शकत नाही.कारण तुम्ही एकमेकींना पुरक आहात. एकीशिवाय दुसरीचं महत्त्व नगण्य!! पण एक मात्र नक्की, ज्या वस्तुच्या निर्मितीमध्ये तुमच्या दोघींचा सहभाग आहे, ती गोष्ट आभाळालाएवढीच श्रेष्ठ असेल!!!!

No comments: